Nandgaon Vidhan Sabha Election Result 2024 : नांदगावमधील चुरशीच्या लढतीत सुहास कांदेंचा दणदणीत विजय, समीर भुजबळांचा दारूण पराभव
Nandgaon Vidhan Sabha Election Result 2024 : नांदगाव विधानसभा मतदारसंघात महायुतीचे सुहास कांदे, मविआचे गणेश धात्रक आणि अपक्ष समीर भुजबळ यांच्यात लढत झाली.
नाशिक : महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024 चे (Maharashtra Assembly Elections 2024) बिगुल वाजताच नांदगाव विधानसभा मतदारसंघाची (Nandgaon Assembly Constituency) जोरदार चर्चा राज्यभरात रंगली. कारण या मतदारसंघातून महायुतीतून शिवसेना शिंदे गटाने विद्यमान आमदार सुहास कांदे (Suhas Kande) यांना पुन्हा एकदा संधी दिली. मात्र महायुतीतील घटक पक्ष असलेल्या राष्ट्रवादी अजित पवार गटातील नेते आणि छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांचे पुतणे समीर भुजबळ (Sameer Bhujbal) यांनी या मतदारसंघातून निवडणूक लढवण्याची घोषणा केली. अजित पवार गटाच्या मुंबई अध्यक्ष पदाचा राजीनामा देत समीर भुजबळ यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला. तर महाविकास आघाडीकडून शिवसेना ठाकरे गटाने गणेश धात्रक (Ganesh Dhatrak) यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवले. मात्र या लढतीत सुहास कांदे यांनी दणदणीत विजय मिळवला आहे.
नांदगाव विधानसभा मतदारसंघ हा दिंडोरी लोकसभा मतदारसंघाचा भाग आहे. 2009 साली राष्ट्रवादी काँग्रेसचे पंकज भुजबळ यांनी शिवसेनेच्या संजय पवार यांचा पराभव याच मतदारसंघातून केला. त्यावेळी पंकज भुजबळ यांना 96 हजार 292 मतं मिळाली तर संजय पवार (Sanjay Pawar) यांना 74 हजार 923 मतं मिळाली होती. 2014 मध्ये पंकज भुजबळ विरुद्ध सुहास कांदे अशी झाली. सुहास कांदेंना 50 हजार 827 मतं मिळाली. तर पंकज भुजबळ यांना 69 हजार 263 मतं मिळाली. या निवडणुकीत सुहास कांदेंचा पराभव झाला. तर 2019 च्या विधानसभा निवडणुकीत सुहास कांदेंना 85 हजार 275 मतं मिळाली. तर पंकज भुजबळ यांना 71 हजार 386 मतं मिळाली. 2019 च्या निवडणुकीत सुहास कांदेंनी पंकज भुजबळ यांचा पराभव केला होता.
नांदगावमध्ये तिरंगी लढतीत सुहास कांदे 'बाजीगर'
पंकज भुजबळ (Pankaj Bhujbal) यांना विधान परिषदेवर आमदारकी मिळाल्याने महायुतीचे शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार सुहास कांदे यांचा मार्ग मोकळा झाला असे दिसत होते. मात्र समीर भुजबळ यांनी नांदगाव विधानसभा मतदारसंघातून अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला. त्यामुळे सुहास कांदे यांच्या अडचणी वाढल्याचे दिसून येत आहे. तर महाविकास आघाडीकडून शिवसेना ठाकरे गटाने गणेश धात्रक यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवले. त्यामुळे नांदगाव विधानसभा मतदारसंघाकडे सर्वांचेच लक्ष लागले होते. मात्र सुहास कांदे यांनी या निवडणुकीत दणदणीत विजय मिळवला.
इतर महत्त्वाच्या बातम्या