Pune Politics: काँग्रेस पक्षांने कारवाई केलेले पुण्याचे दोन बंडखोर उमेदवार नॉट रिचेबल; नेमकं काय घडतंय?
pune politics: कॉंग्रेस पक्षाकडून सहा वर्षांसाठी निलंबनाची कारवाई करण्यात आल्यानंतर पुण्याचे माजी उपमहापौर आबा बागुल नॉट रिचेबल झाले आहेत.
पुणे: विधानसभा निवडणुकीमध्ये पक्षांनी उमेदवार यादी जाहीर केली. मात्र, पक्षाचा आदेश झुगारून अनेक पक्षातील नेत्यांनी उमेदवारी अर्ज भरला आहे. अशातच इतर पक्षांप्रमाणे काँग्रेसमध्येही (Congress) अनेक नेत्यांनी बंडखोरी केल्याचे दिसून येत आहे. आता बंडखोरांविरोधात काँग्रेसने कारवाईचा बडगा उगारला आहे. ज्या काँग्रेसच्या नेत्यांनी बंडखोरी केली आहे. त्यांना 6 वर्षासाठी निलंबित करण्यात आल्याची माहिती काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्निथला यांनी दिली. यामध्ये रामटेक विधानसभा मतदारसंघातून राजेंद्र मुळक (Rajendra Mulak), काटोलमधून काँग्रेसचे दिवंगत नेते श्रीकांत जिचकार यांचे सुपुत्र याज्ञवल्क्य जिचकार (Yajnavalkya Jichkar), पर्वती विधानसभा मतदारसंघातून आबा बागुल (Aaba Bagul) आणि कसबा विधानसभा मतदारसंघातून कमल व्यवहारे (Kamal Vyavhare) यांना 6 वर्षासाठी निलंबित करण्यात आले आहे. निलंबित उमेदवारांपैकी दोन उमेदवार नॉट रिचेबल झाल्याची माहिती समोर आली आहे.
कॉंग्रेस पक्षाकडून सहा वर्षांसाठी निलंबनाची कारवाई करण्यात आल्यानंतर पुण्याचे माजी उपमहापौर आबा बागुल नॉट रिचेबल झाले आहेत. आबा बागुल यांना 104 डिग्री ताप आल्याने प्रचार थांबवून हॉस्पीटल मध्ये उपचारांसाठी भरती करावं लागल्याचं त्यांचा मुलगा अमित बागुल यांनी सांगितलं आहे. आबा बागुल यांनी पुण्यातील पर्वती विधानसभा मतदारसंघातून अपक्ष अर्ज दाखल केला असून महाविकास आघाडीतर्फे इथे राष्ट्रवादी कॉंग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या अश्विनी कदम यांना उमेदवारी देण्यात आली आहे. माजी महापौर व कसबा विधानसभा मतदारसंघाच्या काँग्रेसच्या बंडखोर उमेदवार कमल व्यवहारे यांचा देखील फोन नॉट रिचेबल असल्याची माहिती आहे.
पुण्यात काँग्रेस पक्षाकडून तीन मतदारसंघामध्ये बंडखोरी केल्याचं चित्र दिसून येत आहे. कसबा, शिवाजीनगर आणि पर्वती विधानसभा मतदारसंघातून काँग्रेसच्या नेत्यांनी बंडखोरी करत अपक्ष अर्ज दाखल केले आहेत. काँग्रेस हे अर्ज मागे घेण्यासाठी प्रयत्न करत होते. मात्र, त्यांच्या प्रयत्नांना यश आलेले नाही. कसबा विधानसभा मतदारसंघातून काँग्रेसच्या माजी महापौर कमल व्यवहारे यांनी अपक्ष अर्ज दाखल केला आहे.