(Source: ECI/ABP News/ABP Majha)
सावकरांच्या जाचातून सोडवलेल्या जमिनीची मालकी कातकरी कुटुंबांना मिळाली, फडणवीसांच्या हस्ते दिले 7/12
सावकरांच्या जाचातून सोडविलेली जमिनीची मालकी आज 17 कातकरी कुटुंबांना (17 Katkari families) परत मिळाली.
Lands received by Katkari families : सावकरांच्या जाचातून सोडविलेली जमिनीची मालकी आज 17 कातकरी कुटुंबांना (17 Katkari families) परत मिळाली. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी यासाठी पुढाकार अतिशय महत्त्वपूर्ण ठरला. या कुटुंबांना जागांचे सातबारे देण्यात आले आहेत. दरम्यान, सातत्यानं झालेलं शोषण, त्यातून अनुभवलेली पीडा, कातकरी बांधवांनी केलेले अनुभवकथन ऐकून सह्याद्री अतिथीगृह सुद्धा पाणावले होते. तसेच एका ऐतिहासिक आणि संवेदनशील क्षणाचे साक्षीदार सुद्धा सह्याद्रीला होता आलं.
जमिनी सोडवण्यासाठी देवेंद्र फडणवीस आग्रही होते
प्रामुख्याने पालघर, रायगड जिल्ह्यातील कातकरींच्या अनेक समस्या आहेत. अवघे 200 रुपये हाती ठेऊन किंवा आठवड्यात एकदा चिकन देऊन सावकारांनी बळकावलेल्या जमिनी सोडवण्यासाठी देवेंद्र फडणवीस यांनी 2019 मध्ये एक समिती गठीत केली होती. या कामाला गती देण्यासाठी चावडी वाचनाचे आदेशही दिले होते. त्यातून आजचा दिवस उगवला. त्यातून मूळ मालकांना जमिनी परत मिळाल्या. आता वेदनांची आणि अश्रूंची जागा खंबीर आधाराने आणि त्यातून जीवनाच्या स्वप्नपूर्तीने घेतली. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची संवेदनशीलता फळाला आली होती. स्वत: जमीनदार असून झोपडीत राहणार्या कातकरी समाजाप्रती देवेंद्र फडणवीस हे सातत्याने आग्रही होते.
गेल्याच आठवड्यात सह्याद्रीवर कातकरींच्या या समस्यांवर एक व्यापक बैठक देवेंद्र फडणवीस यांनी घेतली होती. आज हा कार्यक्रम आयोजित झाला. यावेळी उपमुख्यमंत्र्यांचे सचिव डॉ. श्रीकर परदेशी, आदिवासी विकास सचिव विजय वाघमारे, विभागीय आयुक्त डॉ. महेंद्र कल्याणकर, विशेष पोलिस महानिरीक्षक संजय दराडे, जिल्हाधिकारी अशोक शिनगारे, पोलिस अधीक्षक डी. एस. स्वामी आदी उपस्थित होते. यासाठी सातत्याने पाठपुरावा आदिवासी विकास आढावा समितीचे विवेक पंडित यांचाही होता.
शासकीय खर्चाने शेतकऱ्यांच्या जागेवर मालकी पाट्या लावून द्याव्या
आता त्यांना जागेचा ताबा द्या, शासकीय खर्चाने त्यांच्या जागेवर मालकी पाट्या लावून द्याव्या, योग्य सीमांकन आखून द्या, असे निर्देश सुद्धा देवेंद्र फडणवीस यांनी दिले. संविधानाने त्यांना अधिकार दिले आहेत पण, त्यांना त्यापासून वंचित रहावे लागले. त्यांचे जे होते, तेच त्यांना परत केले. हा गुलामीतून मुक्त करण्याचा कार्यक्रम आहे. आता खर्या आदिवासींना सर्व लाभ मिळावे, असा जीआर जारी करा. भविष्यात कुणी जमिनी हडपू शकणार नाही, अशी व्यवस्था पोलिसांनी उभारावी असे फडणवीस म्हणाले. आज ज्या 17 जणांना जमिनी दिल्या, त्यांच्याकडे दर महिन्याला भेट देऊन, कुणी त्यांना धमकाविते का, याची माहिती घेत रहा. कातकरी समाजाच्या पाठीशी सरकार ठामपणे उभे आहे, अशी ग्वाही त्यांनी दिली. ट
'या' नागरिकांना दिला जागेचा 7/12
रवी हावरे, सुभाष धोडी, दशरथ खाले, बेबी धाडगे, सखू बाबर, संतोष बाबर, मालती जाधव, काळूराम वाघे, भीमाबाई वाघे, विमल तुंबडे, शिमगी वाघे, वसंत पागी, गोपाळ वाघ, चंदर खाले, यमुना गावित, जान्या धोडी, इंदू वाघे या 17 कातकरी समाजातील जमीन मालकांना सातबारा वाटप करण्यात आले. हे सर्व भिवंडी तालुक्यातील पडघा येथील कातकरी आहेत.