हिटलरवरही पुस्तक लिहिण्याचा जितेंद्र आव्हाडांचा सल्ला, पुस्तकावर जयभगवान गोयल ठाम
छत्रपती शिवाजी महाराजांच्या कामावर माझं नितांत प्रेम आहे. छत्रपती शिवाजी महाराजांप्रमाणे आज नरेंद्र मोदी देशात काम करत आहेत. त्यामुळे मी मोदींची तुलना छत्रपती शिवाजी महाराजांशी केली आहे, असं गोयल यांनी म्हटलं.
मुंबई : 'आज के शिवाजी नरेंद्र मोदी' या पुस्तकातील छत्रपती शिवाजी महाराज आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या तुलनेवरुन संपूर्ण महाराष्ट्रात संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत. पुस्तकात छत्रपती शिवाजी महाराजांचा कुठेही अवमान केलेला नाही. वाचकांनी पुस्तक आधी वाचावं आणि त्यानंतर काही बदल सुचवले तर मी नक्कीच बदल करेन, असं पुस्तकाचे लेखक जयभगवान गोयल यांनी म्हटलं आहे. जयभगवान गोयल एबीपी माझावर बोलत होते. गोयल यांनी हिटलरचं चरित्र वाचावं, म्हणजे काही वर्षांनी तुम्ही आणखी एखादं चांगलं पुस्तक लिहू शकाल, असा गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी सल्ला दिला.
लहानपणापासून मी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा कार्यकर्ता आहे. लहानपणापासूनच छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास ऐकत आलो आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या कामावर माझं नितांत प्रेम आहे. छत्रपती शिवाजी महाराजांप्रमाणे आज नरेंद्र मोदी देशात काम करत आहेत. देशावरील दहशतवादी हल्ल्यानंतर मोदींनी पाकिस्तानमध्ये घुसून हल्ला करुन त्यांना धडा शिकवला. हे काँग्रेसला कधीही जमलं नाही. असं करुन मोदींनी जगाला भारताची ताकद दाखवून दिली. कलम 370, तिहेरी तलाक, नागरिकत्व दुरुस्ती कायदा असे महत्त्वाचे निर्णय घेऊन मोदींनी देशाला योग्य दिशा दिली आहे. त्यामुळे मी मोदींची तुलना छत्रपती शिवाजी महाराजांशी केली आहे, असं गोयल यांनी म्हटलं.
पुस्तकातील मजकूर माझ्या वैयक्तिक भावना- गोयल
मी भाजपचा कार्यकर्ता असलो तरी पुस्तकातील मजकूर माझ्या वैयक्तिक भावना आहेत. भारत लोकशाही राष्ट्र आहे. प्रत्येकाला आपल्या भावना मांडण्याचा अधिकार आहे. शरद पवारांना जाणता राजा म्हटलं जातं. मग ते राष्ट्रवादीच्या नेत्यांना चालतं का? असा प्रतिप्रश्न गोयल यांनी जितेंद्र आव्हाडांना विचारला. यावर जितेंद्र आव्हाडांनी म्हटलं की, नरेंद्र मोदी शरद पवारांची करंगळी पकडून राजकारणात आले आहेत. त्यामुळे नरेंद्र मोदी आणि शरद पवारांची तुलना होऊ शकत नाही. शरद पवार हे भारतीय राजकारणातील वरिष्ठ नेते आहेत. महाराष्ट्रातील विकासात शरद पवारांचं योगदान मोठं आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांचा जानता राजा म्हणून केवळ काही पुस्तके आणि कादंबऱ्यांमध्ये उल्लेख आहे. जाणता राजा ही केवळ उपाधी आहे, असं जितेंद्र आव्हाडांनी म्हटलं.
महाराष्ट्रात कुणीही पुस्तक विकत घेणार नाही- जितेंद्र आव्हाड
जयभगवान गोयल यांची काहीही चूक नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदींची शिवाजी महाराजांशी केलेली तुलना योग्य आहे का? हे मोदींनी ठरवलं पाहिजे. कार्यकर्त्यांनी आपली कुणाशी तुलना केलीय, आपण त्यासाठी लायक आहोत का? हे नेत्याला कळायला हवं. त्यांनी खरे शिवाजी महाराज ओळखलेच नाहीत. मोदींची शिवाजी महाराजांशी तुलना करुन गोयल यांनी मोठी चूक केली आहे. जनतेच्या भावना दुखावल्यामुळे राज्यातील भाजपला याची किंमत मोजावी लागणार आहे, असं जितेंद्र आव्हाड म्हणाले. महाराष्ट्रातील जनतेवर माझा विश्वास आहे. राज्यात एकही पुस्तक विकलं जाणार नाही. महाराष्ट्रातील लोकांना काय वाचायचं काय नाही आणि काय विकयाचं व काय विकू द्यायचं नाही हे कळण्याइतकी अडाणी नाही. कुणीही हे पुस्तक विकत घेणार नाही. असा दावा जितेंद्र आव्हाडांनी केला आहे.
संबंधित बातम्या