शिवाजी महाराजांसोबत मोदींची तुलना करुन चूक केली नाही, पुस्तकावर जयभगवान गोयल ठाम
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची तुलना महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्याशी केल्याने जनतेत रोष आहे. भाजपवगळता सर्वच राजकीय पक्ष आणि वंशजांनी या पुस्तकाचा विरोध करत ते मागे घेण्याची मागणी केली आहे.
नवी दिल्ली : छत्रपती शिवाजी महाराज आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वादग्रस्त तुलनेवरुन संपूर्ण महाराष्ट्रात संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत. पण या पुस्तकाचे लेखक आणि भाजप नेते जयभगवान गोयल हे आपल्या म्हणण्यावर ठाम आहेत. पुस्तक मागे घेण्याची जी मागणी होतेय त्याबद्दल एबीपी माझाने विचारले असता त्यांनी म्हटलं की, "पुस्तक तर आता बाजारात आलेलं आहे. छापून झालेलं आहे.मात्र पक्षाचा आदेश अंतिम असेल." "छत्रपती शिवाजी महाराज आणि नरेंद्र मोदी या दोघांचाही मी पूजक आहे. मला कुणाच्याही भावना दुखावायच्या नाहीत. मात्र अनेक वर्षानंतर देशाला असा पंतप्रधान मिळाला आहे जो छत्रपती शिवाजी महाराजांप्रमाणे धाडसी निर्णय घेतोय," असं म्हणत त्यांनी आपल्या दाव्याला पुष्टी जोडली आहे.
भाजप नेते जयभगवान गोयल यांच्या 'आज के शिवाजी नरेंद्र मोदी' यांच्या या वादग्रस्त पुस्तकाविरोधात राज्यभरात निदर्शनं सुरु आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची तुलना महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्याशी केल्याने जनतेत रोष आहे. भाजपवगळता सर्वच राजकीय पक्ष आणि वंशजांनी या पुस्तकाचा विरोध करत ते मागे घेण्याची मागणी केली आहे.
नरेंद्र मोदी शिवाजी महाराजांसारखेच काम करत आहेत! या संपूर्ण प्रकरणानंतर जयभगवान गोयल यांच्याशी एबीपी माझाने बातचीत केली. त्यावेळी गोयल यांनी आपण आपल्या भूमिकेवर ठाम असल्याचं सांगितलं. ते म्हणाले की, "मागील अनेक वर्षांपासून देशात अनेक हल्ले झाले होते. परंतु नरेंद्र मोदी पंतप्रधान झाल्यानंतर एकही हल्ला झालेला नाही. पाकिस्तानने देशात घुसखोरी केल्यानंतर सैन्य आणि पंतप्रधान मोदी पाकिस्तानला त्यांच्या घरात घुसून मारलं. छत्रपती शिवाजी महाराज जसे सगळ्याचा विचार करायचे, माता भगिनींच्या सुरक्षेची काळजी करायचे, त्याचप्रमाणे पंतप्रधान मोदी देशातील माता भगिनींच्या सुरक्षेसाठी काम करत आहेत. त्यामुळे देशातील प्रत्येक महिला आज स्वत:ला सुरक्षित समजते. 'सबका साथ सबका विकास' या घोषणेप्रमाणे मोदी देशाच्या 130 कोटी जनतेला सोबत घेऊन काम करत आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात जसे सगळे मानाने राहत होते, तशाच भावना आता मोदींच्या काळात जनतेत आहे. मी बालपणापासून मोदींचा उपासक आहे. तसंच शिवाजी महाराजांचंही बालपणापासूनच अनुसरण करतो. माझा उद्देश कोणाच्या भावना दुखावण्याचा नाही, नव्हता आणि नसेल."
मोदींना शिवाजी महाराजांच्या रुपात पाहतो! जयभगवान गोयल पुढे म्हणाले की, "मोदींच्या येण्यामुळे जगभरात भारताचा गौरव वाढला आहे. यापूर्वी आपला देश धर्मशाळा बनला होता. आता सीएए लागू झालं आहे. आज मोदींनी त्यांना सन्मान दिला, नागरिकत्व दिलं. जसे शिवाजी महाराज निर्णय घ्यायचे, तसे निर्णय घेणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी आहेत. या माझ्या भावना आहेत. मी मोदींना शिवाज महाराजांच्या रुपात पाहतो. माझ्या या भावनांमुळे दुसऱ्या कोणाच्याही भावना दुखावण्याचा माझा हेतू नाही.
पुस्तक मागे घेण्याच्या मागणीवर गोयल म्हणतात.. शिवराय आणि मोदींची तुलना झाल्यानंतर पुस्तक मागे घेण्याची मागणी होत आहे. याविषयी गोयल म्हणाले की, "पुस्तक छापून बाजारात आलं आहे. मी माझं मत मांडलं आहे, ही माझी वैयक्तिक भावना आहे. त्यानंतरही संघटनेनं काही आदेश दिला तर तोही मला मान्य असेल. माझ्या मनात आजचे शिवाजी नरेंद्र मोदीच आहेत. आपण तर माणसाची तुलना देवाशी करतो. मी मोदींची तुलना शिवाजी महाराजांसोबत केली आहे. मला वाटतं की मी चुकीचं काम केलेलं नाही. ही माझी भावना आहे."
कारवाईची भाजपची मानसिकता नाही? पण दुसरीकडे भाजप नेतेही हे पुस्तक मागे घेण्याबाबत कारवाई करण्याच्या मानसिकतेत दिसत नाहीत. भाजपचे दिल्ली प्रभारी शाम जाजू यांनी म्हटलं की याबाबत जे काय म्हणणं मांडायचं ते लेखकाने मांडलेलं आहे. जे शीर्षक आहे त्यात तीळमात्र शंका घेण्यासारखं काही नाही असंही त्यांनी म्हटलं. त्यामुळे आता हे पुस्तक मागे घेण्याच्या मागणीचं नेमकं काय होणार हा प्रश्न उपस्थित होत आहे.
संबंधित बातम्या
शिवरायांसोबत मोदींची तुलना : जनता बोलतेय, छत्रपतींच्या वारसदारांनी बोललंच पाहिजे : संजय राऊत
मोदींवरील पुस्तकावरुन संभाजीराजे छत्रपती आणि संजय राऊतांमध्ये खडाजंगी
मोदींची छत्रपती शिवरायांशी तुलना करणाऱ्या पुस्तकाचं भाजप कार्यालयात प्रकाशन, शिवभक्तांमध्ये रोष
पंतप्रधान मोदींची छत्रपती शिवरायांशी तुलना, काँग्रेसकडून गुन्हा दाखल