गोपीचंद पडळकरांच्या वक्तव्यावरुन हसन मुश्रीफांची भाजप नेत्यांवर टीका, चंद्रकांत पाटलांचं प्रत्युत्तर
विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील हेच बोलविता धनी असल्याचा आरोप हसन मुश्रीफ यांनी केला. तर राज्यात कोण चंपा म्हणतं, कोण टरबुजा म्हणतं, हे कसं चालतं? चंद्रकांत पाटील यांनी मुश्रीफांना प्रत्युत्तर दिलं.
![गोपीचंद पडळकरांच्या वक्तव्यावरुन हसन मुश्रीफांची भाजप नेत्यांवर टीका, चंद्रकांत पाटलांचं प्रत्युत्तर hasan mushrif on gopichand padalkar statement on sharad pawar गोपीचंद पडळकरांच्या वक्तव्यावरुन हसन मुश्रीफांची भाजप नेत्यांवर टीका, चंद्रकांत पाटलांचं प्रत्युत्तर](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2020/06/29024607/HM-CP.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
कोल्हापूर : भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांवर खालच्या स्तरावरची टीका केली होती. यावरून राष्ट्रवादीचे नेते भाजपच्या वरिष्ठ नेत्यांवर आणि गोपीचंद पडळकरांवर निशाणा साधत आहेत. आज राज्याचे ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ आक्रमक झाले. देशाचे नेते शरद पवार यांच्यावर गोपीचंद पडळकर याने जे व्यक्तव्य केलं त्याचा मी निषेध करतो. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील हेच बोलविता धनी असल्याचा आरोप हसन मुश्रीफ यांनी केला. ते आज कोल्हापुरात बोलतं होते.
राजकारणात कितीही टोकाचे मतभेद असले तरी अशी वक्तव्ये करणं योग्य नाही. नथुराम गोडसे याचं ज्या पद्धतीने उदात्तीकरण केलं जातंय, तसंच उदात्तीकरण गोप्या पडळकर याचं का केलं जातंय, असं मुश्रीफ म्हणाले. जर का कायदा सुव्यवस्था बिघडली तर याला विरोधी पक्ष जबाबदार असेल.आता शिव्या देण्याची मालिका सुरू झाली, आम्ही देखील अशा शिव्या देऊ की ज्याने त्यांना झोपा लागणार नाहीत, अशी टीका मुश्रीफ यांनी केली.
धमकी द्यायची आवश्यकता नाही, आम्ही कुणाला घाबरत नाही- चंद्रकांत पाटील
हसन मुश्रीफ यांच्या टीकेला उत्तर देताना भाजप नेते चंद्रकांत पाटील म्हणाले की, कुणी कुणाला धमकी द्यायची आवश्यकता नाही. आम्ही कुणाला घाबरत नाही. सुरुवात कुणी केली महत्त्वाचे नाही. महाराष्ट्राची राजकीय संस्कृती बिघडत चालली आहे. तुम्ही जे पेरता तेच उगवतं. एकत्र बसून बिघडलेली राजकीय संस्कृती नीट केली पाहिजे. अन्यथा याचा शेवट काहीही होऊ शकतो. भाजपच्या नेत्यांवरही खूप खालच्या शब्दात टीका होतात. राज्यात कोण चंपा म्हणतं, कोण टरबुजा म्हणतं, हे कसं चालतं? असं चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं.
काय म्हणाले होते गोपीचंद पडळकर?
शरद पवार हे महाराष्ट्राला लागलेला कोरोना आहे असं माझं मत आहे. कारण अनेक वर्षांपासून ते महाराष्ट्राचं नेतृत्त्व करत आहेत. राज्यातील बहुजनांवर अत्याचार करण्याची भूमिका त्यांची कायम राहिली आहे आणि पुढेही चालू ठेवतील. त्यांच्याकडे ना कुठली विचारधारा आहे, ना कुठला अजेंडा आहे, ना व्हिजन आहे. फक्त छोट्या छोट्या समूह गटांना भडकावून आपल्या बाजूला करणं, त्यांच्यावरच अन्याय करायची अशी त्यांची भूमिका आहे, असं गोपीचंद पडळकर यांनी म्हटलं होतं. यावरून त्यांच्यावर सर्व स्तरातून टीका होत आहे.
संबंधित बातम्या
- शरद पवार हे महाराष्ट्राला लागलेला कोरोना : गोपीचंद पडळकर
- लायकी बघून बोलावं, सूर्यावर थुंकू नये; पडळकरांच्या वक्तव्यावर अजित पवार यांची प्रतिक्रिया
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)