गोंदियात भोंदू डॉक्टरच्या अटकेविरोधात ग्रामस्थांचा रास्तारोको
सर्पदंशाने मृत्यू झालेल्या 8 वर्षीय बालकाला पुन्हा जिवंत करण्याचा दावा करणाऱ्या आयुर्वेदिक डॉक्टरला अटक करण्यात आली आहे. मात्र डॉक्टरच्या सुटकेसाठी गावकऱ्यांनी आंदोलन केलं आहे.
गोंदिया : सर्पदंशाने मृत्यू झालेल्या 8 वर्षीय बालकाला पुन्हा जिवंत करण्याचा दावा करणाऱ्या आयुर्वेदिक डॉक्टरला पोलिसांकडून अटक करण्यात आली आहे. गोंदिया जिल्ह्यातील गोरेगाव तालुक्यातील घोटी येथील ही घटना आहे. मात्र डॉक्टरच्या सुटकेसाठी ग्रामस्थांनी रस्त्यावर उतरून आंदोलन केलं.
रविवारी आदित्य गौतम या 8 वर्षांच्या चिमुकल्याचा सर्पदंश होऊन त्याचा मृत्यू झाला. मात्र बालाघाट येथील आयुर्वेदिक डॉक्टर नवीन लिल्हारे यांनी इतर डॉक्टरांच्या सहाय्याने मुलाला 24 तासात पुन्हा जिवंत करण्यात येणार असल्याचा दावा केला. डॉक्टरच्या सांगण्यावरून कुटुंबीय मृत मुलाला पुन्हा घरी घेऊन आले.
मृत बालकावर पुढील उपचाराकरिता औषधी आणण्यास डॉक्टर लिल्हारे बालाघाट येथे परत गेले आणि त्यानंतर रात्री उशिरा परत येऊन पुनःउपचार करण्यात येईल असं मृत मुलांच्या कुटुंबियांना सांगितलं. रात्र डॉक्टर परतल्यानंतर पोलिसांना त्याच्यावर संशय आल्याने त्याला अटक केली.
डॉक्टरला अटक झाल्याची बातमी गावकऱ्यांना समजताच गावकऱ्यांनी राज्य महामार्गावर टायर जाळून रस्ता रोको केला. या प्रकरणात बालाघाट जिल्ह्यातील डॉ. नविन लिल्हारे, डॉ. भुनेश लिल्हारे, डॉ. इंद्रकुमार बघेले या तिघांना अटक करण्यात आली आहे.
या डाक्टरांना सोडण्याकरिता गावकऱ्यांनी पोलीस स्टेशनवर हल्ला चढवत रास्तारोको केला. डाक्टरांना सोडले तर मुलगा जिवंत होऊ शकतो, असा आश्चर्यकारक दावा गावकरी व मृत मुलाच्या कुटुंबियांनी केला आहे आहे.