Satej Patil : कोल्हापूरचा स्वाभिमान कोणी डीवचण्याचा प्रयत्न करू नये ; सतेज पाटलांचा भाजपवर हल्लाबोल
कोल्हापूरचा स्वाभिमान कोणी डीवचण्याचा प्रयत्न करू नये, असा हल्लाबोल गृहराज्यमंत्री सतेज पाटील (Satej Patil ) यांनी भाजपवर केला आहे.

Kolhapur : "कोल्हापूर उत्तर पोटनिवडणुकीसाठी मी स्वतः विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांची भेट घेतली. या दोघांनाही पहिली महिला आमदार द्यावा म्हणून विनंती केली. परंतु, त्यांनी एकले नाही. जयश्री जाधव यांनी देखील चंद्रकांत पाटील यांना भाऊ म्हणून विनंती केली होती. भाजपने ही निवडणूक लावायला नको होती असे सांगत, कोल्हापूर शहराचा स्वाभिमान कोणी डीवचण्याचा प्रयत्न करू नये, असा हल्लाबोल गृहराज्यमंत्री सतेज पाटील (Satej Patil) यांनी भाजपवर केला आहे.
कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदार संघाचे काँग्रेस आमदार चंद्रकांत जाधव यांचे गेल्या काही दिवसांपूर्वी निधन झाले आहे. त्यामुळे या मतदार संघाची पोटनिवडणूक जाहीर झाली आहे. या निवडणुकीसाठी महाविकास आघाडीकडून दिवंगत चंद्रकांत जाधव यांच्या पत्नी जयश्री जाधव यांना उमेदवारी देण्यात आली आहे. त्यांच्या प्रचारार्थ सतेज पाटील बोलत होते. यावेळी ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ, खासदार धर्यशील माने, आमदार ऋतुराज पाटील यांच्यासह अनेक नेतेमंडळी उपस्थित होते.
सतेज पाटील म्हणाले, "महाविकास आघाडी म्हणून आम्ही या निवडणुकीला सामोरे जात आहोत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जो आदेश दिला तो आम्ही मान्य केला आहे. राष्ट्रवादीचे अध्यक्ष खासदार शरद पवार, उद्धव ठाकरे आणि काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी एकत्र बसून निर्णय घेतला आहे. काँग्रेस पक्षाला ही जागा सोडण्याची भूमिका सर्वांनी मिळून घेतली आहे. चंद्रकांत जाधव यांनी सर्वांच्या काळजाला स्पर्श केला आहे. ते सर्वसामान्य नागरिकांचे आमदार होते. चंद्रकांत जाधव हे पिढीजात राजकारणी नव्हते, परंतु, ते लोकांतून आमदार झाले होते.
"कोरोना काळात चंद्रकांत जाधव यांना काळजी घ्या असे, सर्वजण सांगत होते. परंतु, त्यांनी जनता समोर ठेऊन काम केले. कोरोना झाल्यानंतर आम्ही महिनाभर बाहेर पडलो नाही. मात्र, त्यांनी 15 दिवसांत बाहेर पडून कामाला सुरूवात केली. सामान्य माणसाला ते आधार वाट असत. मतदान होईपर्यंत मी आणि हसन मुश्रीफ कोल्हापूर सोडणार नाही. माणुसकी जिवंत असेल तर ताईंच्या पाठीशी भाऊ म्हणून उभा राहा. अण्णांच्या माघारी आता आपली जबाबदारी आहे. जयश्रीताई यांना मत टाकून अण्णांना श्रद्धांजली वाहावी. ज्या चंद्रकांत जाधव यांनी कोल्हापूरसाठी जीव दिला त्यांच्या जयश्री जाधव यांच्यासाठी मदत करा, असे आवाहन सतेज पाटील यांनी यावेळी केले.
ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनीही यावेळी कोल्हापूर जिल्ह्यातील लाखो भाऊ जयश्रीताई यांच्या पाठीशी उभा राहतील असे म्हटले आहे. ते म्हणाले, "चंद्रकांत जाधव हे सातत्याने कोल्हापूरच्या जनतेसाठी काम करत होते. कोरोना झाला असताना देखील ते काम करत राहिले. शिवसेना पक्षाच्या देखील काही भावना होत्या. कारण याठिकाणी कायम शिवसेना विरुद्ध सेना अशी लढाई झाली आहे. परंतु, भाजपने ज्या पद्धतीने शिवसेनेवर टीका केली, ते पाहून सर्व शिवसैनिक जयश्रीताई यांच्या प्रचारासाठी पुढाकार घेतील."
खासदार धैर्यशील माने म्हणाले, "जगात कुठलंही वारं असू दे, ते रोखण्याचं काम कोल्हापूरकर करत असतात. कोल्हापूरकरांना कोणी गृहीत धरू नये. पाय धरला तर डोक्यावर घेतील आणि डोक्यात गेला तर पंचगंगा नदीचा घाट दाखवतील,असी कोल्हापूरची जनता आहे. एखाद्या स्त्रीने आपल्या नवऱ्याचं स्वप्न पूर्ण करायचं ठरवलं तर कुठलीही ताकद अडवू शकत नाही. उद्धव ठाकरे यांनी जयश्रीताई यांना निवडून आणण्यासाठी सर्वांना आदेश दिले आहेत."
जयश्री जाधव म्हणाल्या, घरातील लोकांनी राजकारणात पडायचं नाही असं अण्णांनी (चंद्रकांत जाधव) बजावलं होतं. परंतु, आण्णांची स्वप्न मला पूर्ण करायची आहेत. हसन मुश्रीफ आणि सतेज पाटील हे भावाप्रमाणे पाठीशी उभा राहिले. अण्णा गेल्यानंतर चंद्रकांत पाटील घरी आले होते. यावेळी त्यांनी भाजपकडून लढण्याची विनंती केली होती. परंतु, मी नकार दिला. अण्णांनी खांद्यावर घेतलेला झेंडा पुढे नेणार असे त्यांना सांगितले. चंद्रकांत पाटील हे भावाप्रमाणे असून ते निवडणूक लावतील असं वाटलं नव्हतं."
महत्वाच्या बातम्या























