Kolhapur By Election : शिवसेनेनं कोल्हापूर उत्तर मतदारसंघ काँग्रेससाठी सोडला
Kolhapur By Election : शिवसेनेनं कोल्हापूर उत्तर पोटनिवडणूकीतून माघार घेतली आहे. राज्यातील मित्रपक्ष काँग्रेससाठी शिवसनेनं माघार घेतली आहे.
Kolhapur By Election : कोल्हापूर उत्तर या मतदार संघाची पोटनुविडणूक नुकतीच जाहीर झाली होती. तेव्हापासून सर्वच राजकीय पक्षांनी आपली तयारी सुरु केली होती. महाविकास आघाडी सरकार एकत्र लढणार की आपले उमेदवार वेगवेगळे देणार याची उत्सुकता लागली होती. पण आता नुकत्याच आलेल्या वृत्तानुसार, शिवसेनेनं कोल्हापूर उत्तर पोटनिवडणूकीतून माघार घेतली आहे. मित्रपक्ष काँग्रेससाठी शिवसनेनं माघार घेतली आहे. या निर्णयाची थोड्यात वेळात घोषणा होऊ शकते. कोल्हापूर उत्तर हा शिवसेनेचा हक्काचा मतदारसंघ होता. राजेश क्षीरसागर यांनी निवडणूक लढवण्यासाठी प्रयत्न सुरु केले होते. पण आता शिवसेनेनं काँग्रेससाठी माघार घेतली आहे.
काँग्रेसचे आमदार चंद्रकांत जाधव यांच्या निधनानंतर कोल्हापूर उत्तरची ही जागा रिक्त झाली होती. कोल्हापूर उत्तरची पोटनिवडणूक कधी जाहीर होणार याकडे सर्वच राजकीय पक्षांचे लक्ष लागले होते. अखेर 12 एप्रिल रोजी मतदान होणार असून 16 एप्रिलला मतमोजणी होणार आहे. शिवसेनेनं माघार घेतल्यामुळे आता येथे भाजप विरुद्ध काँग्रेस अशी सरळ लढत होणार आहे. आप पक्षानेही येथे आपला उमेदवार दिला आहे. आगामी कोल्हापूर पोटनिवडणुकीत करूणा शर्मा या शिव शक्तीकडून लढणार आहेत.
कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदार संघातून निवडणूक लढवण्यासाठी अनेक उमेदवार इच्छुक आहेत. शिवसेनेच्या आमदाराचा पराभव करून चंद्रकांत जाधव हे काँग्रेसचे आमदार म्हणून निवडून आले होते. मात्र कोरोना काळात त्यांचं निधन झाले. या रिक्त जागी सुरुवातीला बिनविरोध निवडणूक होईल असं वाटलं होतं. पण आता येथे काँग्रेस आणि भाजप अशी सरळ लढत होणार आहे. भाजपने देखील आपल्या उमेदवाराची तयारी सुरू केली असून लवकरच ते उमेदवाराचे नाव घोषित करण्याची शक्यता आहे.
जयश्री जाधव यांनी भाजपकडून लढण्यास नकार दिला
चंद्रकांत जाधव यांच्या निधनानंतर सांत्वन करण्यासाठी गेलेल्या भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांनी जयश्री जाधव यांना भाजपकडून पोटनिवडणूक लढवण्याची विनंती केली होती. मात्र त्यांनी स्पष्टपणे नकार दिला होता. जयश्री जाधव या भाजपच्या नगरसेविका होत्या. त्यामुळे त्यांनी भाजपच्या तिकिटावर पोटनिवडणूक लढावी अशी इच्छा चंद्रकांतदादा यांनी व्यक्त केली होती. मात्र त्यांनी भाजपकडून निवडणूक लढण्यास नकार दिला. त्यामुळे शिवसेना जर रिंगणात उतरणार असेल तर महाविकास आघाडीतील दोन पक्ष आणि भाजप अशी तिरंगी लढत होऊ शकते.
पोटनिवडणुकीचा सविस्तर कार्यक्रम
उमेदवारी अर्ज दाखल करण्याची तारीख 17 मार्च
उमेदवारी अर्ज दाखल करण्याची अंतिम तारीख 24 मार्च
अर्जांची छाननी 25 मार्च
अर्ज मागे घेण्याची अंतिम तारीख 28 मार्च
मतदान 12 एप्रिल आणि मतमोजणी 16 एप्रिलला होणार