CM Eknath Shinde : आपलं पाप दुसऱ्याच्या माथी मारायचं, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा नाव न घेता उद्धव ठाकरेंना टोला
राज्यातील प्रकल्प बाहेर गेले हे वाईटच आहे. मात्र, आपलं पाप दुसऱ्याच्या माथी मारायचं, असे म्हणत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचे नाव न घेता टोला लगावला.
CM Eknath Shinde on Uddhav Thackeray : राज्यातले प्रकल्प आपल्या राज्यातच राहिले पाहिजेत. ते बाहेर गेले हे वाईटच आहे. मात्र, आपलं पाप दुसऱ्याच्या माथी मारायचं, असे म्हणत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचे (Uddhav Thackeray) नाव न घेता टोला लगावला. डोंबिवली मध्यवर्ती शाखेत भेट दिल्यानंतर मुख्यमंत्री शिंदे यांनी कार्यकर्त्यांना संबोधित केलं. शिंदे-फडणवीस सरकारमुळेच प्रकल्प राज्यबाहेर जात असल्याची टीका होत आहे. या टिकेला त्यांनी प्रत्युत्तर दिले. जादूची कांडी एकदा फिरवली की उद्योग आले नी पुन्हा जादूची कांडी फिरवली की उद्योग गेले असं होत नाही, असेही मुख्यमंत्री म्हणाले.
नजीकच्या काळात मोठे उद्योग राज्यात येणार
प्रकल्प कोणामुळे गेला. याबाबत आमच्या लोकांनी तारखानिहाय तपशीलवार माहिती दिली असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले. प्रकल्प गेला हे वाईटच आहे. राज्यातील प्रकल्प आपल्या राज्यातच राहिले पाहिजेत. आपल्या लोकांना रोजगार मिळाला पाहिजे असेही शिंदे म्हणाले. या तीन महिन्यांमध्ये आमच्या सरकारने उद्योग आणण्यासाठी काय केलं आणि अडीच वर्षांमध्ये अगोदरच्या लोकांनी काय केलं हे आपल्यासमोर ठेवणार असल्याचेही मुख्यमंत्री म्हणाले. नजीकच्या काळात मोठ मोठे उद्योग या राज्यात आल्याशिवाय राहणार नाहीत. हजारो लाखो लोकांच्या हाताला काम मिळाल्याशिवाय राहणार नाही असे आश्वासनही त्यांनी यावेळी दिलं. आपल्या सगळ्यांच्या शुभेच्छांमुळं आशीर्वादामुळं मी मुख्यमंत्री झालोय. म्हणून माझं कर्तव्य आहे की, या राज्याला विकासाकडे न्यायचं असेही शिंदे म्हणाले. हे राज्य विकासाभिमुख, लोकाभिमुख आहे. कल्याण डोंबिवलीमध्ये अमुलाग्र बदल घडवण्यासाठी आम्ही कुठेही कमी पडणार नसल्याची खात्रीही यावेळी शिंदेनी दिली. आपलं प्रेम हीच आमची ऊर्जा आहे, आपलं प्रेम कायम असू द्या असेही शिंदे यावेळी म्हणाले.
प्रकल्प बाहेर जाण्यावरुन विरोधकांची सरकारवर टीका
शिंदे-फडणवीस सरकारच्या (Shinde-Fadnavis Government) अपयशामुळेचं राज्यातील प्रकल्प राज्याबाहेर गेले असल्याची टीका वारंवार विरोधकांकडून होत आहे. दीड-दीड लाख मुला मुलींना रोजगार मिळणार होते, असे प्रकल्प बाहेर गेले आहेत. हे सगळे सरकारच्या अपयशामुळं झाल्याचे विरोधकांनी म्हटलं आहे. फॉक्सकॉन वेदांता (vedanta foxconn project) आणि टाटा एअरबस (Tata Airbus) प्रकल्प महाराष्ट्राबाहेर गेल्यानंतर आधीचं सरकार आणि आताचं सरकारमधील नेते एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करत आहेत. पत्रकार परिषदा घेऊन आम्ही काय काय प्रयत्न केले हे सांगत आहेत. महाराष्ट्राच्या बाहेर गेलेली ही गुंतवणूक आणि त्यामुळं महाराष्ट्राच्या हक्काचा गेलेला रोजगार यामुळं आधीच चिंतेत असलेल्या महाराष्ट्राच्या जनतेला धक्का असल्याचे विरोधांनी म्हटलं आहे. त्यांच्या या टिकेला एकनाथ शिंदे यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.
महत्त्वाच्या बातम्या: