सरकार पडेल म्हणणे म्हणजे स्वतःचे आमदार टिकवून ठेवण्यासाठी केविलवाणा प्रयत्न: मुख्यमंत्री
Bhandara: आम्ही 50 खोके घेणारे नाही, तर विकासासाठी 200 खोके म्हणजेच विकासासाठी 200 कोटी देणारे आहोत, अशी गर्जना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जाहीर सभेत केली.
![सरकार पडेल म्हणणे म्हणजे स्वतःचे आमदार टिकवून ठेवण्यासाठी केविलवाणा प्रयत्न: मुख्यमंत्री Chief Minister Eknath Shinde gave a strong reply to Uddhav Thackeray who criticized the government in the state सरकार पडेल म्हणणे म्हणजे स्वतःचे आमदार टिकवून ठेवण्यासाठी केविलवाणा प्रयत्न: मुख्यमंत्री](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/10/31/0075a0b864755835c6b10f423e64a87d1667194986550566_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Bhandara News: आमचे सरकार तीव्र गतीने काम करणारे आहे. त्यामुळे काहींना पोटशूळ उठत आहे. म्हणूनच राज्यातील सरकार पडणार, अशा वावड्या वारंवार उठवल्या जात आहे, असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी आज भंडाऱ्यात म्हटलं आहे. स्वतःचे आमदार टिकवून ठेवण्यासाठी हे केविलवाणा प्रयत्न केला जात आहे, अशा शब्दात त्यांनी उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या सरकार पडणार असल्याच्या दाव्याला उत्तर दिलं. भंडाऱ्यात विविध विकास कामांच्या भूमिपूजन नंतर जाहीर सभेत बोलत होते.
महाविकास आघाडी आपलं पाप आमच्या माथ्यावर मारत आहे- मुख्यमंत्री
पुढे शिंदे म्हणाले, सरकार पडेल याचं काहीच लॉजिक विरोधकांकडे नाही. फक्त स्वतःचे आमदार पक्षात टिकविण्याची धडपड करण्यात येत आहे. आमच्याकडे 170 आमदार आहेत. तसेच दररोज नवीन आमदार आणि खासदार आमच्यासोबत येण्यासाठी संपर्क साधत असल्याचा दावाही त्यांनी केला. या सभेत मुख्यमंत्र्यांनी प्रकल्प राज्याबाहेर जात असल्याच्या आरोपांनाही सडेतोड उत्तर दिले. कोणताही मोठा प्रकल्प दोन तीन महिन्यात बाहेर जातो का किंवा राज्यात येतो का? ती काय जादूची कांडी आहे. असे विचारत मुख्यमंत्र्यांनी महाविकास आघाडी आपलं पाप आमच्या माथ्यावर मारत असल्याचे सांगितले. आमचे सरकार काम करणारे सरकार असून आम्ही राज्यात उद्योग आणू, अशी ग्वाही यावेळी त्यांनी दिली.
भंडारापर्यंत पोहोचणार समृद्धी महामार्गः मुख्यमंत्री
पुढे मुख्यमंत्री म्हणाले, 'समृद्धी महामार्गाचा (samruddhi mahamarg) नागपूर ते शिर्डी दरम्यान काम पूर्ण झालं आहे. सर्वांचा आग्रह आहे की समृद्धी महामार्ग नागपूर पासून पुढे भंडारा (Bhandara) आणि गडचिरोली (Gadchiroli) पर्यंत आला पाहिजे. समृद्धी महामार्ग आम्ही भंडारापर्यंत आणण्याचा निर्णय घेतल्याचे शिंदे यांनी सांगितले. आमच्या आमदारांवर पन्नास खोके घेतल्याचा आरोप केला जातो. मात्र आम्ही 50 खोके घेणारे नाही, तर विकासासाठी 200 खोके म्हणजेच विकासासाठी 200 कोटी देणारे आहोत, असंही मुख्यमंत्र्यांनी या जाहीर सभेत केली. मुख्यमंत्री झाल्यानंतर एकनाथ शिंदे यांची ही विदर्भातील पहिलीच जाहीर सभा होती.
गजानन किर्तीकर यांच्या अनुभवाचा फायदा होईल…
ज्येष्ठ नेते गजानन किर्तीकर यांनी काल शिंदे गटात प्रवेश घेतला. यासंदर्भात बोलताना ते म्हणाले की काल गजानन कीर्तीकर आमच्याकडे आलेत. एक वरिष्ठ नेते खासदार आमच्याकडे आले त्यांच्या अनुभवाचा फायदा आम्हाला होईल, त्यांचं मार्गदर्शन, त्याच्या कामाचा अनुभव याचा फायदा आम्हाला आणि महाराष्ट्राला होईल, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलं.
हेही वाचा
उर्जा उपकरण निर्मिती प्रकल्प राज्याबाहेर? देवेंद्र फडणवीस म्हणाले, 'महाविकास आघाडीचं अपयश आमच्या माथी मारु नये'
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)