Pravin Darekar : राज्यात सरकार पुरस्कृत गुंडगिरी, आम्हाला डिवचण्याचा प्रयत्न केला तर स्वस्थ बसणार नाही, प्रविण दरेकरांचा हल्लाबोल
राज्यात गुंडगिरी सुरु असून, ही सरकार पुरस्कृत गुंडगिरी असल्याचा आरोप विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी केला. नेते या गुंडगिरीचे समर्थन करत असल्याचे दरेकर यावेळी म्हणाले.
Pravin Darekar : मोहित कंबोज रस्त्यावरुन जात असताना त्यांना जीवे मारण्याचा प्रयत्न झाला. नवनीत राणा यांच्या घरापर्यंत कार्यकर्त्यांना जाण्याची मुभा दिली. राज्यात गुंडगिरी सुरु असून, ही सरकार पुरस्कृत गुंडगिरी असल्याचा आरोप विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी केला. नेते या गुंडगिरीचे समर्थन करत असल्याचे म्हणत दरेकर यांनी शिवसेनेवर टीका केली. राज्यात कायदा हातात घेण्याचं काम सुरु असल्याचेही दरेकर म्हणाले.
भाजपच्या सर्व आमदारांनी मिळून पत्रकार परिषद घेतली. यावेळी प्रविण दरेकर बोलत होते. यावेळी त्यांनी कायदा आणि सुव्यवस्थेवरुन राज्य सरकारवर टीका केली. ज्या पक्षाचे सरकार आहे, त्याच पक्षाचे कार्यकर्ते कायदा हातात घेण्याचे काम करत आहेत. पोलखोल होऊ नये म्हणून शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी, युवासेनेच्या पदाधिकाऱ्यांनी भाजपच्या रथावर हल्ला केल्याचे दरेकर म्हणाले. त्यामुळे राज्यातील कायदा सुव्यवस्था पूर्णपणे ढासळली आहे.
ज्या पक्षाचे मुख्यमंत्री आहेत, त्याच पक्षाचे कार्यकर्ते पोलिसांच्या समोर गुंडगिरी करत आहेत. महाराष्ट्रात पोलिसांच्या समोर एवढी दहशत कधीच झाली नव्हती. या गुंडगिरीचे समर्थन शिवसेनेचे नेते करत आहेत. असा प्रकारचे समर्थन करणार असाल तर समोरचे कार्यकर्ते हातबांधून बसणार नाहीत असेही दरेकर म्हणाले. भाजप हा देशातील ताकदवान पक्ष आहे. त्यामुळे आमच्या शेपटावर पाय ठेवून आम्हाला डिवचण्याचा प्रयत्न केला तर भाजप स्वस्थ बसणार नाही. आम्ही कायद्याला, लोकशाहीला माणणारे आहोत. लोकशाही मार्गाने जे काही करायचे ते करण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे.
आम्ही मुंबई पोलिसांना निवेदन देणार आहोत. शिवसेनेचे कार्यकर्ते दहशत पसरवण्याचा प्रयत्न करत आहेत. सरकारने तातडीने याला आवर घालावी. हे सगळ घडत असताना राज्याचे मुख्यमंत्री मुग गिळून गप्प असल्याचे दरेकर म्हणाले. यापूर्वी राज्यात असे चित्र कधीच नव्हते असे दरेकर म्हणाले. संस्कृतीला काळीमा फासण्याचे काम या महाविकास आघाडीच्या सरकारने केले असल्याचे दरेकर यावेळी म्हणाले. हा साधुसंतांचा शांतता राखणारा महाराष्ट्र आहे. पण जाणीवपूर्वक जर कोणाची शांतता मजबुरी समजत असाल तर हा महाराष्ट्र क्रांतीकारक आहे असे दरेकर यावेळी म्हणाले.
महत्त्वाच्या बातम्या: