BEST Election : ठाकरे बंधूंचा पॅनेल पिछाडीवर, तर प्रसाद लाड यांचा पॅनेल आघाडीवर, थोड्याच वेळात निकाल स्पष्ट होणार
दोन्ही ठाकरेंनी एकत्र येत लढवलेल्या या बेस्टच्या निवडणुकीत त्यांचे पॅनेल सध्या पिछाडीवर आहे. तर भाजप आमदार प्रसाद लाड यांचे समृद्धी पॅनल आघाडीवर आहे. दरम्यान, पुढील दोन तासात निकाल स्पष्ट होणार आहे.
BEST Election 2025 : राज ठाकरे (Raj Thackeray) आणि उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) एकत्र आल्यामुळे प्रतिष्ठेच्या झालेल्या दी बेस्ट एम्प्लॉईज को ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीच्या निवडणुकीसाठी काल मुंबईत (Mumbai) मतदान पार पडलं होतं. त्यानंतर आज मतमोजणीला सुरुवात झाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, दोन्ही ठाकरेंनी एकत्र येत लढवलेल्या या बेस्टच्या निवडणुकीत त्यांचे पॅनेल सध्या पिछाडीवर आहे. तर भाजप आमदार प्रसाद लाड यांचे समृद्धी पॅनल आघाडीवर आहे. दरम्यान, पुढील दोन तासात निकाल स्पष्ट होणार आहे.
मतमोजणीत 35 पैकी 22 राउंड पूर्ण
दरम्यान, बेस्टच्या निवडणुकीच्या मतमोजणीत 35 पैकी 22 राउंड झाले हेत. 6 हजार 700 मतांची मोजणी पूर्ण झाली आहे. यामध्ये 2 हजार 598 कपबाशीला म्हणजे प्रसाद लाड यांच्या पॅनेलला मते मिळाली आहेत. तर दि बेस्ट वर्कर्स युनियन पुरस्कृत शशांकराव पॅनलच्या आकाशकंदीलला 1 हजार 907 मते मिळाली आहे. तर दोन्ही ठाकरे बंधुच्या उत्कर्ष पॅनेलला 1 हजार 609 मते मिळाली आहे.
या निवडणुकीसाठी ठाकरे बंधूंच्या (Thackeray Brothers) उत्कर्ष पॅनेलसमोर महायुतीच्या नेत्यांनी सहकार समृद्धी पॅनेल रिंगणात उतरवले आहे. गेल्या 25 वर्षांपासून बेस्ट पतसंस्थेवर शिवसेनेचे एकहाती वर्चस्व होते. या काळात पतसंस्थेत मोठा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप महायुतीच्या नेत्यांनी केला होता.
ठाकरे बंधूंना आव्हान देण्यासाठी आमदार प्रसाद लाड आणि प्रवीण दरेकर मैदानात
ठाकरे बंधूंनी उत्कर्ष पॅनल या निवडणुकीत उतरवले आहे. यामध्ये ठाकरेंच्या शिवसेनेची बेस्ट कामगार सेना आणि मनसे बेस्ट कामगार कर्मचारी सेना यांची युती झाली आहे. तर दुसरीकडे महायुतीने सुद्धा ठाकरे बंधूंना आव्हान देण्यासाठी आमदार प्रसाद लाड आणि प्रवीण दरेकर यांची भाजप प्रणित श्रमिक उत्कर्ष सभा, नितेश राणे यांची समर्थ बेस्ट कामगार संघटना तर शिंदेंच्या शिवसेनेचे किरण पावसकर यांची राष्ट्रीय कर्मचारी सेना यांनी एकत्रित मिळून सहकार समृद्धी पॅनल निवडणुकीच्या रिंगणात उतरवले आहे. त्यामुळे या बेस्ट पतपेढीच्या निवडणुकीत उत्कर्ष पॅनल बाजी मारणार की सहकार समृद्धी पॅनल? याची उत्सुकता असणार आहे. या दोन पॅनल व्यतिरिक्त बेस्ट वर्कर्स युनियन पुरस्कृत शशांकराव पॅनल यांनी सुद्धा आपले 21 उमेदवार रिंगणात उतरवले आहेत. गेली 25 वर्षे शिवसेनेची सत्ता मुंबई महापालिकेत असल्यामुळे बेस्ट पतपेढीमध्ये सुद्धा मागील नऊ वर्षापासून बेस्ट कामगार सेनेचे वर्चस्व आहे.
कोणत्या संघटनांचे किती उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात ?
उत्कर्ष पॅनल (ठाकरे बंधू)
एकूण 21 उमेदवार
19- बेस्ट कामगार सेना ( ठाकरेंची शिवसेना संघटना)
2- मनसे बेस्ट कामगार कर्मचारी सेना ( मनसे संघटना)
सहकार समृद्धी पॅनल - एकूण 21 उमेदवार
8 - श्रमिक उत्कर्ष सभा ( भाजप प्रणित संघटना )
5 - समर्थ बेस्ट कामगार संघटना ( नितेश राणे यांची भाजप प्रणित संघटना )
4 - राष्ट्रीय कर्मचारी सेना ( शिंदे शिवसेना प्रणित संघटना )
3 - एससी एसटी वेल्फेअर असोसिएशन
1 - दि इलेक्ट्रिक युनियन
























