Babri Masjid Demolition: बाबरी मशीद पाडण्यात कोण आघाडीवर होतं? तेव्हा नेमकं काय झालं?
बाबरी घटनेला 30 वर्ष लोटली आहेत पण आजही बाबरीच्या मुद्द्यावरून देशात राजकारण सुरू आहे. भाजप माजी प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केलेल्या वादग्रस्त वक्तव्यावरून पुन्हा वातावरण तापलं आहे.
मुंबई : देशाला हादरवून सोडणाऱ्या, राजकारणाची दिशा बदलवणाऱ्या बाबरी मशिदीच्या विध्वंस (Babri Masjid Demolition) प्रकरणाला 30 वर्षे पूर्ण झाले . 6 डिसेंबर 1992 रोजी कारसेवकांनी बाबरी मशिदीचा विध्वंस केला होता. या घटनेमुळे नंतरच्या काळात देशभर दंगली उसळल्या आणि देशाची शांती-सुव्यवस्था बिघडली. त्या दंगलीत तब्बत 2000 हून अधिक नागरिकांना आपला जीव गमवावा लागला होता. आता भाजप माजी प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केलेल्या वक्तव्यानंतर पुन्हा या मुद्द्यावरुन आरोप प्रत्यारोपांना सुरुवात झाली. पण तेव्हा नेमकं काय झालं? हे जाणून घेऊया.
30 वर्षापूर्वी कारसेवकांनी बाबरी मशिदीचा घुमट पाडला. त्यावेळी उत्तर प्रदेशात कल्याण सिंह यांचं सरकार होतं. अयोध्येतील परिस्थिती भयंकर झाली होती. वरीष्ठ पोलीस अधिकारी परिस्थिती हाताळण्याचा प्रयत्न करत होते. मात्र कारसेवकांना रोखण्याची हिंमत कुणीही करत नव्हतं. कारसेवकांवर कुणीही गोळी चालवणार नाही, असे आदेश मुख्यमंत्री कल्याण सिंह यांनी आधीच दिले होते.
भाजपचे ज्येष्ठ नेते लाल कृष्ण अडवाणी म्हणाले, मााझ्यासाठी अतिशय दु:खद दिवस होता. ही सर्व परिस्थिती माझ्या नियंत्रणाबाहेर होती. यामागे नेमके कोण होते हे मला माहित नाही. परंतु ही सर्वात मोठी चूक होती. मी उमा भारतीला पाठवलं, तर तीने सांगितलं की लोक माझं ऐकत नाहीत. ते सगळे मराठीत बोलत आहेत. त्यानंतर मी प्रमोद महाजनांकडे गेलो. परंतु प्रमोदचे प्रयत्न देखील अयशस्वी ठरले.
नरसिंहरावांनी यावर निर्णय घेणं टाळलं : माधव गोडबोले
तत्कालीन गृहसचिव माधव गोडबोले म्हणाले, बाबरी प्रश्न हाताळताना काँग्रेसने तत्कालीन पंतप्रधान पी.व्ही नरसिंहराव यांना बळीचा बकरा केला. काँग्रेसच्या रणनितीनुसार, जर बाबरी मशिद वाचली, तर त्याचं सर्व श्रेय पक्षाला मिळावं. आणि जर ती पडली, तर त्याचा सर्व दोषारोप पंतप्रधानांवर जावा. त्यामुळेच ते शेवटपर्यंत द्विधा मनस्थितीत होते. म्हणून नरसिंहरावांनी यावर निर्णय घेणं टाळलं. बाबरी प्रश्न हाताळण्यासंदर्भात आम्ही तत्कालीन पंतप्रधानांना सूचना केल्या होत्या. पण त्या अंमलात आल्या नाहीत. याचं कारण मला त्यावेळी कळलं नाही.
शिवसैनिकांनी हे केलं असेल तर मला याचा अभिमान
बाबरीचा ढाचा पडल्यानंतर हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरेंनी म्हटलं होतं की, जर माझ्या शिवसैनिकांनी हे केलं असेल तर मला याचा अभिमान आहे.
मी कारसेवक म्हणून दोन वेळा अयोध्येला गेलो, पंधरा दिवस तुरुंगवास भोगला : एकनाथ खडसे
अयोध्यामध्ये श्री राम मंदिर बांधण्यासाठी जी काय बाबरी मशीद तोडली त्याचा मी स्वतः साक्षीदार आहे. दोन वेळा मी कार सेवक म्हणून अयोध्यामध्ये गेलो होतो. त्या ठिकाणी पोलिसांचा भरपूर मार मी खाल्लाआहे. कोण यामध्ये होतं कोण नव्हतं हे मला माहित आहे. कारण मी दोन्ही वेळा गेलो. पंधरा दिवस मी तुरुंगामध्ये होतो. त्यामुळे मला माहित होतं की कोण कोणत्या पक्षाचे कोणते लोक त्या ठिकाणी होते. यामुळे या विषयावर अधिक न बोललेलं बरं अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादीचे जेष्ठ नेते एकनाथराव खडसे यांनी दिली आहे
काय आहे बाबरी प्रकरण?
अयोध्येत 6 डिसेंबर 1992 रोजी भाजप आणि विश्व हिंदू परिषदेची रॅली निघाली.
रॅलीमध्ये तब्बल 1 लाख 50 हजार कारसेवकांचा समावेश होता.
राम मंदिराच्या उभारणीसाठी कारसेवकांनी बाबरी मशिदीला वेढा घातला.
लालकृष्ण अडवाणी, उमा भारती आणि मुरली मनोहर जोशींकडे रॅलीचं नेतृत्व होतं.
पोलिसांच्या बंदोबस्तानंतरही कारसेवक आणि कार्यकर्त्यांनी बाबरी मशिदीवर चढाई केली.
कारसेवक आणि कार्यकर्त्यांनी मशिदीचा घुमट पाडला.
या विध्वंसानंतर दिग्गज नेत्यांसह 68 जणांवर ठपका ठेवण्यात आला.
बाबरी मशिदीची जागा ही मूळ राम जन्मभूमी असल्याचा कारसेवकांचा दावा आहे.
मुघलांनी त्या जागी मशिद उभारल्याचाही कारसेवकांनी दावा केला