सारथी संस्थेतील भ्रष्टाचाराची आता दुसऱ्या समितीकडून पुन्हा चौकशी
सारथी संस्थेतील भ्रष्टाचाराची आता पुन्हा चौकशी होणार आहे. पहिल्या समितीची अहवाल सादर झाला असताना त्या अहवालाची पुन्हा पडताळणी करण्यासाठी दुसरी समिती नियुक्त करण्यात आली आहे.
मुंबई : सारथी संस्थेतील भ्रष्टाचाराची आता दुसऱ्या समितीकडून पुन्हा चौकशी होणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. सत्तेत असलेल्या दोन पक्षांच्या परस्परविरोधी भूमिकेमुळे असं करण्याची वेळ आली असल्याची माहिती आहे. पहिल्या चौकशी समितीमध्ये आर्थिक गैरव्यवहार आणि प्रशासकीय अनियमिततेवर ताशेरे ओढण्यात आले आहेत. परंतु पहिल्या चौकशी समितीच्या अहवालाची पुन्हा पडताळणी करण्यासाठी दुसरी समिती नियुक्त करण्यात आली आहे. नवीन समिती येत्या दहा दिवसात आपला अहवाल देणार आहे.
पहिल्या चौकशी समितीचा अहवाल राजकीय दबावापोटी तयार करण्यात आल्याचा संशयामुळे पुन्हा दुसरी समिती स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती आहे. पहिल्या समितीच्या चौकशीमध्ये साडेतीन लाख रुपये हे एकाच व्यक्तीला अनावश्यक दिले गेल्याचे उघड झालं आहे.
सारथी संस्थेच्या कामकाजाची चौकशी करण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या पहिल्या समितीच्या अहवालात ताशेरे ओढण्यात आले आहेत. किशोर राजे निंबाळकर यांच्या अध्यक्षतेखाली चौकशी समिती नेमण्यात आली होती. आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या सचिवांच्या या चौकशी समितीमध्ये सारथी समितीच्या कामकाजामध्ये अनियमितता आढळून आल्या. मोठ्या प्रमाणामध्ये आर्थिक गैरव्यवहार आणि प्रशासकीय अनियमितता आढळून आली. या अनियमिततेचा अहवाल 5 फेबुवारी 2020 ला अहवाल सादर करण्यात आला होता.
राज्यातील मराठा, मराठा-कुणबी व कुणबी-मराठा यांच्या सामाजिक, आर्थिक व शैक्षणिक विकासासाठी स्थापन करण्यात आलेल्या सारथी संस्थेतील गैरव्यवहारप्रकरणी सामान्य प्रशासन विभागाचे अपर मुख्य सचिव सीताराम कुंटे यांच्या अध्यक्षतेखाली त्रिसदस्यीय समितीची स्थापना करण्यात आली आहे. या समितीचा अहवाल येत्या दहा दिवसात येणार असून अहवालानंतर दोषींवर कठोर कारवाई करण्यात येईल, असे बहुजन कल्याण मंत्री विजय वडेट्टीवार यांनी विधानपरिषदेत सांगितलं होतं.
सारथी गैरव्यवहारप्रकरणाची चौकशी करण्यासाठी मदत व पुनर्वसन विभागाचे सचिव किशोरराजे निंबाळकर यांच्या अध्यक्षतेखाली चौकशी समिती नेमण्यात आली होती. या समितीने पुणे येथील सारथीच्या मुख्यालयात जाऊन या प्रकरणाची चैाकशी केली होती. त्यानंतर या प्रकरणाची अधिक चैाकशी करण्यासाठी कुंटे यांच्या अध्यक्षतेखाली ही समिती गठित करण्यात आली आहे. सारथी अंतर्गत येणा-या विद्यार्थ्यांचे शिष्यवृत्ती, विद्यावेतनाचे पैसे थकित असल्यास ते येत्या १५ दिवसाच्या आत दिले जातील, असे वडेट्टीवार यांनी सांगितलं होंत.
संबंधित बातम्या
सारथी गैरव्यवहार प्रकरणी चौकशी अहवाल दहा दिवसांत येणार, विजय वडेट्टीवार यांचं विधानपरिषदेत आश्वासन
सारथी समितीच्या कामकाजात भ्रष्टाचार, आता त्रिसदस्यीय समितीकडून होणार चौकशी