Mahadaji Shinde: महादजी शिंदेंच्या कर्तबगारीमुळे भारतात इंग्रजांच्या अंमलाची सुरुवात 50 वर्षे उशीरा : डॉ. सदानंद मोरे
पानीपतच्या लढाईनंतर मराठे संपले असं सर्वजण म्हणत असताना मराठ्यांनी अवघ्या दहाच वर्षात दिल्ली काबीज केली. त्यामुळे ब्रिटिशांना मात्र भारतावर सत्ता प्रस्थापित करायला 50 वर्षे जास्त लागली.
Capture of Delhi (1771): पानिपतच्या पराभवाचा कलंक मराठ्यांनी अवघ्या दहा वर्षात पुसून काढला. 10 फेब्रुवारी 1771 साली मराठ्यांनी महादजी शिंदेंच्या नेतृत्वाखाली दिल्लीतील लाल किल्ल्यावर भगवा फडकावला. महादजी शिदेंच्या कर्तबगारीमुळेच इंग्रजांची भारतातील सत्ता 50 वर्षांनी लांबली असल्याचं मत ज्येष्ठ इतिहासकार डॉ. सदानंद मोरे यांनी व्यक्त केलं.
डॉ. सदानंद मोरे म्हणाले की, "महाराष्ट्रातील लोकांनी महादजी शिंदेंवर मोठा अन्याय केला आहे. महादजी शिंदे यांनी शिवाजी महाराजांच्या नंतर मोठी कर्तबगारी दाखवली. दिल्लीची सत्ता ताब्यात घेऊन दिल्लीच्या राजकारणाला एक नवी दिशा दिली. महादजी जर नसते तर रोहिल्यांनी किंवा ब्रिटिशांनी त्याच वेळी दिल्ली काबीज केली असती आणि इतिहासही वेगळा झाला असता."
महादजी शिंदेंच्या कर्तबगारीमुळे इंग्रजांची भारतातील सत्ता 50 वर्षे लांबली असं मत इतिहासकार डॉ. सदानंद मोरे यांनी व्यक्त केलं. डॉ. सदानंद मोरे म्हणाले की, "महादजी शिंदेंना आंतरराष्ट्रीय राजकारणाची जाण होती. त्यांनी मराठ्यांचा सर्वात मोठा विरोधक असलेल्या इंग्रजांना शह देण्यासाठी फ्रेंचांशी संधान बांधले, त्यांना आश्रय दिला. फ्रेंचांच्या मदतीने स्वतंत्र लष्कर तयार केलं, तोफखाना तयार केला, मराठ्यांच्या लष्कराचं आधुनिकीकरण केलं."
डॉ. सदानंद मोरे पुढे म्हणाले की, "इंग्रजांना जे जमलं नाही ते महादजी शिंदेंनी करुन दाखवलं. त्यांनी दिल्लीत मराठ्यांची सत्ता स्थापन केली. महादजी शिंदे हे बहुआयामी व्यक्तीमत्व होतं. त्यांनी भगवतगीतेवर 'माधवदासी' या नावाने मराठीत टीका लिहिली आहे, अनेक अभंग लिहिले. त्या आधी दिल्लीच्या दरबारातील अनेक गायक बादशाहवर ध्रृपदं लिहायची. महादजींच्या काळात अशा गायकांनी त्यांच्यावर ध्रृपदं लिहिली. ते हातामध्ये वीना घेऊन, उभं राहुन भजन करायचे. त्यातून ग्वाल्हेर घराण्याचं संगीत उदयास आलं आहे हे अनेकांना माहिती नाही."
मराठ्यांचा दृष्टीकोन राष्ट्रीय
महादजी शिंदेंना दिल्लीची सत्ता काबीज करण्यापूर्वी अनेकांनी विरोध केला. त्यातल्या त्यात उत्तरेतील अनेक सत्ताधीशांनी महादजींना विरोध केला. या सगळ्यांचा विरोध महादजींनी मोडून काढला. दिल्ली काबीज केल्यानंतर सगळ्या राजपूत संस्थांनांचा महादजींनी पराभव केला होता. मराठ्यांचा दृष्टीकोन हा राष्ट्रीय होता. म्हणून ते अब्दालीशी लढले, ब्रिटिशांसोबत लढले. त्यांनी भारत हा आपला देश समजून त्याचं संरक्षण केलं.
दिल्लीचा बादशाह शाह आलम हा महादजी शिंदेंच्या हातचा बाहुला झाला होता. त्यामुळे महादजी शिंदे हेच खऱ्या अर्थाने दिल्ली चालवत होते. साताऱ्यातील एका गावातील पाटीलकी असलेल्या महादजी शिंदे यांनी दिल्लीची सत्ता काबीज केली. हा प्रवास थक्क करणारा होता असं डॉ. सदानंद मोरे म्हणाले.
संबंधित बातम्या:
- Capture of Delhi (1771): 'दिल्लीचेही तख्त राखितो महाराष्ट्र माझा'; मराठ्यांच्या दिल्ली विजयाला 250 वर्षे पूर्ण
- Capture of Delhi (1771) : दिल्लीत फडकावला 'भगवा', पानीपतच्या पराभवाचा 1771 ला मराठ्यांनी घेतला बदला