(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Capture of Delhi (1771): 'दिल्लीचेही तख्त राखितो महाराष्ट्र माझा'; मराठ्यांच्या दिल्ली विजयाला 251 वर्षे पूर्ण
Marathas Capture of Delhi (1771): महादजी शिंदे यांच्या नेतृत्वाखाली मराठ्यांनी 251 वर्षांपूर्वी म्हणजे 10 फेब्रुवारी 1771 रोजी दिल्लीची सत्ता काबीज केली होती.
Marathas Capture of Delhi (1771): सन 1771 साली दिल्लीवर मराठ्यांनी महादजी शिंदेंच्या नेतृत्त्वाखाली भगवा फडकवला. मराठ्यांनी दिल्लीचा लाल किल्ला जिंकून नजिबखानाचा पुत्र झाबेदाखान यास कैद केले अन् सत्ता काबीज केली. या घटनेला आज 251 वर्षे पूर्ण झाली. पण महादजी शिंदेंचा हा प्रवास काही सोपा नव्हता, त्यांना त्या आधी स्वकीयांशी लढावं लागलं असं मत ज्येष्ठ इतिहासकार डॉ. सदानंद मोरे यांनी मांडलं. त्यांनी एबीपी माझाशी संवाद साधला.
छत्रपती संभाजी महाराजांच्या मृत्यूनंतर मराठा साम्राज्य संपणार का असा सवाल उपस्थित होत असताना मराठे लढले अन् वाढलेही. सन 1771 साली मराठ्यांनी दिल्लीवर भगवा फडकावला. या घटनेचा परिणाम तत्कालीन इतिहासावर झालाच पण आपणही दिल्ली काबिज करू शकतो असा आत्मविश्वास महाराष्ट्राला मिळाला.
डॉ. सदानंद मोरे म्हणाले की, पानीपतच्या पराभवाचा कलंक पुसून सन 1771 साली महादजी शिंदेच्या नेतृत्वाखाली मराठ्यांनी दिल्ली काबिज केली. महादजी शिंदेंचा हा प्रवास संघर्षमय होता. दिल्लीतील राजपूत आणि इतरांना मराठे दिल्लीत यावेत हे मान्य नव्हतं. मुघल सत्ता खिळखिळी झाली होती. आता ती सत्ता कुणी काबीज करायची असा सवाल असताना याचे दावेदार अनेक होते. यामध्ये रोहिले, ज्यांना अफगाणिस्तानच्या सत्ताधीशाचा पाठिंबा होता ते होते. दुसरीकडे नजिबखानचा मुलगा झाबेदखान याचीही नजरही दिल्लीवर होती. कलकत्यामध्ये असलेल्या इंग्रजांना संपूर्ण भारत आपल्या अधिकाराखाली आणायचा होता. त्यामुळे त्यांनाही दिल्ली जिंकायची आस होती.
या व्यतिरिक्त मराठ्यांनाही दिल्ली काबीज करायची होती. त्यावेळचा मुघल बादशाह शाह आलम हा वॉरन हेस्टिंगच्या आश्रयाला गेला होता. तोपर्यंत इंग्रजे हे बलाढ्य झाले होते. त्यामुळे दिल्लीत जो पहिल्यांदा जाईल त्याची सत्ता दिल्लीत राहणार होती. त्यामुळे महादजी शिंदेसमोर ब्रिटिशांचे सर्वात मोठं आव्हान होतं.
शहा आलमला दिल्लीच्या बाहेर काढून झाबेदखानने लाल किल्ला ताब्यात घेतला होता. त्यावेळी मराठ्यांनी झाबेदखानला मारून10 फेब्रुवारी 1771 रोजी दिल्लीची सत्ता हाती घेतली. दिल्ली आहे पण बादशाह नाही अशी अवस्था होती. त्यामुळे महादजी शिंदेंनी शाह आलमची वॉरन हेस्टिंगच्या ताब्यातून सुटका केली आणि त्याला दिल्लीला आणलं.
शाह आलम हे महादजी शिंदेंच्या हातचा बाहुला झाला होता. त्यामुळे महादजी शिंदे यांना बादशाहने मोठा बहुमान दिला होता. त्यामुळे महादजी शिंदे हेच खऱ्या अर्थाने दिल्ली चालवत होते असं मत डॉ. सदानंद मोरेंनी मांडलं.
संबंधित बातमी: