(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Exclusive : राजकीय वाद विसरुन तैलचित्र अनावरण सोहळ्याला यावं, बाळासाहेब ठाकरे यांचं तैलचित्र साकारणाऱ्या चंद्रकला कदम यांचे आवाहन
Balasaheb Thackeray Portrait : बाळासाहेब ठाकरे यांचं तैलचित्र साकारताना मनावर एक दडपण होतं, असं चंद्रकला कदम यांनी 'एबीपी माझा'शी बोलताना सांगितले आहे.
Balasaheb Thackeray Portrait : महाराष्ट्राच्या विधानभवनात बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) यांचं तैलचित्र लावण्यात येणार आहे. दरम्यान, बाळासाहेब ठाकरे यांचं तैलचित्र साकारणाऱ्या चंद्रकला कदम यांनी 'एबीपी माझा'ला एक्स्क्लुझिव्ह मुलाखत दिली आहे. उद्धव ठाकरेंनी हे तैलचित्राचा फोटो पाहिला असून, सर्वांनी राजकीय वाद विसरुन अनावरण सोहळ्याला यावं असं आवाहन बाळासाहेब ठाकरे यांचं तैलचित्र साकारणाऱ्या चंद्रकला कदम यांनी केलं आहे.
चेहरा आणि डोळे काढताना विशेष लक्ष केंद्रित
चंद्रकला कदम म्हणाल्या की, बाळासाहेब ठाकरे हे सर्वांचे लाडके व्यक्तिमत्व आहेत. त्यामुळे बाळासाहेब ठाकरे यांचे तैलचित्र साकारताना मनावर एक दडपण होते. मी माझा जीव ओतून हे तैलचित्र साकरले आहे. मला संपूर्ण दीड महिना तैलचित्र पूर्ण करायला वेळ लागला. बाळासाहेब ठाकरे यांचे व्यक्तिमत्व पाहिलं तर ते चित्रकार होते. लोकांसाठी जे आयुष्य त्यांनी वेचले त्या सगळ्याचा आढावा त्या चेहऱ्यामध्ये त्यांच्या आणायचा होता. चेहऱ्याचा बोलकेपणा आणि दरारा हा बाळासाहेबांचा चेहऱ्यावरील नजरेतून आणण्याचा या चित्रात प्रयत्न केला आहे. चेहरा आणि डोळे काढताना विशेष लक्ष केंद्रित केले."
बाळासाहेब ठाकरे यांचं चित्र माझ्या हातून घडतंय याचा मला आनंद
बाळासाहेब ठाकरे यांच्या एकाच फोटोचा आधार घेऊन हे तैलचित्र साकारले आहे. बाळासाहेब ठाकरे यांना मी जवळून पाहिलं आहे. बाळासाहेब ठाकरे यांनी माझं काम पाहिलं होतं, त्यांना माझे चित्र काढताना स्ट्रोकस आवडायचे. बाळासाहेबांनी मला संसदेतील वीर सावरकरांचे तैलचित्र, गुजरातच्या विधानभवनतील तैलचित्र साकारण्याच्या संधी दिल्या. ज्या बाळासाहेबांनी मला संधी दिली त्या बाळासाहेब ठाकरे यांचं चित्र माझ्या हातून घडतंय याचा मला खूप आनंद आहे.
उद्धव ठाकरे यांनी हे तैलचित्राचा फोटो पाहिलं
"तैलचित्राच्या अनावरणाच्या दिवशी राज ठाकरे, उद्धव ठाकरे यांनी आणि इतर सर्व नेत्यांनी राजकारण बाजूला ठेवावे. एक कलाकार म्हणून माझ्यासाठी हा सन्मान असेल. उद्धव ठाकरे यांनी हे तैलचित्राचा फोटो पाहिलं आहे. राज ठाकरे यांनी अद्याप तैलचित्र पाहिलं नाही. आदित्य ठाकरे यांची मी प्रतिक्रिया तैलचित्रबद्दल वाचली, मात्र तेव्हा माझं चित्र पूर्ण झालं नव्हतं. ते फक्त एक स्केच होते. आता चित्र पूर्ण झाले असून हे चित्र सर्वांना आवडेल. तैलचित्र सर्वांनी ते पाहावे दाद द्यावी हीच कौतुकाची पावती कलाकाराला म्हणून मिळावी ही अपेक्षा आहे, अशा शब्दात त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.
23 जानेवारी रोजी स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्ताने (Balasaheb Thackeray Jayanti) विधीमंडळाच्या सेंट्रल हॉलमध्ये तैलचित्र लावण्यात येणार आहे. बाळासाहेब ठाकरे, महाराष्ट्रातलं एक मोठं नाव आहे. त्यांनी स्वतः शेकडो आमदार खासदार सभागृहात पाठवले पण स्वतः विधीमंडळाच्या राजकारणात सक्रिय सहभाग घेतला नाही. रिमोट कंट्रोल कायम बाळासाहेबांच्या हातात राहिलं. मात्र राजकारणातल्या उल्लेखनीय कामकाजाचा गौरव म्हणून त्याचं तैलचित्र विधीमंडळात लावण्यात येणार आहे.