Eknath Shinde: आम्ही राज ठाकरेंच्या मनसेला ऑफर दिली होती, पण.... एकनाथ शिंदेंचा नवा गौप्यस्फोट
mahim vidhan sabha constituency: माहीम विधानसभा मतदारसंघात सदा सरवणकरांमुळे अमित ठाकरेंसमोर बिकट आव्हान. एकनाथ शिंदेंचा वेगळाच दावा
मुंबई: माहीम विधानसभा मतदारसंघात राज ठाकरे यांचे पुत्र अमित ठाकरेंविरोधात उमेदवार उतरवण्याच्या मुद्द्यावरुन सध्या मनसे आणि शिंदे गटात वितुष्ट निर्माण झाले आहे. महायुतीच्या नेत्यांनी आग्रह करुनही शिंदे गटाच्या सदा सरवणकर (Sada Sarvankar) यांनी माहीम विधानसभा मतदारसंघातून माघार घेतली नव्हती. त्यामुळे राज ठाकरे (Raj Thackeray) संतापल्याची चर्चा होती. त्यांनी शिवतीर्थवर भेटीसाठी आलेल्या सदा सरवणकर यांना माघारी पाठवले होते. या पार्श्वभूमीवर आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी एका इंग्रजी दैनिकाला दिलेल्या मुलाखतीत नवा गौप्यस्फोट केला आहे.
मनसेचे आमच्याशी भांडूप विधानसभा मतदारसंघाबद्दल बोलणे झाले होते. तसेही आम्ही शिवडीत बाळा नांदगावकर यांच्या मतदारसंघात उमेदवार दिलेला नाही. अमित ठाकरे भांडूपमधून लढतील असे आम्हाला सांगण्यात आलं होतं. त्यामुळे आम्ही त्यानुसारच पुढील आखणी केली. पण त्यांनतर राज ठाकरे यांनी अमित यांना थेट माहीम विधानसभेतून उमेदवारीची घोषित केली. यानंतर मी सदा सरवणकर यांच्याशी बोललो. त्यांनी मला सांगितलं की, जर माहीममध्ये अमित ठाकरे आणि ठाकरे गटाचे महेश सावंत यांच्यात डायरेक्ट लढत झाली तर अमितच्या जिंकण्याची शक्यता कमी आहे. परंतु, तिरंगी लढत झाल्यास मात्र आम्हा दोघांपैकी एकाला संधी आहे. यानंतर मी सदा सरवणकरांना राज यांना भेटून माहीमधील जातीय समीकरण समजावायला सांगितले, पण राज ठाकरे त्यांना भेटले नाहीत, असे एकनाथ शिंदे यांनी सांगितले. यावर आता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या गोटातून काही प्रतिक्रिया येणार का, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.
माहीम विधानसभा मतदारसंघात ठाकरे बंधुंची छुपी युती?
माहीम विधानसभेत उद्धव ठाकरे यांनी त्यांचे पुतणे अमित ठाकरे हे पहिल्यांदाच निवडणूक लढवत असूनही त्यांच्याविरोधात उमेदवार कसा दिला, असा प्रश्न अनेकजण उपस्थित करत होते. परंतु, उद्धव ठाकरे यांनी आपला निर्णय कायम ठेवला होता. मात्र, आता माहीम विधानसभा मतदारसंघात ठाकरे बंधुंची छुपी युती आहे का, असा प्रश्न निर्माण झाला आहे. कारण माहीममधून विधानसभा लढणारे राज ठाकरेंचे पुत्र अमित ठाकरे यांच्याविरुद्ध उद्धव ठाकरे आणि अमित यांचे चुलत भाऊ आदित्य ठाकरे यांच्या तूर्तास प्रचारसभा नसल्याचं चित्र दिसत आहे. त्यामुळे काका पुतण्याला छुपी मदत करत आहेत का?, अशी चर्चा सुरु झाली आहे.
शिवसेनेकडून उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांच्या 18 तारखपेर्यंतच्या सभांचे वेळापत्रक जाहीर कऱण्यात आले आहे. त्यानुसार दादर-माहिम मतदारसंघासाठी उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांची एकही प्रचारसभा किंवा रोड शो नाही.
आणखी वाचा