शॉर्ट सर्किटमुळे आग, रिपेरिंग आणि पेंटिंगला आलेल्या सात ट्रॅव्हल्स जागेवरच जळून खाक, लातुरात दोन कोटींचं नुकसान
Latur Fire : हाय टेन्शन तार तुटल्याने त्या खाली असलेल्या सात ट्रॅव्हल्स जळून खाक झाल्या आहेत. या गाड्या रिपेरिंग आणि पेंटिंगसाठी आणण्यात आल्या होत्या.
लातूर : लातुरात शॉर्ट सर्किट झाल्यामुळे लागलेल्या आगीत तब्बत सात ट्रॅव्हल्स जागेवरच जळून खाक झाल्या. मध्यरात्री लागलेल्या या आगीमध्ये तब्बल दोन कोटी रुपयांचं नुकसान झाल्याची प्राथमिक माहिती आहे. लातूर शहरातील रिंग रोडवर आगीची ही घटना घडली. काही वेळाने ही आग आटोक्यात आणण्यात आली. आगीत जळालेल्या ट्रॅव्हल्स या रिपेरिंग आणि पेंटिग तसेच इतर कामं करण्यासाठी या ठिकाणी आणण्यात आल्या होत्या. जळालेल्या या ट्रॅव्हल्समुळे चालक हवालदिल झाल्याचं दिसून आलं.
लातूर शहरातील रिंग रोड भागात डेटिंग आणि पेंटिंग करणाऱ्या एका दुकानाला आग लागल्यामुळे या ठिकाणी असलेल्या सात ट्रॅव्हल्स अक्षरश जळून खाक झाल्या आहेत. या ठिकाणी या सात ट्रॅव्हल्सचं काम सुरू होतं. मध्यरात्री दोन वाजल्यानंतर या ठिकाणी असलेली हाय टेन्शन तार तुटल्याने शॉर्ट सर्किट झालं. त्यातून खाली उभ्या असलेल्या ट्रॅव्हल्सला आग लागली. पाहता पाहता या ठिकाणी उभ्या असलेल्या सात ट्रॅव्हल्स जळून खाक झाल्या आहेत.
या आगीची माहिती तात्काळ अग्निशमन दलाला देण्यात आली होती. अग्निशमन दलाच्या चार गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. काही वेळानंतर या आगीवर नियंत्रण मिळवण्यात आलं. घटनेची माहिती मिळताच विवेकानंद पोलीस ठाण्याचे पथकही तिथे दाखल झालं होतं. ज्या ट्रॅव्हल चालकांच्या गाड्या इथे दुरुस्तीसाठी होत्या त्यांनीही घटनास्थळाकडे धाव घेतली होती. या आगीत सात ट्रॅव्हल्सचं नुकसान झालं आहे. त्या सात ट्रॅव्हल्समध्ये फक्त लोखंडी सांगडा उरला आहे. या आगीमध्ये किमान दोन कोटीपेक्षा अधिक नुकसान झाल्याची माहिती आहे.
वेगवेगळ्या मालकांच्या या सात ट्रॅव्हल्स इथे रिपेरिंगसाठी, डेंटिंगसाठी आणि पेंटिंगसाठी दाखल झाल्या होत्या. या गॅरेजच्या बाजूला असलेल्या मोकळ्या जागेत या गाड्या उभ्या होत्या. वरून जाणारी हाय टेन्शन तार मध्यरात्री कशामुळे तुटली, यातून स्पार्क कसा झाला, आग कशी लागली याबाबतची माहिती घेतली जात आहे. घटनास्थळावर मात्र हाय टेन्शन तार तुटून खाली पडल्याचे स्पष्ट दिसत आहे.
या आगीमुळे लाखो रुपयाचे नुकसान झाल्यामुळे ट्रॅव्हल्स चालक हवालदिल झाले आहेत. बँकेचे हप्ते देत गाड्या घेणाऱ्या मालकांना आता अचानक उभे टाकलेले या नुकसानीमुळे काय बोलावे ही सूचत नाही अशी स्थिती निर्माण झाली आहे.
ही बातमी वाचा: