Ambabai Mandir Navratri : सप्तमीला करवीर निवासिनी अंबाबाईची शाकंभरी देवीच्या रुपात पूजा
Ambabai Mandir Navratri : शारदीय नवरात्रोत्सवाच्या सप्तमी तिथीला आज करवीर निवासिनी श्री अंबाबाई बदामी निवासिनी शाकंभरीच्या रूपात पूजा बांधण्यात आली आहे.
Ambabai Mandir Navratri : शारदीय नवरात्रोत्सवाच्या सप्तमी तिथीला आज करवीर निवासिनी श्री अंबाबाईची बदामी निवासिनी शाकंभरीच्या रूपात पूजा बांधण्यात आली आहे. ही पूजा गजानन मुनीश्वर, मुकुंद मुनीश्वर आणि श्रीनिवास जोशी यांनी बांधली.
बदामीची बनशंकरी ही अनेकांची कुलदेवता. ज्यावेळी अनेक वर्षांचा मोठा दुष्काळ पडला, तेव्हा ऋषीमुनींनी आणि देवांनी जगदंबेची प्रार्थना केली. त्यावेळी जगदंबेने प्रकट होऊन स्वतःच्या शरीरातून शाक भाज्या निर्माण करून जगाचे पोषण केले, म्हणून तिला शाकंभरी असे नाव मिळाले. शाकंभरीलाच बनशंकरी म्हणजे वनामध्ये राहणारी देवी असेही म्हटले जाते. प्रतिवर्षी पौष महिन्यात अष्टमी ते पौर्णिमा शाकंभरीचे नवरात्र संपन्न केले जाते. शाकंभरी सिंहावरती विराजमान होऊन आठ हातामध्ये विविध आयुध धारण करते.
दरम्यान, करवीर निवासिनी श्री अंबाबाई मंदिरात शनिवारी भाविकांच्या गर्दीने विक्रम मोडित काढला आहे. त्यामुळे प्रशासनाकडून 12 ठिकाणांवर पार्किंगची व्यवस्था करूनही तोकडी पडली. त्यामुळे कोल्हापूर शहरातील वाहतुकीवर विपरित परिणाम झाल्याचे दिसून आले. शनिवारी तब्बल 4 लाख 87 हजार 521 भाविकांनी दर्शन घेतले. शुक्रवारी 3 लाख 22 हजार 425 भाविकांनी दर्शन घेतले होते. त्यामुळे फक्त दोन दिवसांमध्येच साडे आठ लाखांवर भाविकांनी मंदिराला भेट दिली आहे.
जोतिबाच्या जागरला भाविकांचा जनसागर
दुसरीकडे दख्खनचा राजा जोतिबाच्या जागराला भाविकांचा जनसागर लोटला. सातव्या माळेला जोतिबाची चार मुक्तीचे प्रतिक दाखविणाऱ्या चौफुल्यामधील महापुजा बांधण्यात आली. करवीर संस्थान छत्रपती घराण्याकडून जागरानिमित्त जोतिबा पूजेसाठी महावस्त्रेही अर्पण करण्यात आली.
नवरात्रोत्सवाचा जोतिबा देवाचा जागर इतर देवदैवताच्या आधी साजरा होतो. रविवारी जागरा निमित्त जोतिबाची चार मुक्तीचे प्रतिक दाखविणाऱ्या चौफुल्यामध्ये महापूजा अमर नवाळे, प्रविण भंडारे, रमेश ठाकरे, नितीन लादे, सरदार सांगळे यांनी बांधली. पुजेपुढे उन्मेष नावाचा अश्व (घोडा) अर्पण केला. मंदिराच्या दरवाज्यावर सीताफळ्, कवडांळ, बेल, फुलांचे तोरण बांधली. फलाहाराची पाच ताटाचा नैवेद्य वाजत गाजत यमाई मंदिराकडे नेण्यात आली. उंट, घोडे, वाजंत्री ,देव सेवकाच्या लवाजम्यासह धुपारती सोहळा निघाला.
इतर महत्वाच्या बातम्या