Deepak Kesarkar on kolhapur Dasara : कोल्हापूरच्या शाही दसरा सोहळ्यात पहिल्यांदाच शासनाचा सहभाग, शाहू महाराजांच्या परवानगीने दीपक केसरकरांची घोषणा
कोल्हापूरचे वैभव असणाऱ्या शाही दसऱ्यामध्ये पहिल्यांदाच शासनाचा सक्रिय सहभाग असणार आहे. यासाठी शाहू महाराजांची परवानगी दिली असल्याची माहिती कोल्हापूरचे पालकमंत्री दीपक केसरकर यांनी दिली.
Deepak Kesarkar on kolhapur Dasara : ऐतिहासिक परंपरा आणि कोल्हापूरचे वैभव असणाऱ्या शाही दसऱ्यामध्ये पहिल्यांदाच शासनाचा सक्रिय सहभाग असणार आहे. यासाठी शाहू महाराजांची परवानगी दिली असल्याची माहिती कोल्हापूरचे पालकमंत्री दीपक केसरकर यांनी दिली. या शाही दसऱ्यासाठी 25 लाख निधी दिला जाणार असल्याची घोषणाही केसरकर यांनी यावेळी केली.
यंदाचा ऐतिहासिक शाही दसरा कसा असेल याबाबत दीपक केसरकर यांनी पत्रकार परिषदेत माहिती दिली. यावेळी राज्य नियोजन मंडळाचे कार्याध्यक्ष राजेश क्षीरसागर तसेच मालोजीराजे छत्रपती उपस्थित होते. पालकमंत्री केसरकर म्हणाले, यंदाचा शाही दसऱ्याचा सोहळा 2 दिवस चालणार आहे. पुढील वर्षीपासून कोल्हापूरचा दसरा तीन दिवस चालेल.
ते पुढे म्हणाले, दसऱ्यासाठी शाहू पॅलेस ते दसरा चौक ठिकठिकाणी प्रदर्शन भरवणार येईल. या माध्यमातून महिलांना रोजगार निर्माण होईल यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत. पुढील वर्षीचा कोल्हापूरचा शाही दसरा राज्यस्तरीय व्हावा यासाठी मंत्रिमंडळात चर्चा करणार असल्याचेही त्यांनी नमूद केले.
अंबाबाई पालखी आणि छत्रपती शाहू महाराजांवर हेलिकाॅप्टरमधून पुष्पवृष्टी
दीपक केसरकर यांनी यावेळी जिल्हा नियोजन मंडळाच्या निधीतून 25 लाख रुपये दिले जातील, अशी घोषणा केली. ते म्हणाले की, या निधीसह आम्ही प्रायोजकही शोधत आहोत. हा लोकांचा सण असल्याने हा लोकोत्सव व्हावा अशी अपेक्षा आहे. शासनाचा सहभाग असला, तरी परंपरेमध्ये कोणतीही अडचण निर्माण होणार नाही, अशी ग्वाही दिली.
अंबाबाईची पालखी आणि छत्रपती शाहू महाराजांच्या पुतळ्यावर हेलिकाॅप्टरमधून पुष्पवृष्टी करण्याचा विचार सुरु आहे. यासाठी पुण्याहून हेलिकाॅप्टर भाड्याने घेण्यासाठी उद्योगपती संजय घोडावत यांच्याशी चर्चा झाली आहे. पुढील वर्षी हा राज्याचा सोहळा असावा यासाठी मंत्रिमंडळासमोर प्रस्ताव ठेवणार आहे. या संदर्भातील घोषणा राज्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री करतील. या निमित्ताने शाहू महाराजांचे विचार लोकांसमोर येतील, असेही केसरकर यांनी सांगितले.
दरम्यान, शाही दसरा महोत्सव भव्य स्वरुपात साजरा होण्यासाठी प्रशासनाच्यावतीने करण्यात येत असलेल्या नियोजनाबाबत तसेच समाजातील सर्व घटकांच्या सहभागासाठीचे नियोजन, विविध सांस्कृतिक व अन्य उपक्रमांची रुपरेषा, महोत्सवाची व्यापक प्रसिध्दी, आकर्षक विद्युत रोषणाई, ऐतिहासिक ठिकाणांचे व मिरवणूक मार्गांचे सुशोभिकरण, नागरिक व पर्यटकांसाठी विविध सोयी सुविधा आदींबाबत जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी माहिती काल झालेल्या बैठकीत दिली.
इतर महत्वाच्या बातम्या