(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Vedganga River : पावसाचा जोर वाढल्याने वेदगंगा नदी पात्राबाहेर, पाटगाव धरणातूनही नदी पात्रात मोठा विसर्ग
Vedganga River : सर्वदूर होत असलेल्या पावसामुळे कोल्हापूर जिल्ह्यातील नद्यांच्या पाणीपातळीत वाढ होत आहे. पंचगंगेची पाणी पातळी वाढल्यानंतर वेदनंगा नदी पात्राबाहेर आली आहे.
Vedganga River : सर्वदूर होत असलेल्या पावसामुळे कोल्हापूर जिल्ह्यातील नद्यांच्या पाणीपातळीत वाढ होत आहे. पंचगंगेची पाणी पातळी वाढल्यानंतर वेदनंगा नदी पात्राबाहेर आली आहे. भुदरगड तालुक्यातील पाटगाव धरण पूर्ण क्षमतेने भरल्याने वेदगंगा नदी पात्रात मोठ्या प्रमाणात विसर्ग सुरु असल्याने नदी मोसमात दुसऱ्यांदा पात्राबाहेर आली आहे.
वेदगंगा नदी पात्राबाहेर आल्याने कुरणी-मुरगूड दरम्यान असणाऱ्या बंधाऱ्यावर पाणी आले आहे. त्यामुळे वाहतूक बंद करण्यात आली आहे. मुरगूड-निढोरी-कुरणी मार्गाने वाहतूक वळवण्यात आली आहे. कोल्हापूर जिल्ह्यात गेल्या 24 तासांपासून पावसाची संततधार सुरु आहे.
दुसरीकडे गेल्या 24 तासांपासून होत असलेल्या पावसामुळे राधानगरी धरणाचे तीन स्वयंचलित दरवाजे उघडले आहेत. उघडलेल्या तीन स्वयंचलित दरवाजातून 4 हजार 284 क्युसेकने, तर पाॅवर हाऊसमधून 1600 क्युसेक विसर्ग सुरु आहे. दोन्ही मिळून राधानगरी धरणातून 5 हजार 884 क्युसेकने भोगावती नदीमध्ये विसर्ग सुरु आहे. त्यामुळे नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
राधानगरी धरणाचा सहाव्या क्रमांकाचा स्वयंचलित दरवाजा 10 वाजून 55 मिनिटांनी उघडला. त्यानंतर आणखी दोन दरवाजे उघडले.
राजाराम बंधारा चौथ्यांदा पाण्याखाली
कोल्हापूर शहरासह जिल्ह्यामध्ये होत असलेल्या दमदार पावसाने नद्यांच्या पाणी पातळीत पुन्हा वाढ होऊ लागली आहे. राजाराम बंधाऱ्याजवळ पंचगंगेची पाणी पातळी 17 फुटांवर पोहोचली आहे. त्यामुळे मोसमात चौथ्यांदा राजाराम बंधाऱ्यावर पाणी आले आहे. त्याचबरोर रुई आण इचलकरंजी बंधाराही पाण्याखाली गेला आहे.
तुळशी धरणातून पाण्याचा विसर्ग वाढवला
दुसरीकडे पावसाचा जोर वाढल्याने तुळशी धरणातून विसर्ग वाढवण्यात आला आहे. आज सकाळी 10 वाजल्यापासून तुळशी धरणातून सध्या असणारा 500 क्युसेक्स विसर्ग 300 ने वाढ करून 8000 क्युसेक्स करण्यात आला आहे. त्यामुळे तुळशी नदी काठच्या लोकांनाही सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
पाटगाव, कुंभी धरण 100 टक्के भरले
पावसाचा जोर वाढल्याने पाटगाव आणि कुंभी धरण पूर्ण क्षमतेने भरले आहे. काल दुपारी अडीचच्या सुमारास पाटगाव धरण पूर्ण क्षमतेने भरले, तर सायंकाळी चारच्या सुमारास कुंभी धरण 100 टक्के भरले.
जिल्ह्यातील 9 धरणे 100 टक्के भरली
जिल्ह्यातील तुळशी, कुंभी, पाटगाव, चिकोत्रा, चित्री, जंगमहट्टी, घटप्रभा, जांबरे आणि कोदे धरण 100 टक्के भरले आहे.
अलमट्टी धरणातून विसर्ग सुरु
पावसाचा जोर वाढल्याने पूर्ण क्षमतेने भरलेल्या अलमट्टी धरणातूनही पाण्याचा विसर्ग सुरु करण्यात आला आहे. अलमट्टी धरणातून 52 हजार 500 क्युसेकने विसर्ग सुरु आहे. हिप्परगी धरणातून विसर्ग सध्या बंद आहे. दुसरीकडे कोयना धरणातूनही विसर्ग बंद आहे. धरणात 2 हजार 469 क्युसेकने विसर्ग सुरु आहे. धरणात 100.70 टीएमसी पाणीसाठा आहे.
इतर महत्वाच्या बातम्या