Lumpy Skin Disease : लम्पी चर्मरोगाचा वाढता प्रार्दुभाव, कोल्हापूर जिल्ह्यातही मनाई आदेश लागू; जनावरांचा बाजार भरण्यास बंदी
कोल्हापूर जिल्ह्यातील हातकणंगले तालुक्यात जनावरांमध्ये लम्पी चर्मरोगाचा प्रादुर्भाव आढळून आल्याने जिल्हा प्रशासनाने पशूधन संरक्षणासाठी मनाई आदेश लागू केला आहे. पुढील आदेशापर्यंत मनाई आदेश लागू असेल.
Lumpy Skin Disease : राज्यातील 18 जिल्ह्यांमध्ये जनावरांमधील लम्पी चर्मरोगाचा प्रार्दुभाव वाढत चालल्याने कोल्हापूर जिल्ह्यामध्येही मनाई आदेश लागू करण्यात आला आहे. जिल्ह्यातील हातकणंगले तालुक्यात जनावरांमध्ये लम्पी चर्मरोगाचा प्रादुर्भाव आढळून आल्याने जिल्हा प्रशासनाने पशूधन संरक्षणासाठी मनाई आदेश लागू केला आहे. पुढील आदेशापर्यंत मनाई आदेश लागू असेल.
आदेशानुसार गाय व म्हशींचा कोणताही प्राणी बाजार भरवणे, प्राण्यांच्या शर्यती लावणे, प्राण्यांची जत्रा भरवणे, प्राण्यांचे प्रदर्शन आयोजित करणे तसेच गायी एकत्रित करून कोणताही कार्यक्रम पार पाडणे यास मनाई करण्यात आली आहे. जत्रेत किंवा प्राण्यांच्या अन्य जमावामध्ये किंवा कोणत्याही सार्वजनिक ठिकाणी, गोजातीय प्रजाती प्राण्यांच्या उक्त बाधित झालेल्या गुरांना व म्हशींना आणणे किंवा आणण्याचा प्रयत्न करणे यास मनाई करण्यात आली आहे.
कोल्हापूर जिल्ह्यातील हातकणंगले तालुक्यातील अतिग्रे गावातील बाधित जनावरांचे नमुने तपासले असता ते पाॅझिटिव्ह आले आहेत. लम्पी चार्मरोगाचा फैलाव बाह्य किटका द्वारे (मच्छर, गोचीड गोमाश्या) तसेच आजारी पशुंच्या त्वचेवरील व्रणांमधून वाहणारा स्राव, नाकातील स्राव, दुध, लाळ, वीर्य यामुळे होत असल्याने पशुपालकांनी मच्छर, गोचीड व गोमाश्या यांचा प्रादुर्भाव होणार नाही याची काळजी घ्यावी, असे आवाहनही आदेशात करण्यात आले आहे. दरम्यान, पशूधन बाधित झाले, तरी जनावरे दोन-तीन आठवड्यात बरी होतात, त्यामुळे काळजी घेण्याची आवश्यकता आहे.
लम्पी चर्मरोगाची लक्षणे आहेत तरी काय?
- या आजारात पशुंना ताप येणे
- पूर्ण शरीरावर 10 ते 15 मिमी व्यासाच्या कडक गाठी येणे
- तोंड, नाक व डोळ्यात व्रण निर्माण होणे
- चारा चघळण्यास त्रास होणे
- अशक्तपणा तसेच भूक कमी होणे
- वजन कमी होणे
- दुध उत्पादन कमी होणे
- डोळ्यातील व्रणामुळे दृष्टी बाधित होणे
- काही वेळा फुफ्फसदाह किंवा स्तनदाह होणे
- पायावर सूज येवून लगडणे
- गाभण जनावरांमध्ये गर्भपात होणे
वरील प्रकारची लक्षणे दिसल्यास नजीकच्या पशुवैद्यकीय संस्थेस तात्काळ कळविणे बंधनकारक आहे.
इतर महत्त्वाच्या बातम्या