Weather Update : कोल्हापूर, सांगली, साताऱ्याला अवकाळी पावसाने झोडपले; तळपत्या उन्हापासून दिलासा
Weather Update : कोल्हापूर जिल्ह्यामध्ये गेल्या तीन दिवसांपासून पारा चाळीशीच्या पार गेल्याने नागरिकांची अक्षरशः लाहीलाही सुरू आहे. त्यामुळे पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला होता.
![Weather Update : कोल्हापूर, सांगली, साताऱ्याला अवकाळी पावसाने झोडपले; तळपत्या उन्हापासून दिलासा Unseasonal rain lashed Kolhapur Sangli Satara Relief from the scorching sun Weather Update : कोल्हापूर, सांगली, साताऱ्याला अवकाळी पावसाने झोडपले; तळपत्या उन्हापासून दिलासा](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/04/17/e6a98a724b1033d7d608f5eec8c1381c1713356409891736_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Weather Update : रणरणत्या उन्हापासून हैराण झालेल्या कोल्हापूर सांगली आणि सातारा जिल्ह्यात अनेक भागांना आज अवकाळी पावसाने झोडपून काढले. कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळ, हातकणंगले तालुक्यामध्ये अवकाळी पावसाने दुपारी हजेरी लावली. त्यामुळे गेल्या तीन दिवसापासून अंगाची लाहीलाही होत असलेल्या नागरिकांना मोठा दिलासा मिळाला.
हातकणंगले आणि शिरोळ तालुक्यामध्ये पावसाची हजेरी
कोल्हापूर जिल्ह्यामध्ये गेल्या तीन दिवसांपासून पारा चाळीशीच्या पार गेल्याने नागरिकांची अक्षरशः लाहीलाही सुरू आहे. त्यामुळे पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला होता. आज जिल्ह्यातील हातकणंगले आणि शिरोळ तालुक्यामध्ये पावसाने हजेरी लावली. यावेळी काही ठिकाणी गारांचाही वर्षाव झाला.
झाडांच्या फांद्या तुटून पडल्याने वीजपुरवठा खंडीत
शिरोळमध्ये पडलेल्या पावसामुळे दुचाकी घसरण्याचे प्रकार घडले. तालुक्यातील कुरुंदवाड, दत्तवाड, हेरवाड, चिंचवाडसह परिसरात चांगल्या पावसाची नोंद झाली. शिरोळमध्ये आठवडी बाजारात मोठी तारांबळ उडाली. काही ठिकाणी झाडांच्या फांद्या तुटून पडल्याने वीजपुरवठा खंडीत करण्यात आला होता.
सांगली शहरासह जिल्ह्यातील अनेक भागात वादळी वाऱ्यासह पाऊस
सांगलीमध्ये सुद्धा अवकाळी पावसाने हजेरी लावली. सांगली शहरासह जिल्ह्यातील अनेक भागात वादळी वाऱ्यासह दुपारी पावसाला सुरुवात झाली. काही भागांमध्ये गारांचा वर्षाव सुद्धा झाला. तापमानात मोठी वाढ झाल्याने नागरिक उकाड्याने हैराण होऊन गेले होते. त्यामुळे अवकाळी पावसाने गारवा निर्माण केला आहे. दुसरीकडे सातारा जिल्ह्यामध्ये सुद्धा अवकाळी पावसाने हजेरी लावली. वाई तालुक्यामध्ये सोसाट्याच्या वाऱ्यासह पाऊस झाला. काही ठिकाणी झाडे कोसळण्याच्या घटना सुद्धा घडल्या.
दरम्यान, मध्य महाराष्ट्रातील पुणे, सातारा, सांगली, मराठवाड्यातील धाराशिव, लातूर जिल्ह्यात ताशी 30 ते 40 किमी वेगाने वादळी वारे, विजांसह पावसाचा इशारा हवामान विभागाकडून देण्यात आला होता. गेल्या 24 तासांमध्ये मालेगावमध्ये राज्यातील उच्चांकी म्हणजेच 42.6 अंश सेल्सिअस इतक्या तापमानाची नोंद झाली होती. हवामान विभागाने कोकण, पुणे आणि सोलापूर जिल्ह्यात उष्णतेसाठी येलो अलर्ट दिला आहे. पुणे, सातारा, सांगली, धाराशिव, लातूर जिल्ह्यांमध्ये वादळी पावसाची शक्यता वर्तविली (Unseasonal Rain) आहे.
इतर महत्वाच्या बातम्या
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)