(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Abu Azmi on Vishalgad Riots : अबू आझमी अखेर विशाळगडाच्या पायथ्याला पोहोचले, गजापूरच्या भेटीनंतर संभाजीराजेंना म्हणाले....
Abu Azmi on Vishalgad Riots : विशाळगडावर इतके गंभीर प्रकरण होऊन ज्यांना आम्ही मुस्लिम समाजाने मते दिली ते उद्धव ठाकरे, शरद पवार यावर काहीच बोलत नाही, याबाबतही अबू आझमी यांनी भाष्य केलं आहे.
Abu Azmi on Vishalgad Riots : राजर्षी शाहू महाराज यांनी सर्वात आधी आरक्षण दिलं होतं. त्यामध्ये शाहू महाराज यांनी मुस्लिम समाजाचा देखील सहभाग करून घेतला होता. राजर्षी शाहूंनी समतेचा संदेश दिला होता. त्यांच्या नगरीमध्ये विशाळगड, गजापूरमध्ये दंगल (Vishalgad Riots) होणं हे अतिशय दुर्दैवी आहे, असंही समाजवादी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आमदार अबू आझमी यांनी म्हटलं आहे.
याबाबत राजर्षी शाहूंच्या वंशजांवर मी काही बोलणार नाही; पण त्यांच्या कुटुंबीयांनी आता सामाजिक सलोख्यासाठी शाहूंचा समतेच्या विचार देशभरात न्यावा, त्याचा प्रसार करावा, शाहू महाराज यांनी खूप मोठं काम केलं आहे. त्यांचे काम पुढे घेऊन जाण्याचं काम त्यांनी करावं असं आवाहन समाजवादी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आमदार अबू आझमी (Abu Azmi) यांनी गजापूरला भेट दिल्यानंतर कोल्हापुरात पत्रकारांशी संवाद साधताना म्हटलं आहे.
अबू आझमी (Abu Azmi) म्हणाले, विशाळगडावरील 144 कलम हटवून तेथील जनजीवन पूर्ववत करावं. गजापूरमधील नुकसानग्रस्तांना रोज एक हजार रुपयांप्रमाणे भरपाई द्यावी. पोलीस अधीक्षक समोर असताना त्यांच्या डोळ्यासमोर हे सगळं घडलं आहे. सरकारने त्यांना तातडीने निलंबित केलं पाहिजे. शाहू महाराज यांच्या भूमीत असं घडत आहे हे योग्य नाही.संभाजी भिडे यांची 12 तारखेला होणारी सभा थांबवली पाहिजे. 14, 15, 16 तारखेला सरकाने कोणतीही कारवाई केली नाही. 144 कलम दूर केलं पाहिजे, त्याठिकाणी नागरिकांना येऊ दिलं पाहिजे.
संशयित आरोपींवर कलम साधी लावली आहेत. धर्मधर्मात आणि जाती जातीत तेढ निर्माण करणाऱ्यांवर दहशतवादी कलम लावा. जाणून बुजून मुस्लिम लोकांची घरं तोडली आहेत. काही लोक देशाला बरबादी कडे घेऊन जात आहेत, असा टोला देखील त्यांनी यावेळी लगावला आहे.
अतिक्रमण अनेक ठिकाणी झालं आहे. अनेक मोठ्या मोठ्या इमारती उभा राहिल्या आहेत. तिकडे कोण लक्ष देत नाही मात्र इकडे तोडफोड केली. कोणता कायदा आहे की त्यानुसार घर तोडली जातात. केवळ मुस्लिम लोकांची घरं तोडली जात आहेत. इंडिया आघाडीकडे अल्पसंख्याक लोकांची मतं गेली असं भाजप बोलत आहे. अल्पसंख्याक लोकांना घाबरवत असतील तर लोकं काय करतील असा सवाल देखील त्यांनी यावेळी उपस्थित केला आहे.
मते दिलेले ठाकरे, पवार काहीच बोलत नाहीत
विशाळगडावर इतकी गंभीर प्रकरणे होऊन मुस्लिम समाजाने मते दिली ते उद्धव ठाकरे, शरद पवार यावर काहीच बोलत नाहीत. मग आम्ही आता कोणाकडे जायचं. आम्हाला न्याय पाहिजे. सध्याचे सरकार द्वेष पसरविण्याचे काम करत आहे. काही लोक देशाला बर्बादीकडे घेऊन जात आहेत. इंडिया आघाडीकडे मागणी आहे की, मतांचे विभाजन होऊ नये यासाठी एकत्र बसून विधानसभा निवडणुकीला सामोरं जायला पाहिजे. महाराष्ट्रात महाविकास आघाडीला विनंती आहे, असंही अबू आझमी (Abu Azmi) यांनी म्हटलं आहे.