Kolhapur : कोल्हापुरात 10 हजारांची लाच घेताना कर निरीक्षक विशाल हापटेला रंगेहात अटक, शाहूपुरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
Kolhapur GST News : आरोपीने या आधीही कामे करून घेण्यासाठी अनेकांकडून लाच घेतल्याची कुजबूज जीएसटी कार्यालयात सुरू आहे.
कोल्हापूर: जीएसटीची (GST) रक्कम वेळेत भरली नाही म्हणून दुकानदाराकडून दहा हजारांची लाच घेताना कर निरीक्षक विशाल हापटे (वय 35) याला अटक करण्यात आली आहे. लाचलुचपत विभागाने (Kolhapur Anti Corruption Bureau) ही कारवाई केली असून आरोपी विरोधात शाहुपुरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
कोल्हापुरातील हॉकी स्टेडिअमच्या परिसरातील एका टायर विक्री करणाऱ्या दुकानदाराने जीएसटीची रक्कम वेळेत भरली नव्हती. त्यामुळे त्या दुकानदाराकडे इनकम टॅक्स रिटर्न, बॅलेन्सशिट आणि इतर संबंधित कागदपत्रांची मागणी जीएसटी विभागाकडून करण्यात आली. त्यानंतर त्या दुकानदाराने जीएसटी विभागाला भेट दिली. तिथला कर निरीक्षक विशाल हापटे (Vishal Hapate) याने हे प्रकरण मिटवण्यासाठी 10 हजार रुपयांची लाच मागितली. त्यानंतर त्या दुकानदाराच्या मित्राने याची तक्रार कोल्हापूर लाचलुचपत विभागाकडे केली. आवश्यक कागदपत्रांची पडताळणी केल्यानंतर लाचलुचपत विभागाने सापळा रचला आणि विशाल हापटेला रंगेहात पकडलं.
आरोपी विशाल हापटे हा महाराष्ट्र वस्तू आणि सेवा कर (GST) कर्मचारी संघटनेचा कोल्हापूर जिल्हा अध्यक्ष आहे. विशाल हापटे हा हातकणंगल्यातील (Hatkanangale) शिवाजी चौक परिसरात राहणारा आहे. त्याने या आधीही अनेकांकडून लाच घेतली असल्याची कार्यालयात कुजबूज सुरू आहे. पैसे घेतल्याशिवाय तो कुणाचंही काम करत नसायचा अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. तसेच लाचेच्या रकमेतून त्याने बरीच माया कमावल्याचीही जोरदार चर्चा आहे.
विशाल हापटे (Vishal Hapate) याच्या विरोधात तक्रार दाखल झाल्यानंतर लाचलुचपत विभागाचे (Kolhapur Anti Corruption Bureau) पोलिस उपाधीक्षक सरदार नाळे, पोलिस निरीक्षक बापू साळुंखे यांच्या टीमने त्याला 10 हजार रुपयांची लाच घेताना रंगेहात पकडलं आहे. कोल्हापूर जिल्ह्याचे लाचलुचपत विभागाचे पोलिस अधीक्षक अमोल तांबे, अपर पोलिस अधीक्षक विजय चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली.
नागरिकांना आवाहन
विशाल हापटेला लाच घेताना पकडल्यानंतर लाचलुचपत विभागाने नागरिकांना आवाहन केलं आहे. कोणत्याही शासकीय कार्यालयातील अधिकारी, कर्मचारी यांनी किंवा त्यांच्या वतीने खाजगी इसम (एजंट) कोणतेही शासकीय काम करून देण्यासाठी कायदेशीर फी व्यतिरिक्त अन्य लाचेची मागणी करीत असल्यास तात्काळ आमच्याशी संपर्क साधावा. तसेच तक्रार दिल्याने आपलं कोणतेही शासकीय काम थांबत नाही असं निवेदन प्रसिद्ध करण्यात आलं आहे.
ही बातमी वाचा: