करवीर निवासिनी अंबाबाईचे दर्शन गाभाऱ्यात जाऊन घेता येणार, कोल्हापूरचे पालकमंत्री दीपक केसरकर यांची माहिती
अंबाबाईचे दर्शन पितळी उंबऱ्याच्या बाहेरून घ्यावे लागत होते. मात्र भाविकांना आई अंबाबाईचे दर्शन अगदी जवळून घेता येणार आहे.
कोल्हापूर: साडेतीन शक्तीपीठापैकी एक प्रमुख पीठ असलेल्या करवीर निवासिनी अंबाबाईचे (Ambabai Mandir) दर्शन गाभाऱ्यात जाऊन घेता येणार आहे. कोल्हापूरचे (Kolhapur News) पालकमंत्री दीपक केसरकर (Deepak Kesarkar) यांनी ही माहिती दिली आहे. डोके ठेऊन नतमस्तक होऊन दर्शन घेण्याची भाविक आतुरतेने वाट पाहत होते. कोरोनामुळे बंद असलेले अंबाबाईचे गाभारा दर्शन उद्यापासून 29 ऑगस्ट सुरू करण्याचा महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे.
राज्यात कोरोना संसर्गजन्य रोगाचे सावट पसरले होते. या पार्श्वभूमीवर शासनाने खबरदारीचा उपाय म्हणून सर्व धार्मिक स्थळे भाविकांच्या दर्शनासाठी बंद केली होती. दरम्यान काही महिन्यात कोरोनाचा प्रादुर्भाव काहीसा कमी झाल्याने पुन्हा एकदा मंदिरे भाविकांच्या दर्शनासाठी खुली करण्यात आली. मात्र अंबाबाईचे दर्शन पितळी उंबऱ्याच्या बाहेरून घ्यावे लागत होते. मात्र भाविकांना आई अंबाबाईचे दर्शन अगदी जवळून घेता येणार आहे. मात्र भाविकांना देवीच्या पायावर डोके ठेऊन दर्शन घेण्याची आस लागून होती.
अंबाबाई मंदिरात भाविकांची कायम गर्दी
गाभार दर्शन सुरू करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आल्याची माहिती दिपक केसरकर यांनी दिली आहे. या निर्णयामुळे भाविकांना थेट मंदिराच्या गाभाऱ्यात जाऊन अंबाबाईचे दर्शन घेता येणार आहे.तसेच देवीची ओटी देखील भरताा येणार आहे. कोरोना काळापासून मुखदर्शन सुरू करण्यात आले होते. कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्यानंतर गाभाऱ्यात दर्शन सुरू करावे अशी मागणी भाविकांकडून होत होती.कोल्हापूरच्या अंबाबई मंदिरात गर्दीचा ओघ कायम आहे. सुट्टीच्या दिवशी तर मंदिर भाविकांनी हाऊसफुल्ल असते. श्रावण महिन्यामुळे करवीर निवासिनी श्री अंबाबाई मंदिरात भाविकांनी दर्शनासाठी मोठी गर्दी आहे.
करवीर निवासिनी श्री अंबाबाईच्या चरणी 70 लाखांचे दान
करवीर निवासिनी श्री अंबाबाई मंदिरातील दानपेट्या दोन ते अडीच महिन्यांनी उघडून मोजणी केली जाते. या महिन्यात देखील मोजदाद सुरु होती. एकूण 70 लाख 622 रुपये भक्तांनी देवीच्या चरणी अर्पण केले आहेत. यामध्ये चिल्लरचा सुद्धा समावेश आहे. करवीर निवासिनी श्री अंबाबाईच्या दर्शनासाठी देशभरातून लाखो भक्त येत असतात. मंदिरात भरभरुन दान देण्यासह उपयुक्त वस्तूही भक्तांकडून भेट देण्यात येतात. एका पुणेकर भक्ताने अंबाबाईसाठी 5 किलो 832 ग्रामचे चांदीचे तोरण अर्पण केलं आहे. तोरणाची अंदाजी किंमत रू 4,94,188 रुपये इतकी आहे.त्यामुळे देवीची दर्शनी बाजू आणखी आकर्षक झाली आहे.