Jejuri Khandoba Temple : जेजुरीतील खंडोबा मंदिराचा गाभारा उद्यापासून दीड महिना दर्शनासाठी बंद राहणार
Jejuri Khandoba Temple : महाराष्ट्राचे कुलदैवत असलेल्या जेजुरीच्या खंडोबा मंदिराचा गाभारा भाविकांसाठी दीड महिने बंद ठेवण्यात येणार आहे.
जेजुरी, पुणे : महाराष्ट्राचे कुलदैवत असलेल्या जेजुरीच्या (Jejuri) खंडोबा मंदिराचा (Khandoba Temple) गाभारा भाविकांसाठी दीड महिने बंद ठेवण्यात येणार आहे. सोमवार दिनांक 28 ऑगस्टपासून 5 ऑक्टोबरपर्यंत मंदिराचा गाभारा हा भाविकांसाठी बंदच राहणार आहे. खंडोबा मंदिरावर असलेल्या मुख्य स्वयंभू लिंगाचा आणि अश्वाचा गाभारा हा दुरुस्तीच्या कामामुळे बंद ठेवण्यात येणार आहे. भाविकांना कासवापासून देवाचे दर्शन घेता येणार आहे. तसेच भाविकांना कुलधर्म कुलाचार करण्यास कोणतीही अडचण येणार नाही अशा पद्धतीने नियोजन करण्यात येणार आहे.
कुलधर्म कुलाचार करण्यात कोणतीही अडचण येणार नाही : देवस्थान
खंडोबा गडाच्या गाभाऱ्याचे दुरुस्तीचे काम हाती घेतले असले तरी भाविकांना गडावर येऊन आपले कुलधर्म कुलाचार करण्यात कोणतीही अडचण येणार नाही. खंडोबाची त्रिकाळ पूजा नेहमीप्रमाणे सुरु राहणार आहे. मात्र इतर कोणालाही गाभाऱ्यामध्ये दर्शनासाठी जाता येणार नाही, असे देवस्थानच्या विश्वस्त मंडळाने स्पष्ट केले आहे.
खंडोबा गड जतन करण्यासाठी सरकारकडून विकासकामे सुरु
जेजुरीचा ऐतिहासिक खंडोबा गड जतन करण्यासाठी महाराष्ट्र सरकारतर्फे विकास आराखड्याची कामे सुरु आहे. पुरातत्व खात्याच्या मार्गदर्शनाखाली आवश्यक त्या दुरुस्त्या व उपाययोजना केल्या जात आहेत. यासाठी सुमारे 107 कोटी रुपयांचा विकास आराखडा मंजूर झाला आहे. त्यानुसार गडावर विविध विकासकामे वेगाने सुरु आहेत.
दरम्यान मुख्य गाभाऱ्याचे काम सुरु असताना गडावर येणाऱ्या भाविकांच्या अभिषेक महापूजा या पंचलिंग भुलेश्वर मंदिरात करण्यात येणार आहेत. आतील गाभाऱ्याचे काम पूर्ण झाल्यावर पंचलिंग मंदिराचे काम करताना भाविकांची गैरसोय टाळण्यासाठी मुख्य मंदिरात पूजा करु द्याव्यात, अशी मागणी विकास कामांच्या नियोजनासंदर्भातील बैठकीत करण्यात आली होती.
जागृत देवस्थान
पुणे जिल्ह्यातील जेजुरी गावात खंडोबाचे देवस्थान आहे. खंडोबा हे महाराष्ट्राचे कुलदैवत असून तो जेजुरीचा खंडोबा या नावाने सर्वपरिचित आहे. उंच डोंगरावर असलेल्या कडेपठारावर खंडोबाचे जुने स्थान होते. परंतु जेजुरीला नव्याने देऊळ बांधले. त्यालाही आता तीन शतकं उलटून गेली आहेत. जेजुरीचे मंदिर हा महाराष्ट्राच्या मंदिरवास्तुकला परंपरेच्या प्रगतीचा महत्त्वाचा टप्पा आहे. खंडोबाचे हे जागृत देवस्थान समजले जाते. मराठा, कुणबी, धनगर, आगरी, कोळी आणि इतर अनेक लोकांचे हे आराध्यदैवत आहे. खंडोबाच्या यात्रा आणि जत्रा या चैत्र, पौष तसंच माघ या तीन महिन्यात शुद्ध द्वादशी ते वद्य प्रतिपदा हे पाच दिवस, मार्गशीर्ष शुद्ध प्रतिपदा ते षष्टी असे सहा दिवस, वर्षातील सर्व सोमवती अमावस्या आणि आश्विनी शुद्ध प्रतिपदा ते दशमी अशा दहा दिवस असतात.
हेही पाहा
Nagpanchami 2023: जेजुरी गडावर नागपंचमीचा उत्साह; म्हाळसा देवीचे पारंपरिक ताट, पाहा फोटो