(Source: ECI/ABP News/ABP Majha)
कोल्हापूर शहराच्या वेशीवरील गावात विकृतीचा कळस; पोटच्या अल्पवयीन मुलीशी बापाचे जबरदस्तीने शारीरिक संबंध
Kolhapur Crime : कोल्हापूर शहराच्या वेशीवर असणाऱ्या एका गावातून विकृत बापाने पोटच्या 14 वर्षीय अल्पवयीन मुलीशी गेल्या दोन वर्षांपासून जबरदस्तीने शारिरीक संबंध ठेवल्याची घटना समोर आली आहे.
Kolhapur Crime : कोल्हापूर शहराच्या वेशीवर असणाऱ्या एका गावातून अत्यंत घृणास्पद आणि बाप लेकीच्या नात्याला काळीमा फासणारी घटना समोर आली आहे. विकृत बापाने पोटच्या 14 वर्षीय अल्पवयीन मुलीशी गेल्या दोन वर्षांपासून जबरदस्तीने शारिरीक संबंध ठेवल्याची घटना समोर आली आहे. संबंधित पीडित अल्पवयीन मुलगी गर्भवती राहिल्याचे समोर आल्यानंतर हा धक्कादायक समोर आला. याबाबत पोलिसांत गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
दरम्यान, समोर आलेल्या माहितीनुसार पीडित अल्पवयीन मुलीशी बापाने 2020 ते सप्टेंबर 2022 या कालावधीत जबरदस्तीने शारिरीक संबंध ठेवले. संबंधित मुलीला दवाखान्यात तपासणीसाठी गेल्यानंतर गर्भवती असल्याचे लक्षात आले. त्यानंतर पीडिताने पोलिसांकडे फिर्याद दाखल केली आहे. गुन्हा दाखल झाल्यानंतर पुढील कार्यवाही सुरु केली आहे. पोलिसांनी विकृत बापाविरोधात विविध कलमांखाली गुन्हा दाखल केला आहे.
कोल्हापूर जिल्ह्यात अल्पवयीन विवाहही जोरात
या घटनेनंतर समाजमन सुन्न झाले असले, तरी कोल्हापूर जिल्ह्यात चालू वर्षात बालविवाह सुद्धा मोठ्या प्रमाणावर उघडकीस आले आहेत. कोल्हापूर शहरासह जिल्ह्यात बालविवाहांचे प्रमाण विशेषत: कोरोना काळापासून वाढले आहे. गेल्या सहा महिन्यांमध्ये तब्बल 19 बालविवाह झाल्याचे आढळले आहे. लग्न करताना वधूचे वय 18 पेक्षा, तर वराचे वय 21 पेक्षा कमी असल्यास बालविवाह समजला जातो. अनेक कारणांनी बालविवाह होण्याचे प्रमाण वाढले आहे. अल्पवयीन मुलींना फूस लावून पळवून नेऊन विवाह केल्याच्या घटनांमध्येही अलीकडील काळात वाढ झाली आहे.
महिला अत्याचारांमध्येही वाढ
एका बाजून बालविवाह उघडकीस येत असतानाच महिला अत्याचाराच्या घटनांमध्येही वाढ झाली आहे. यामध्ये सासरचा जाच, एकतर्फी प्रेमातून तसेच, सोशल मीडियातून ओळख झालेल्या घटनांचाही समावेश आहे.
20 सप्टेंबर रोजी नात्यातील तरुणाकडून तरुणीचा निर्घृण खून
दुसरीकडे व्हॉटस्ॲप् स्टेट्सवर मला माफ करा, मी जात आहे, गुडबाय लाईफ, असा मेसेज टाकून तरुणाने तरुणीचा निर्घृण खून केल्याची घटना 20 सप्टेंबर रोजी पन्हाळा तालुक्यात घडली होती. गिरोली घाट (ता. पन्हाळा) येथील पांडवलेणी परिसरामध्ये चार चाकी गाडीतून नेत तरुणाने तरुणीचा नॉयलान दोरीनं गळा आवळून व डोक्यात वार करून खून केला. त्याच ठिकाणी तरुणाने सुद्धा विष पिऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. त्याला उपचारासाठी दाखल केल्यानंतर त्याचाही मृत्यू झाला होता.
मृत दोघेही नातेवाईक होते. ऋतुजा प्रकाश चोपडे (वय 21, रा. खोतवाडी, ता. हातकणंगले) असं खून झालेल्या तरुणीचं नाव आहे. कैलास आनंदा पाटील (वय 26, रा. लिंगनूर, ता. कागल) असं आत्महत्या केलेल्या तरुणाचं नाव आहे. दोघेही नातेवाईक असल्याने गेल्या काही दिवसांपासून त्यांच्या लग्नाची चर्चा सुरु होती. मात्र, याला काही नातेवाईकांचा विरोध असल्यानेच त्याने टोकाचे पाऊल उचलल्याचे बोलले जात आहे. कैलासला कामधंदा करत नसल्याने नातेवाईकांनी लग्नाला विरोध केला होता.
इतर महत्वाच्या बातम्या