(Source: ECI/ABP News/ABP Majha)
kolhapur News : पब्जीच्या नादात टोकाचं पाऊल, कोल्हापुरात विष प्राशन करून तरुणानं संपवलं जीवन
kolhapur News Update : पब्जी ( PUBG) गेमच्या नादात तरुणानं विष प्राशन करून जीवन संपल्याचे समोर आले आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील करवीर तालुक्यात ही घटना घडलीय.
kolhapur News Update : कोल्हापूर जिल्ह्यातील करवीर तालुक्यातील घानवडे गावात एक धक्कादायक घटना घडलीय. पब्जी ( PUBG) गेमच्या नादात तरुणानं विष प्राशन करून जीवन संपल्याचे समोर आले आहे. हर्षद डकरे असं आत्महत्या केलेल्या तरुणाचं नाव आहे. पब्जी खेळण्यावरुन झालेल्या वादानंतर तरुणानं टोकाचं पाऊल उचललंय.
हर्षद हा कोल्हापूर जिल्ह्यातील करवीर तालुक्यातील घानवडे गावात राहत होता. गेल्या काही दिवसांपासून त्याला पब्जी खेळण्याचं व्यसन लागलं होतं. पब्जी खेळण्यावरून त्याचे घरात वारंवार वाद होत होते. या वादातूनच हर्षद याने विष प्राशन केलं. कुटुंबातील सदस्यांना याबाबत समजल्यानंतर हर्षद याला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आलं. परंतु, रुग्णालयात उपचारादर सुरू असताना हर्षद याचा मृत्यू झाला. पब्जी गेमच्या नादाने तरुणाला प्राण गमवावे लागल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
पब्जीचे अनेक किस्से वारंवार आपल्या समोर आलेले आहेत. पब्जी गेम खेळणाऱ्यांची संख्या मोठी आहे, यातील तरुणांचा सहभाग लक्षणीय आहे. गेम खेळण्याच्या नादात सध्या तरुण इतके गुंग होऊन जातात की त्यांना कशाचच भान राहत नाही, हे या घटनेवरुन अधोरेखित होतंय. त्यामुळे गेमिंग करणाऱ्या तरुणांबाबत चिंता व्यक्त केली जात आहे. तर आजच्या युगात मुलांच्या पालकांनीही सतर्क होण्याची गरज आहे. मुलांच्या हातात मोबाईल फोन देताना ते त्याचा उपयोग नेमका कशासाठी करतात यावर पालकांनीही लक्ष ठेवणं गरजेचं आहे.
पब्जी हा जीवघेणा खेळ जगभरात मोबाईलवर खेळला जाणारा लोकप्रिय खेळ आहे. भारतात देखील या खेळाचे अनेक चाहते आहेत. जपानी चित्रपट 'बॅटल रोयाल' पासून प्रेरणा घेऊन हा गेम बनवण्यात आल्याचं बोललं जातं. पब्जीमध्ये जवळपास शंभर खेळाडू एखाद्या टेकडीवर पॅराशूटच्या मदतीनं उडी घेतात, शस्त्रं शोधतात आणि एकमेकांना मारतात. हे खेळाडून तोपर्यंत मारतात जोपर्यंत त्यांच्यातील केवळ एक जण जिवंत राहत नाही. अलीकडे या गेमचं व्यसन अनेक मुलांना लागलं आहे. परंतु, त्याच्या व्यसनाने अनेक तरूणांना आपले प्राण देखील गमवावे लागले आहेत. गेल्या काही दिवसांत पब्जीमुळे अनेकांनी असं टोकांंचं पाऊल उचलल्याच्या अनेक घटना समोर आल्या आहेत.
महत्वाच्या बातम्या