(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Palghar News : PUBG खेळताना तरुण इमारतीवरुन खाली कोसळला
Palghar News : 16 वर्षीय युवकाला पबजी गेम खेळणं चांगलंच महागात पडलं आहे. या खेळात इतका गुंतला की तो दुसऱ्या माळ्यावर आहे याचा त्याला विसर पडला. खेळता खेळता अचानक हा युवक दुसऱ्या माळ्यावरुन खाली पडला.
पालघर : सेल्फी घेताना टेकडी, डोंगरकड्यावरुन कोसळल्याच्या अनेक बातम्या वाचल्या असतील. पण पबजी (PubG) खेळताना तरुण इमारतीवरुन कोसळल्याची घटना पालघर जिल्ह्यात घडली आहे. शादान शेख असं या तरुणाचं नाव आहे. या घटनेत तरुण गंभीर जखमी झाला आहे. इमारतीवरुन तरुण पडल्याचं कळताच त्याला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आलं. सध्या या तरुणावर पालघरच्या रिलीफ रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
पालघरच्या शिरगावमध्ये काल (15 मे) ही घटना घडली. 16 वर्षीय युवकाला पबजी गेम खेळणं चांगलंच महागात पडलं आहे. शादान शेख आपल्या मित्रांसोबत शिरगाव इथल्या एका अंडर कन्स्ट्रक्शन इमारतीवर पबजी गेम खेळत होता. मात्र तो या खेळात इतका गुंतला की तो दुसऱ्या माळ्यावर आहे याचा त्याला विसर पडला. खेळता खेळता अचानक हा युवक दुसऱ्या माळ्यावरुन खाली पडला. या अपघातात त्याला गंभीर दुखापत झाली आहे. उपचारांसाठी त्याला पालघरमधील रिलीफ रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.
पबजीचे अनेक किस्से वारंवार आपल्या समोर आलेले आहेत. पबजी गेम खेळणाऱ्यांची संख्या मोठी आहे, यातील तरुणांचा सहभाग लक्षणीय आहे. गेम खेळण्याच्या नादात सध्या तरुण इतके गुंग होऊन जातात की त्यांना कशाचच भान राहत नाही, हे या घटनेवरुन अधोरेखित झालं आहे. त्यामुळे गेमिंग करणाऱ्या तरुणांबाबत चिंता व्यक्त केली जात आहे. तर आजच्या युगात मुलांच्या पालकांनीही सतर्क होण्याची गरज आहे. मुलांच्या हातात मोबाईल फोन देताना ते त्याचा उपयोग नेमका कशासाठी करतात यावर पालकांनीही लक्ष ठेवणं गरजेचं आहे.
पबजी खेळता खेळता 12 वर्षीय मुलगा रेल्वेने नांदेडहून नाशिकरोडला पोहोचला
पबजी खेळाने किती वेड लावलं याचं उदाहरण काही दिवसांपूर्वी नांदेडमध्ये पाहायला मिळालं. मोबाईल फोनवर पबजी खेळता खेळता 12 वर्षाचा मुलगा रेल्वेने नांदेडहून थेट नाशिकला पोहोचला. हा मुलगा गेम खेळता खेळता रेल्वेत बसला. गेममध्ये स्पर्धा वाढत गेल्याने तो गुंतत गेला आणि आपण काय करतोय हे उमजण्यापलीकडे तो गेला. गाडी वेगाने पुढे जात होती आणि तोही घरापासून दूर चालला होता. मुलगा घरी नसल्याने शोधाशोध सुरु झाली. घरचे रेल्वे पोलिसांपर्यंत पोहोचले. व्हॉट्सअॅपवर मुलाचा फोटो पोलिसांपर्यंत पोहोचला. अखेर सायंकाळी नाशिकरोड पोलिसांना हा मुलगा तपोवन एक्स्प्रेसमध्ये आढळला. प्रचंड भेदरल्याने तो बोलतच नव्हता. काही तासांनी त्याने माहिती दिली. मुलगा मिळाल्याचा फोन वडिलांना गेला. प्रचंड धावपळ करत त्यांनी नाशिकरोड स्थानक गाठलं आणि त्यांनी त्याला मिठी मारली.