(Source: ECI/ABP News/ABP Majha)
अखेर एकनाथ खडसेंच्या आंदोलनाला यश, जळगाव जिल्हा दूध संघाच्या घोटाळ्या प्रकरणी गुन्हा दाखल
Jalgaon District Milk Scam Case : जळगाव जिल्हा दूध संघाच्या दूध पावडर आणि लोणी घोटाळा प्रकरणात पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांनी या प्रकरणी पोलिस ठाण्यात आंदोलन केले होते.
जळगाव : राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांच्या आंदोलनाला अखेर यश आले आहे. जिल्हा दूध संघाच्या दूध पावडर आणि लोणी घोटाळा प्रकरणात पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. एकनाथ खडसे यांनी जिल्हा दूध संघाच्या दूध पावडर व लोणी घोटाळा प्रकरणात गुन्हा दाखल व्हावा या मागणीसाठी शहर पोलिस ठाण्यात तब्बल नऊ तास आंदोलन केले होते. त्या प्रकरणात अखेर पोलिसांनी स्वतः फिर्यादी होवून गुन्हा दाखल केला आहे. एकनाथ खडसे यांच्या तक्रारीनंतर गुन्हा दाखल झाला असला तरी जिल्हा दूध संघाच्या अध्यक्ष मंदाकिनी खडसे यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता वर्तवण्यात आहे.
जिल्हा दूध संघातील दूध पावडर आणि लोणी घोटाळ्या प्रकरणी भाजपचे आमदार मंगेश चव्हाण यांनी दीड कोटी रुपयांचा अपहार झाल्याची तक्रार पोलिसात दिली होती. त्यानंतर एकनाथ खडसे संचालक मंडळाच्या वतीने चोरीची तक्रार पोलिसांत नोंदविण्यात आली होती. या दोन्ही तक्रारींची दखल घेत पोलिसांनी स्वतःच या प्रकरणी अपहाराचा गुन्हा दाखल करून घेतला आहे.
या घोटाळ्यात पोलिसांनी थेट कुणाचेही नाव न घेता या घोटाळ्यासाठी जबाबदार व्यक्तींच्या विरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केल्याने दूध संचालक मंडळासह याला अन्य कोण जबाबदार आहे? असा प्रश्न निर्माण झाला आहे. जिल्हा दूध संघाच्या चेअरमन म्हणजेच अध्यक्षा एकनाथ खडसे यांच्या पत्नी मंदाकिनी खडसे या आहेत. आता जिल्हा दूध संघाच्या घोटाळ्याप्रकरणी गुन्हा दाखल झाल्यामुळे संघाच्या अध्यक्ष या नात्याने त्यांच्या अडचणीत वाढ होणार असल्याचे बोलले जात आहे. या घटनेत पोलिस काय तपास करतात? जिल्हा दूध संघाच्या घोटाळ्यात नेमकं कोण दोषी म्हणून निष्पन्न होतंय याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
जळगाव जिल्हा दूध संघातील अपहारासंबंधी गुन्हा दाखल करा, अशी मागणी करत एकनाथ खडसे यांनी जळगाव शहर पोलिस ठाण्यात 14 ऑक्टोबर रोजी ठिय्या आंदोलन सुरु केलं होतं. मेलो तरी गुन्हा दाखल झाल्याशिवाय मी इथून जाणार नाही असा इशारा खडसेंनी दिला होता. त्यानंतर तब्बल आठ तासांच्या पाठपुराव्यानंतर पोलिसांनी तक्रार अर्ज दाखल करुन घेतला होता. अर्ज दाखल करुन घेतला असला तरी गुन्ह्याची नोंद अद्यापही केली नव्हती. त्यानंतर गुन्हा नोंद करण्यात यावा, या मागणीसाठी एकनाथ खडसेंनी आपल्या कार्यकर्त्यांसह रात्रभर पोलिस ठाण्याच्या समोर ठिय्या आंदोलन केलं होतं. अखेर या प्रकरणी आज पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.