(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Weather : उत्तर भारतात हवामानाचा मूड बदलणार, अनेक राज्यात पावसाचा अंदाज
उत्तर भारतातील काही राज्यात तापमान वाढले आहे. त्यामुळे नागरिकांना थंडीपासून दिलासा मिळाला आहे. पण लवकरच देशाच्या राजधानीसह अनेक राज्यातील हवामानाचा मूड बदलणार आहे.
Weather Update : गेल्या काही दिवसांपासून हवामानात बदल होत असल्याचे चित्र दिसत आहे. उत्तर भारतातील काही राज्यात तापमान वाढले आहे. त्यामुळे नागरिकांना थंडीपासून दिलासा मिळाला आहे. पण हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, लवकरच देशाच्या राजधानीसह अनेक राज्यातील हवामानाचा मूड बदलणार आहे. अनेक राज्यामध्ये पावसाची शक्यता देखील हवामान विभागाने वर्तवली आहे. त्यामुळे थंडीचा कडाका पुन्हा वाढण्याची शक्यता आहे. महाराष्ट्रात विदर्भातील काही जिल्ह्यांसह उत्तर महाराष्ट्रात अद्याप थंडी आहे. अन्य ठिकाणी राज्यात मात्र, थंडीचा कडाका कमी झाला आहे. तपमान वाढल्यामुळे नागरिकांना दिलासा मिळाला आहे.
दिल्ली एनसीआरमधील तापमान वाढले आहे, त्यामुळे कडाक्याच्या थंडीपासून नागरिकांना दिलासा मिळाला आहे. परंतू, हवेच्या खराब गुणवत्तेमुळे चिंता वाढली आहे. काल म्हणजेच रविवारी दिल्लीतील हवेची गुणवत्ता खराब श्रेणीत नोंदवण्यात आली. राजधानीचा AQI सकाळी 9 वाजता 244 वर होता. त्याच वेळी, AQI फरिदाबादमध्ये 258, गुरुग्राममध्ये 216, गाझियाबादमध्ये 238 आणि नोएडामध्ये 218 वर गरीब श्रेणीत राहिला आहे. दरम्यान, हवामान विभागाच्या माहितीनुसार, सक्रिय वेस्टर्न डिस्टर्बन्समुळे येत्या काही दिवसात अनेक राज्यांमध्ये पाऊस आणि हिमवृष्टी होऊ शकते. येत्या बुधवारी म्हणजेच 16 फेब्रुवारीला दिल्लीतही पाऊस पडण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. तसेच उत्तर प्रदेशमध्ये देखील पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
बिहारमध्ये धुके
हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, उत्तर प्रदेश आणि बिहारमधील अनेक शहरांमध्ये सकाळी दाट धुके असण्याची शक्यता आहे. 14 ते 17 फेब्रुवारीपर्यंत या भागात सकाळी आणि रात्री दाट धुके राहील. त्यामुळे लोकांना वाहन चालवताना त्रास होऊ शकतो. तर 18 फेब्रुवारी रोजी आकाश अंशतः ढगाळ राहील, त्यामुळे अनेक भागात हलक्या पावसाचीही शक्यता वर्तवण्यात आली आहे.
राजस्थानमध्ये थंडी
राजस्थानमध्ये सध्या लोकांना थंडीचा सामना करावा लागत आहे. रविवारी रात्री आणि दिवसा तापमानात एक ते दोन अंश सेल्सिअसची वाढ होऊनही काही भागात थंडीचा प्रकोप सुरूच आहे. त्याचवेळी हरियाणातील लोकांना दिवसा सूर्यप्रकाशामुळे मोठा दिलासा मिळाला आहे. सोमवारपासून हिमाचल प्रदेशातील उंच डोंगराळ जिल्ह्यांमध्ये पाऊस आणि हिमवृष्टीची शक्यता आहे. वेस्टर्न डिस्टर्बन्समुळे हिमाचल प्रदेशच्या हवामानात बदल होणार असून 17 फेब्रुवारीपर्यंत पाऊस पडण्याची शक्यता आहे.
महत्त्वाच्या बातम्या: