(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Covid Vaccination: 1 जानेवारी 2023 पर्यंत 15 वर्षे पूर्ण करणाऱ्यांना लस घेता येणार
नॅशनल हेल्थ मिशन (NHM) चे अतिरिक्त सचिव विकास शील यांनी राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना पत्र लिहिले आहे. यामध्ये त्यांनी 1 जानेवारी 2023 पर्यंत 15 वर्षे पूर्ण करणाऱ्यांना देखील लस घेता येणार आहे.
Covid Vaccination: कोरोनाच्या विरोधात लढण्यासाठी केंद्र सरकारकडून मोठ्या प्रमाणावर लसीकरणाची मोहिम सुरू आहे. ज्यांनी कोरोनाची लस घेतली नाही, अशांना लसीकरण करण्याचे आवाहन सरकारकडून केले जात आहे. केंद्र सरकारने लसीकरणासाठी पात्र मुलांसाठी स्पष्टीकरण दिले आहे. याबाबत नॅशनल हेल्थ मिशन (NHM) चे अतिरिक्त सचिव विकास शील यांनी राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना पत्र लिहिले आहे. यामध्ये त्यांनी 1 जानेवारी 2023 पर्यंत 15 वर्षे पूर्ण करणाऱ्यांना देखील लस घेता येणार आहे.
1 जानेवारी 2023 ला 15 वर्ष पूर्ण करणाऱ्यांना 15 ते 18 वयोगटात सामील करण्यात आले आहे. विकास शील यांनी राज्यांना लिहिलेल्या पत्रात स्पष्ट केले आहे की 2005, 2006 आणि 2007 मध्ये जन्मलेली मुले ही 15 ते 18 वर्षे गटाअंतर्गत लसीकरणासाठी पात्र असणार आहेत.
आरोग्य मंत्रालयाचे संयुक्त सचिव लव अग्रवाल यांनी देखील लसीकरणाबाबत माहिती दिली आहे. देशात आतापर्यंत अशी 19 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेश आहेत जिथे लसीकरण कव्हरेज राष्ट्रीय सरासरीपेक्षा जास्त केले आहे. इतकेच नाही तर 16 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये किशोरवयीन लसीकरणाची व्याप्ती राष्ट्रीय सरासरीपेक्षा जास्त आहे. आतापर्यंत देशात लसीचे 163 कोटींहून अधिक डोस देण्यात आले आहेत. 88.98 कोटी लोकांना लसीचा पहिला तर 69.52 कोटी लोकांना लसीचे दोन्ही डोस देण्यात आले आहेत. देशातील 97.03 लाख लोकांना अँटी-कोविड-19 लसीचा प्री-डोज देण्यात आला आहे. गेल्या वर्षी 16 जानेवारीपासून देशात कोविड-19 विरुद्धच्या लसीकरणाची मोहीम सुरू झाली होती. लसीकरणाच्या पहिल्या टप्प्यात आरोग्य कर्मचाऱ्यांना लसीचे डोस देण्यात आल्याची माहिती लव अग्रवाल यांनी दिली आहे.
ज्यांना इतर गंभीर आजार आहेत अशा 60 वर्षांवरील आणि 45 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या व्यक्तींचे लसीकरण गतवर्षी 1 मार्चपासून सुरू करण्यात आले होते. 2021 मध्येच, 1 मे 2021 पासून 18 वर्षांवरील सर्व लोकांच्या लसीकरणास परवानगी देऊन सरकारने मोहिमेची व्याप्ती आणखी वाढवली आहे. 3 जानेवारीपासून 15 ते 18 वयोगटातील लसीकरणाला सुरूवात झाली होती. या वयोगटातील मुलांना मोठ्या प्रमाणावर लसीकरण करण्यात आले आहे. चांगली प्रतिसाद मिळत असल्याची माहिती देखील देण्यात आली आहे.
महत्त्वाच्या बातम्या: