Delhi Power Crisis : दिल्लीवरही वीज संकट, मेट्रो, रुग्णालये आणि इतर महत्त्वाच्या आस्थापनांना फटका बसण्याची शक्यता
देशाची राजधानी दिल्लीला देखील विजेच्या समस्येला सामोरं जावं लागत आहे. वीज संकटाचा परिणाम देशाच्या राजधानीवर होत असल्याचे दिसून येत आहे.
Delhi May Face Big Power Crisis : सध्या देशातील अनेक राज्यात विजटंचाईची समस्या निर्माण झाली आहे. कोळशाच्या तुटवड्यामुळे विजेची टंचाई झाली आहे. अशातच आता देशाची राजधानी दिल्लीला देखील या विजेच्या समस्येला सामोरं जावं लागत आहे. वीज संकटाचा परिणाम देशाच्या राजधानीवरही दिसून येत आहे. त्यामुळे दिल्ली सरकारने मेट्रो, रुग्णालये आणि इतर महत्त्वाच्या आस्थापनांना अखंडित वीजपुरवठा करण्यास असमर्थता व्यक्त केली आहे. सध्याच्या परिस्थितीत बराच काळ सुरळीत वीज पुरवठा करणे शक्य नाही त्यात अडचणी येऊ शकतात असे राज्य सरकारचे म्हणणे आहे.
दरम्यान, या वीजटंचाईच्या पार्श्वभूमीवर दिल्लीचे उर्जा मंत्री सत्येंद्र जैन यांनी परिस्थितीचे मूल्यांकन करण्यासाठी तातडीची बैठक घेतली. तसेच यासंदर्भात केंद्राला पत्र लिहून राष्ट्रीय राजधानी दिल्लीला वीजपुरवठा करणाऱ्या पॉवर प्लांट्सना कोळशाची पुरेशी उपलब्धता सुनिश्चित करण्याची विनंती केली आहे. दादरी-2 आणि उंचाहर पॉवर स्टेशनमधून वीज पुरवठ्यात व्यत्यय आला आहे. त्यामुळे दिल्ली मेट्रो आणि दिल्लीतील सरकारी रुग्णालयांसह इतर अनेक महत्त्वाच्या संस्थांना 24 तास वीज पुरवठा करण्यात समस्या निर्माण होऊ शकते, असे सरकारी निवेदनात म्हटले आहे. सध्या दिल्लीतील 25-30 टक्के विजेची मागणी या वीज केंद्रांद्वारे पूर्ण केली जात आहे. या केंद्रांना गेल्या काही दिवसांपासून कोळशाचा तुटवडा भासत आहे. अशा परिस्थितीत ही समस्या आणखी वाढण्याची शक्यता असल्याचे दिल्लीचे उर्जामंत्री सत्येंद्र जैन म्हटले आहे. दरम्यान, सरकार परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून आहे, राजधानीच्या कोणत्याही भागात लोकांना विजेच्या समस्येचा सामना करावा लागू नये यासाठी सरकार सर्वतोपरी प्रयत्न करत असल्याचे त्यांनी सांगितले.
दिल्लीला कोणत्या ठिकाणाहून होतो वीजपुरवठा
NTPC च्या दादरी-2 आणि झज्जर (अरावली) स्टेशन्सची स्थापना मुख्यत्वे दिल्लीच्या वीजेची गरज पूर्ण करण्यासाठी करण्यात आली होती. दादरी-२, उंचाहर, कहालगाव, फरक्का आणि झज्जर पॉवर प्लांट्समधून दिल्लीला दररोज 1 हजार 751 मेगावॅट विजेचा पुरवठा केला जातो. राजधानीला दादरी-2 पॉवर स्टेशनमधून सर्वाधिक 728 मेगावॅटचा पुरवठा होतो, तर 100 मेगावॅट उंचाहर स्टेशनमधून मिळतो. नॅशनल पॉवर पोर्टलच्या दैनंदिन कोळसा अहवालानुसार, या सर्व वीज प्रकल्पांना कोळशाचा तीव्र तुटवडा जाणवत आहे. अशा परिस्थितीत संकट आणखी गडद होऊ शक्यता निर्माण झाली आहे.
काही भागात कपात सुरु
सध्या दिल्लीतील अनेक भागात विजेची कपात सुरु करण्यात आल्याची माहिती मिळत आहे. दुसरीकडे, ऑल इंडिया पॉवर इंजिनीअर्स फेडरेशनने सांगितले की, देशभरातील औष्णिक प्रकल्पांना कोळशाचा तुटवडा जाणवत आहे, हे देशातील वीज संकटाचे लक्षण आहे. त्यामुळे लवकरात लवकर कोळशाचा पुरवठा होणे गरजेचे आहे. अन्यथा विजेचे संकट आणखी गडद होण्याची शक्यता आहे.
महत्त्वाच्या बातम्या:
- प्रवाशांनो लक्ष द्या... रेल्वेचा मोठा निर्णय! वीज निर्मितीसाठी कोळसा वाहतुकीच्या सुलभतेसाठी काही प्रवासी गाड्या रद्द
- Kisan Railway : किसान रेल्वे तात्पुरत्या बंद करण्याचा निर्णय, शेतमालाच्या वाहतुकीची गैरसोय होत असल्यानं शेतकऱ्यांची नाराजी