Pawan Kalyan On Allu Arjun : हैदराबाद पोलिसांनी अल्लू अर्जुनला बेडरुममध्ये उचललं; पवन कल्याण यांच्याकडून सीएम रेवंत रेड्डींचं कौतुक, नेमकं काय म्हणाले?
Pawan Kalyan On Allu Arjun : पवन कल्याण म्हणाले की, अधिकाऱ्यांनी सार्वजनिक सुरक्षेला प्राधान्य देणे महत्त्वाचे आहे. कायदा सर्वांसाठी समान आहे. अशा घटनांमध्ये पोलिस सुरक्षेचा विचार करून काम करतात.

Pawan Kalyan On Allu Arjun : कायदा सर्वांसाठी समान आहे आणि पोलिसांनी लोकांच्या सुरक्षेचा विचार करून काम केले पाहिजे, अशी प्रतिक्रिया जनसेना पक्षाचे अध्यक्ष पवन कल्याण यांनी दिली आहे. संध्या थिएटर चेंगराचेंगरीप्रकरणी अभिनेता अल्लू अर्जुनवर कारवाई करण्याबाबत आंध्र प्रदेशचे उपमुख्यमंत्री पवन कल्याण यांनी तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांचे कौतुक करत त्यांचा "महान नेता" असा उल्लेख केला. चेंगराचेंगरीत मृत्युमुखी पडलेल्या महिलेच्या कुटुंबीयांना आधी भेटायला हवे होते, असेही त्यांनी अल्लू अर्जुनला सुचवत कानपिचक्या दिल्या.
पवन कल्याण यांनी तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांचे कौतुक केले
आंध्रच्या उपमुख्यमंत्र्यांनी तेलंगणाचे मुख्यमंत्री रेड्डी यांचे कौतुक केले आणि ते म्हणाले की ते एक सामान्य पार्श्वभूमीतून उदयास आलेले नेते आहेत. ते म्हणाले, "रेवंत रेड्डी हे महान नेते आहेत. त्यांनी वायएसआरसीसारखे काम केले नाही. तथापि, या प्रकरणात अल्लू अर्जुनचे काय झाले याबद्दल मला पूर्णपणे माहिती नाही." NDTV च्या वृत्तानुसार, मंगलागिरी येथे सोमवारी (30 डिसेंबर 2024) पत्रकारांशी अनौपचारिक संभाषणात, चित्रपट अभिनेता कल्याण यांनी 4 डिसेंबर रोजी हैदराबादच्या संध्या थिएटरमध्ये झालेल्या चेंगराचेंगरीच्या घटनेबद्दल मत मांडले. अल्लू अर्जुन पुष्पा 2 च्या स्क्रिनिंगसाठी संध्या थिएटरमध्ये पोहोचला होता. कोणतीही पूर्वसूचना न देता आल्याने गर्दी होऊन चेंगराचेंगरी झाली. या घटनेत रेवती या 35 वर्षीय महिलेचा मृत्यू झाला असून तिचा मुलगा जखमी झाला. त्यानंतर हैदराबाद पोलिसांनी अल्लू अर्जुनविरुद्ध गुन्हा दाखल केला होता. यानंतर त्याला अटक झाली आणि काही वेळाने जामीनही मिळाला.
'सुरक्षा डोळ्यासमोर ठेवून पोलिसांचे काम'
आंध्र प्रदेशचे उपमुख्यमंत्री पवन कल्याण म्हणाले की, अधिकाऱ्यांनी सार्वजनिक सुरक्षेला प्राधान्य देणे महत्त्वाचे आहे. कायदा सर्वांसाठी समान आहे. अशा घटनांमध्ये पोलिस सुरक्षेचा विचार करून काम करतात. मात्र, थिएटर कर्मचाऱ्यांनी अल्लू अर्जुनला परिस्थितीची आधीच माहिती द्यायला हवी होती. विशेष म्हणजे पवन कल्याण अल्लू अर्जुनचा नातेवाईक आहेत. अल्लू अर्जुनची मावशी सुरेखा यांचा विवाह प्रसिद्ध अभिनेते चिरंजीवीसोबत झाला आहे आणि ते पवन कल्याणचा मोठे भाऊ आहेत. अशा घटना रोखण्यासाठी अभिनेता काय करू शकला असता असे पवन कल्याण यांना विचारले असता पवन कल्याण म्हणाले की, अल्लू अर्जुनने पीडितेच्या कुटुंबीयांची आधी भेट घेतली असती तर तणाव कमी झाला असता. त्यांनी सांगितले की मोठा भाऊ चिरंजीवी देखील त्यांच्या चित्रपटांच्या स्क्रीनिंगला उपस्थित असायचा परंतु गोंधळ निर्माण होऊ नये म्हणून ते अनेकदा मास्क घालत असत.
इतर महत्वाच्या बातम्या























