Rohit Sharma : मागील 15 कसोटीत फक्त एका अर्धशतकासह अवघ्या 619 धावा; कॅप्टन रोहित कसोटी फॉर्मेटमधून निवृत्त होणार? पत्रकार परिषदेतील 5 मोठे मुद्दे
Rohit Sharma भारतीय कर्णधार रोहित शर्माने यावर्षी 14 कसोटी सामने खेळले आहेत. या 14 सामन्यांच्या 26 डावांमध्ये त्याने 24.76 च्या सरासरीने 619 धावा केल्या आहेत.
Rohit Sharma : टीम इंडियाचा कॅप्टन रोहित शर्माच्या खराब फॉर्ममुळे सोशल मीडियावर त्याच्या निवृत्तीची मागणी होत आहे. बॉर्डर गावस्कर ट्रॉफीनंतर रोहित शर्मा कसोटी फॉरमॅटला अलविदा म्हणू शकतो, अशाही अफवा आहेत. मेलबर्न कसोटीतील पराभवानंतर रोहित शर्माने पत्रकार परिषदेत संकेत दिले की, निवृत्तीबाबत सध्या काहीही विचार करत नाही. पत्रकार परिषदेत रोहित शर्माला विचारण्यात आले की, तो स्वत:ला कर्णधार आणि फलंदाज म्हणून कुठं पाहत आहे. रोहितने स्पष्ट केले की तो पूर्वी जिथे होता, तो आजही आहे. म्हणजे निवृत्तीचा विचार त्याच्या मनात नाही.
आम्ही चांगले खेळलो तर मालिका 2-2अशी बरोबरीत राहील
रोहित शर्माने आपल्या वक्तव्यात म्हटले आहे की, 'आम्हाला आमच्या बाजूने खेळ जिंकण्याची संधी होती. एकतर ते जिंकतील किंवा ड्रॉ करतील. अजून एक सामना बाकी आहे. आम्ही चांगले खेळलो तर मालिका 2-2अशी बरोबरीत राहील.
मागच्या गोष्टींचा विचार करत नाही
रोहित म्हणाला की, 'एक कर्णधार आणि खेळाडू म्हणून मी जिथे होतो तिथेच उभा आहे. मागे काय झाले याचा विचार करण्याची गरज नाही. मी एक फलंदाज म्हणून खूप काही करण्याचा प्रयत्न करतोय,पण काही घडत नाही. तुम्हाला मैदानावर जाऊन त्या गोष्टी व्यवस्थितपणे करायच्या असतात पण जेव्हा ते होत नाही तेव्हा खूप निराशा होते. रोहित यंदा कसोटी फॉरमॅटमध्ये फ्लॉप ठरला आहे. भारतीय कर्णधाराने यावर्षी 14 कसोटी सामने खेळले आहेत. या 14 सामन्यांच्या 26 डावांमध्ये त्याने 24.76 च्या सरासरीने 619 धावा केल्या आहेत. त्याच्या शेवटच्या 15 कसोटी डावांमध्ये केवळ एक अर्धशतक आहे. बॉर्डर गावस्कर ट्रॉफी 2024 मध्ये रोहितने तीन सामने खेळले आहेत. पाच डावांत तो 6.20 च्या सरासरीने केवळ 31 धावा करू शकला आहे.
1. यशस्वीची वादग्रस्त विकेट
मेलबर्न कसोटीत ऑस्ट्रेलियाकडून झालेल्या दारूण पराभवानंतर कर्णधार रोहित पत्रकार परिषदेत सहभागी झाला होता. रोहितला जेव्हा यशस्वीबद्दल विचारण्यात आले तेव्हा तो म्हणाला की मला या तंत्रज्ञानाबद्दल माहिती नाही, मी काय सांगू. मी असे म्हणू इच्छितो की आम्ही दुर्दैवी होतो.
2. पंतच्या खराब शॉटवर रोहित काय म्हणाला?
पत्रकार परिषदेत जेव्हा रोहित शर्माला ऋषभ पंतच्या शॉटबद्दल प्रश्न विचारण्यात आला तेव्हा रोहित आधी आश्चर्यचकित झाला. हा शॉट आजच्या सामन्याचा होता की पहिल्या डावाचा होता, असा सवाल त्याने पत्रकारांना केला.रोहितने सांगितले की, हे त्यानेच समजून घेतले पाहिजे. त्याने संघाला इतिहासात विजय मिळवून दिला आहे, तरीही जोखीम कधी पत्करावी लागेल आणि कुठे गरज आहे हे समजून घ्यावे लागेल.रोहित पुढे म्हणाला की, मी पंतला बऱ्याच काळापासून ओळखतो आणि त्याचे क्रिकेट मला चांगले समजते. आम्ही दोघे यापूर्वी खूप बोललो आहोत, परंतु केवळ बोलण्याने परिणाम मिळत नाही. त्याने काय करावे हे त्याला चांगले ठाऊक आहे.
3. रोहितने नितीश रेड्डीचे कौतुक केले
अष्टपैलू नितीश कुमार रेड्डीबद्दल बोलताना भारतीय कर्णधार म्हणाला की, तो येथे पहिल्यांदाच आला आहे, त्यामुळे त्याच्यामध्ये क्षमतेची कमतरता नसल्याचे आम्हाला दिसले. बोलायचं झालं तर इथली परिस्थिती खूप कठीण आहे, पण त्याने खूप ताकद दाखवली आणि उत्तम तंत्र दाखवलं आणि शतकी खेळी खेळली. नितीशकडे या पातळीवर यशस्वी होण्यासाठी सर्व काही आहे. मला आशा आहे की तो येथून पुढे भक्कमपणे पुढे जाईल आणि त्याला संघाचा पूर्ण पाठिंबा मिळेल.
4. बुमराहला फारसा पाठिंबा मिळाला नाही
बुमराहबाबत रोहित म्हणाला की, त्याने खूप चेंडू टाकले, पण जर कोणी चांगल्या फॉर्ममध्ये असेल तर त्याने थोडे अतिरिक्त योगदान दिले पाहिजे. रोहित पुढे म्हणाला की त्याने चमकदार कामगिरी केली. आम्हाला माहित आहे की तो आकडेवारीचा माणूस नाही, त्याला फक्त देशासाठी खेळायचे आहे आणि संघासाठी चांगली कामगिरी करायची आहे. दुदैर्वाची गोष्ट म्हणजे त्याला दुसऱ्या बाजूने फारशी साथ मिळाली नाही.
5. रोहित गिलबद्दल काय म्हणाला?
पत्रकार परिषदेत शुभमन गिलबाबत रोहितने सांगितले की, आम्ही त्याच्याशी बोललो आणि सांगितले की आम्ही तुला सोडले नाही. हेच संयोजन आम्हाला हवे होते, आम्हाला फक्त खोल फलंदाजी करायची होती आणि 20 विकेट्स घ्यायच्या होत्या.
इतर महत्वाच्या बातम्या