बिहारच्या 37 व्या मुख्यमंत्र्याच्या रुपात सातव्यांदा शपथ घेणार नितीश कुमार, जाणून घ्या त्यांच्या या आधीच्या शपथांविषयी
बिहारच्या राजकारणात आपले वेगळे स्थान निर्माण केलेले नितीश कुमार हे एनडीएच्या विधीमंडळ नेतेपदी निवडले गेले आहेत. सोमवारी संध्याकाळी 4.30 वाजता त्यांचा शपथविधी होणार आहे.
पाटणा: बिहारमध्ये एनडीएने आपल्या गटनेतेपदी नितीश कुमार यांची निवड केल्यानंतर त्यांचा मुख्यमंत्रीपदी विराजमान होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. उद्या सोमवारी संध्याकाळी 4.30 वाजता नितीश कुमार बिहारच्या 37 व्या मुख्यमंत्र्याच्या रुपात शपथ घेतील. नितीश कुमार सातव्यांदा मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार आहेत.
पाटणामध्ये रविवारी झालेल्या बैठकीत एनडीएच्या चारही प्रमुख पक्षांच्या नेत्यांची बैठक झाली. या बैठकीत राजनाथ सिंह, माजी मुख्यमंत्री जीतन राम मांझी आणि मुकेश सहनी सामील झाले होते. त्यामध्ये विधानमंडळाच्या नेतेपदी नितीश कुमारांचे नाव पक्के करण्यात आले. त्यानंतर आपल्या समर्थक आमदारांचे पत्र घेऊन नितीश कुमार राज्यपालांच्या भेटीसाठी गेले. राज्यपालांच्या भेटीनंतर नितीश कुमारांनी उद्या शपथ घेणार असल्याचे स्पष्ट केलं. या आधी नितीश कुमारांनी 6 वेळा मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली होती.
बिहारच्या राजकारणात आपलं वेगळं स्थान निर्माण केलेल्या नितीश कुमार उद्या सातव्यांदा मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार आहेत.
नितीश कुमारांचा मुख्यमंत्रीपदाचा कार्यकाळ
- नितीश कुमार सर्वप्रथम 3 मार्च 2000 साली आठ दिवसांसाठी मुख्यमंत्री बनले होते. परंतु बहुमताची जमवाजमव करता न आल्याने त्यांना राजीनामा द्यावा लागला होता.
- दुसऱ्यांदा नितीश कुमारांनी 24 नोव्हेंबर 2005 रोजी बिहारच्या मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली.
- तिसऱ्यांदा 26 नोव्हेंबर 2010 रोजी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली.
- चौथ्यांदा नितीश कुमार यांनी 22 फेब्रुवारी 2015 साली मुख्यमंत्रीपद मिळवले.
- पाचव्यांदा पुन्हा 20 नोव्हेंबर 2015 साली नितीश कुमारांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली.
- सहाव्या वेळी आरजेडी सोबत आघाडी तुटल्यानंतर एनडीएच्या नेतृत्वात तयार झालेल्या नव्या गठबंधनच्या माध्यमातून नितीश कुमार यांनी पुन्हा 27 जुलै 2017 रोजी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली.
बिहारच्या निवडणूक निकालात तिसऱ्या क्रमांकावर असणाऱ्या संयुक्त जनता दलाला मुख्यमंत्रीपद मिळाले आहे. सोमवारी नितीश कुमार यांचा शपथविधी होणार आहे.
महत्वाच्या बातम्या: