बिहार निवडणुकांच्या निकालानंतर नितीश कुमार यांनी मुख्यमंत्रीपदासंबंधी केलं मोठं वक्तव्य ; म्हणाले..
बिहारमध्ये एनडीएचं सरकार स्थापन होईल, अशी प्रतिक्रिया नितीशकुमार यांनी दिली आहे. त्यांच्या या वक्तव्यामुळे आश्चर्य व्यक्त केलं जात आहे.
पाटणा : बिहार विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी आज पहिल्यांदाच माध्यमांशी संवाद साधला. शपथविधीची तारीख अद्याप ठरलेली नसून मुख्यमंत्रीपदावर आमचा कोणताही दावा नाही. मुख्यमंत्री कोण होणार याचा निर्णय एनडीए घेईल. बिहारमध्ये एनडीएचं सरकार स्थापन होईल, अशी प्रतिक्रिया नितीशकुमार यांनी दिली आहे. त्यांच्या या वक्तव्यामुळे आश्चर्य व्यक्त केलं जात आहे.
उद्या एनडीएची (जेडीयू, बीजेपी, जेडीयु, वीआयपी) बैठक होणार आहे. त्या बैठकीत महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात येणार आहे. नितीश कुमार यांना मुख्यमंत्री कोण होणार? असं विचारण्यात आलं असता, 'आपण मुख्यमंत्रीपदावर दावा केलेला नाही, एनडीए निर्णय घेईल' असं सांगितलं.
बिहारमध्ये राष्ट्रीय लोकशाही आघाडीने अर्थात NDA ने स्पष्ट 125 जागा जिंकत बहुमत मिळवत सत्ता कायम राखली आहे. सर्व 243 जागांचे निकाल हाती असून NDA ने 125 जागा जिंकल्या आहेत तर महागठबंधननं 110 जागांवर विजय मिळवला आहे. दुसरीकडे नितीश कुमार यांच्या पक्षाला जिथे 2015 मध्ये 71 जागा मिळाल्या होत्या तिथे यावेळी 43 जागांवरच विजय मिळवता आला. गेल्या निवडणुकीच्या तुलनेत भाजपने या निकालात भरारी घेतली आहे. भाजपला 2015 मध्ये 53 जागा मिळाल्या होत्या तर यंदा 74 जागा मिळाल्या आहेत. तब्बल 21 जागा जास्त जिंकून भाजपनं चांगलं यश मिळवलं आहे.
आरजेडीचे नेते तेजस्वी यादव यांनी आरोप लावला आहे की, "आम्हाला लोकांचं समर्थन मिळालं, पण एनडीएने पैसे, भीती आणि बळाच्या जोरावर निवडणुकीत विजय मिळवला आहे." पुढे बोलताना ते म्हणाले की, "नीतिश कुमार यांचा जेडीयू तिसऱ्या क्रमांकावर आहे. जर त्यांच्यात थोडीशी जरी नैतिकता शिल्लक असेल, तर त्यांनी मुख्यमंत्री पदाच्या खुर्चीचा लोभ सोडायला हवा."