पंतप्रधान नरेंद्र मोदींविरोधात GoAir च्या वैमानिकाची आक्षेपार्ह टिप्पणी, कंपनीकडून निलंबनाची कारवाई
पंतप्रधान आणि इतरांविरूद्ध केलेल्या ट्विटबद्दल ज्यामुळे एखाद्याच्या भावना दुखावल्या असतील तर मी दिलगिरी व्यक्त करतो, असं वैमानिकाने म्हटलं आहे.

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदींविरोधात आक्षेपार्ह भाष्य करणे गो-एअरच्या (GoAir) वैमानिकांना महागात पडलं आहे. काही दिवसांपू्र्वी गो एअरच्या वैमानिकाने नरेंद्र मोदी यांच्याविरोधात अवमानकारक वक्तव्य केलं होतं. वैमानिकाचं ट्वीट गो एअरच्या निदर्शनास आल्यानंतर कंपनीने आपल्या कर्मचाऱ्याला नोकरीवरुन काढून टाकलं. गो एअरच्या प्रवक्त्याने माध्यमांना सांगितले की, गो एअरचं शून्य सहिष्णुता धोरण आहे आणि तेच नियम कंपनीतील सर्व कर्मचारी आणि अधिकारी यांना लागू आहेत. अशा परिस्थितीत, कंपनीशी संबंधित सर्व कर्मचार्यांनी सोशल मीडियाशी संबंधित आचरण देखील पाळले पाहिजे.
एअरलाईन्सला व्यक्तीगत मताशी काहीही संबंध नाही
कंपनीच्या प्रवक्त्याने सांगितले की, एअरलाइन्सला गो एयरच्या कोणत्याही कर्मचार्याच्या वैयक्तिक मताशी संबंध नाही. गो-एअरने तातडीने संबंधित वैमानिकाची सेवा समाप्त केली आहे. या प्रकरणात गो एअरने वैमानिकाच्या ट्वीटपासून स्वत:ला दूर केले आणि वैमानिकाविरूद्ध कठोर कारवाई केली आहे.
GoAir sacks senior pilot who made derogatory remarks about PM Modi on Twitter
— Press Trust of India (@PTI_News) January 9, 2021
वैमानिकाने माफी मागितली
गो-एअरच्या निलंबित पायलटने ट्विटरवर केलेल्या वर्तवणुकीबद्दल दिलगिरी व्यक्त केली आहे. पंतप्रधान आणि इतरांविरूद्ध केलेल्या ट्विटबद्दल ज्यामुळे एखाद्याच्या भावना दुखावल्या असतील तर मी दिलगिरी व्यक्त करतो, असं वैमानिकाने म्हटलं आहे. गो-एअरचा माझ्या कोणत्याही ट्वीटशी प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षरित्या संबंध नाही आणि ती ट्वीट माझं वैयक्तिक मत आहे. मी याची संपूर्ण जबाबदारी घेतो आणि माझ्या चुकांचे परिणाम स्वीकारतो.























