मोदींच्या भेटीसाठी तरुणाची 1500 किमीची पायपीट
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना भेटण्यासाठी एका तरुणाने 1500 किमीची पायपीट केली आहे. मोदींनी दिलेल्या आश्वासनाची आठवण करुन देण्यासाठी 71 दिवस चालल्यानंतर हा तरुण दिल्लीत पोहोचला, मात्र त्यांच्या पदरी निराशाच पडली
नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना भेटण्यासाठी एका तरुणाने 1500 किमीची पायपीट केली आहे. मोदींनी दिलेल्या आश्वासनाची आठवण करुन देण्यासाठी 71 दिवस पायी चालल्यानंतर हा तरुण ओदिशाहून दिल्लीत पोहोचला, मात्र त्यांच्या पदरी निराशाच पडली. कारण त्याची मोदींशी भेट होऊ शकली नाही. मुक्तीकांत बिस्वाल असं या तरुणाचं नाव असून ओदिशाच्या सुंदरगड जिल्ह्यातील रहिवासी आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 2014मध्ये निवडणुकीदरम्यान एका रॅलीत रुरकेला येथील हॉस्पिटलला सुपर मल्टिस्पेशलिस्ट हॉस्पिटलमध्ये बदलण्याचं आश्वासन दिलं होतं. तसेच ओदिशातील ब्राह्मणी नदीवरील जुन्या पुलाला पर्याय म्हणून आणखी एक पूल बांधण्याचं आश्वासन दिलं होतं. मात्र मोदींनी त्यांच्या आश्वासनाची पूर्ती केली नाही.
'रुरकेलामध्ये सुपर मल्टिस्पेशलिस्ट हॉस्पिटल झालं तर आजुबाजुच्या परिसरातील रुग्णांना यामुळे मोठा दिलासा मिळू शकतो. मी मोदींना मतदान केलं आहे त्यामुळे त्यांना त्यांच्या आश्वासनाची आठवण करुन देणे माझा हक्क आहे' असं मुक्तीकांत सांगितलं.
'जवळपास वर्षभर पंतप्रधान नरेंद्र मोदींना आणि पंतप्रधान कार्यालयाला पत्रव्यवहार केला. मात्र त्यांच्याकडून काहीही उत्तर नाही मिळालं. स्थानिक आमदार आणि खासदार यांनादेखील परिस्थितीची माहिती दिली, मात्र त्यांनीदेखील मागण्याची गंभीर दखल घेतली नाही, असा आरोप मुक्तीकांतने केला.
मुक्तीकांतने 16 एप्रिल 2018ला रुरकेलावरुन दिल्लीसाठीच्या पायी प्रवासाला सुरुवात केली होती. 27 जूनला तो दिल्लीमध्ये पोहोचला. दिल्लीत पोहोचल्यानंतर मुक्तीकांत आपल्या मागण्यांसाठी रामलीला मैदानात उपोषणाला बसला. मात्र दिल्ली पोलिसांनी मुक्तीकांतला तेथे आंदोलन करण्यास विरोध केला आणि त्याच्यावर दबाव टाकून उपोषण संपवण्यास भाग पाडलं.
कसा होता प्रवास? मुक्तीकांतचा रुरकेला ते दिल्लीचा 1500 किमीचा प्रवास सोपा नव्हता. या प्रवासादरम्यान मुक्तीकांत झारखंडच्या जंगालातून आपली वाट काढली. अनेकदा धाब्यावर आणि रस्त्यावर झोपण्याची वेळ आली. प्रवासादम्यान अनेक शाळांना, लोकांना मुक्तीकांत भेटत असे. वाराणसीमध्ये चुकीच्या रस्ताची माहिती दिल्याने त्याला 250 किमीचा अधिकचा प्रवास करावा लागल्याचंही त्याने सांगितलं. रुरकेलातील इसपात येथे अत्याधुनिक रुग्णालय व्हावं यासाठी मुक्तीकांतने हा खटाटोप केला.
1500 किमी चालत जाण्याचं का ठरवलं? मी गरीब मूर्तीकार आहे. जर मोदींनी दिलेल्या आश्वासनाविषयी बोलण्याचा प्रयत्न केला असता, तर माझं कोणी ऐकलं नसतं. त्यामुळे माझ्या मागण्या त्यांच्यापर्यंत पोहोचण्यासाठी काहीतरी वेगळा मार्ग निवडणे गरजेचं होतं. म्हणून मी चालत दिल्लीला गेलो तर त्याबाबत चर्चा होईल आणि मी देखील चालत जाताना भेटणाऱ्या लोकांना याबाबत माहिती देईल, असं ठरवून पायी जायचं ठरवल्याचं मुक्तीकांतने सांगितले.