Coronavirus Update : कोरोनाची तिसरी लाट टळली? 287 दिवसांनी देशात सर्वात कमी दैनंदिन रुग्णांची नोंद
India Coronavirus Updates : गेल्या 24 तासांत 8,865 नव्या कोरोनाबाधितांची नोंद करण्यात आली आहे. तर 197 कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
India Coronavirus Updates : देशातील कोरोनाबाधितांच्या दैनंदिन आकड्यामध्ये गेल्या काही दिवसांपासून कमालीची घट पाहायला मिळत आहे. काल दिवसभरात देशात 287 दिवसांनी सर्वात कमी कोरोनाबाधितांची नोंद करण्यात आली होती. मंगळवारी आरोग्य मंत्रालयानं जारी केलेल्या ताज्या आकडेवारीनुसार, गेल्या 24 तासांत 8,865 नव्या कोरोनाबाधितांची नोंद करण्यात आली आहे. तर 197 कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर देशात 11,971 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.
देशातील कोरोनाची सद्यस्थिती
कोरोना प्रादुर्भावाच्या सुरुवातीपासून आतापर्यंत एकूण तीन कोटी 44 लाख 56 हजार रुग्णांना कोरोनाची लागण झाली आहे. यापैकी 4 लाख 63 हजार 852 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. महत्त्वाची बाब म्हणजे, 3 कोटी 38 लाख 61 हजार रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. देशात कोरोनाच्या सक्रिय रुग्णांची संख्या 1.5 लाखांहून कमी झाली आहे. एकूण 1 लाख 30 हजार 793 रुग्ण अद्यापही कोरोनावर उपचार घेत आहेत.
113 कोटी लसीचे डोस
केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं जारी केलेल्या आकडेवारीनुसार, 16 नोव्हेंबरपर्यंत देशभरात 112 कोटी 97 लाख 84 हजार कोरोना लसींचे डोस देण्यात आले आहेत. काल दिवसभरात 59.75 लाख डोस देण्यात आले. आयसीएमआरनं दिलेल्या माहितीनुसार, आतापर्यंत जवळपास 62.57 कोटी कोरोना चाचण्या करण्यात आल्या आहेत.
कोरोनाचा विळखा सैल, राज्यात सोमवारी 686 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद
कोरोनाबाधितांच्या दैनंदिन रुग्णसंख्येत चढ उतार पाहायला मिळत आहे. राज्यात काल (सोमवारी) 686 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर 912 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहे. राज्यात आतापर्यंत 64 लाख 68 हजार 791 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. त्यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 97.64 टक्के आहे.
राज्यात काल (सोमवारी) 19 रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. राज्याचा मृत्यूदर 2.12 टक्के झाला आहे. राज्यात सध्या 11 हजार 943 रुग्णांवर उपचार सुरु आहेत. सध्या राज्यात 99, 859 व्यक्ती होम क्वॉरंटाईनमध्ये आहेत तर 1016 व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या 6, 40 , 52, 219 प्रयोगशाळा तपासण्या करण्यात आल्या आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या :