Delhi NCT Act: दिल्लीची सत्ता आता नायब राज्यपालांच्या हाती एकवटली, NCT कायदा लागू
राष्ट्रपतींनी मंजुरी दिलेला NCT कायदा दिल्लीमध्ये 27 एप्रिलपासून लागू करण्यात आला असून दिल्लीचे नायब राज्यपालच ( Lieutenant Governor) आता दिल्लीचे खरे 'सरकार' असणार आहेत.
नवी दिल्ली : दिल्लीतील लोकनियुक्त सरकारचे अधिकार कमी करणाऱ्या आणि केंद्र सरकारच्या हातचा बाहुला असलेल्या नायब राज्यपालांच्या अधिकारात वाढ करणाऱ्या गव्हर्नमेन्ट ऑफ नॅशनल कॅपिटल टेरिटरी ऑफ दिल्ली (अमेन्डमेन्ट) अॅक्ट 2021 (GNCT Act) लागू झाला असून आता दिल्लीतील खरे सरकार हे नायब राज्यपालच असतील हे स्पष्ट झालं आहे. केंद्रीय गृहमंत्रालयाने एक परिपत्रक काढून 27 एप्रिलपासून हा कायदा लागू झाल्याचं सांगितलं आहे.
या नव्या कायद्यानुसार, दिल्ली सरकारला कोणताही कार्यकारी निर्णय घ्यायचा असेल तर त्यापूर्वी राज्यपालांची परवानगी घ्यावी लागणार आहे. दिल्लीच्या नायब राज्यपालांकडे कायदेशीर प्रस्ताव हा किमान 15 दिवस आधी तर प्रशासनिक प्रस्ताव हा किमान 7 दिवस आधी आला पाहिजे.
या कायद्याला दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी कडाडून विरोध केलाय. नायब राज्यपालांना अधिकार द्यायचे असतील तर लोकांनी निवडूण दिलेले सरकार काय करणार, लोकांनी आपली कामे घेऊन कुणाकडे जायचं असा सवाल त्यांनी विचारला आहे. असं जर असेल तर निवडणूका का घ्यायच्या असाही सवाल त्यांनी केला आहे.
राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी गव्हर्नमेन्ट ऑफ नॅशनल कॅपिटल टेरिटरी ऑफ दिल्ली (अमेन्डमेन्ट) बिल 2021 ला मंजुरी दिल्याने त्याचे आता कायद्यात रुपांतर झालं होतं. या कायद्यामुळे नायब राज्यपालांना आता जास्तीचे अधिकार मिळणार आहेत. या कायद्याला दिल्लीच्या केजरीवाल सरकारने विरोध केला आहे. NCT कायदा हा कालपासून, म्हणजे 27 एप्रिलपासून लागू झाला आहे.
दिल्लीच्या लोकनियुक्त सरकारपेक्षा नायब राज्यपालांना अधिकारात प्राधान्य देणारे बिल लोकसभेत आणि राज्यसभेत गेल्या महिन्यात मंजुर करण्यात होते. केंद्र सरकारच्या या बिलला संसदेत 24 मार्चला आप आणि काँग्रेसच्या खासदारांनी कडाडून विरोध केला होता. या बिलमध्ये दिल्लीच्या नायब राज्यपालांच्या काही अधिकारांना आणि भूमिकांना स्पष्ट करण्यात आलं होतं. हे बिल राज्यघटनेच्या तत्वांच्या विरोधात असल्याचं या आधीच दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी सांगितलं होतं.
गृह राज्यमंत्री किशन रेड्डी यांनी संसदेत बोलताना सांगितलं होतं की, राज्यघटनेनुसार विधानसभा असलेले दिल्ली राज्य हे मर्यादित अधिकार असलेला एक केंद्रशासित प्रदेश आहे. उच्च न्यायालयानेही हे स्पष्ट केलं असून संबंधित बिल हे उच्च न्यायालयाच्या निर्णयावर आधारित आहे. राज्यघटनेच्या कलम 239 A नुसार, राष्ट्रपती दिल्लीसाठी नायब राज्यपालाची नियुक्ती करतात. दिल्लीशी संबंधित कोणत्याही मुद्द्यावर मतभेद झाले तर नायब राज्यपाल त्याची माहिती राष्ट्रपतींना देतात. दिल्लीच्या सरकारचे कोणतेही अधिकार कमी केले जाणार नाहीत असंही केंद्रीय गृह राज्यमंत्र्यांनी संसदेत सांगितलं होतं. दिल्ली सरकारकडे अजूनही काही मर्यादित अधिकार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं होतं.
महत्वाच्या बातम्या :
- PM Modi on coronavirus : कोरोना संकटात पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या उच्चस्तरिय बैठका; देशातील ऑक्सिजन स्थितीचा घेतला आढावा
- लस उत्पादक कंपन्यांच्या नफेखोरीला पाठबळ देणाऱ्या केंद्र सरकारचे धोरण भेदभावजनक; काँग्रेस नेत्या सोनिया गांधींचा आरोप
- COVID vaccines: लसीच्या वेगवेगळ्या किंमतीमागचं नेमकं कारण काय? सर्वोच्च न्यायालयाचा केंद्र सरकारला सवाल