(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Bharat Biotech | भारत बायोटेक लसीच्या क्लिनिकल ट्रायलमध्ये तिसऱ्या डोसच्या परीक्षणास मंजुरी
भारत बायोटेकच्या (Bharat Biotech) लसीच्या क्लिनिकल ट्रायलमध्ये आता तिसरा डोसही देण्यात येणार आहे. त्याला Central Drugs Standard Control Organization ने मान्यता दिली आहे.
नवी दिल्ली : देशात कोरोनाच्या रुग्णसंख्येत सातत्याने वाढ होताना दिसत आहे. त्यामुळे सरकारने कोरोनाच्या लसीककरणाचा वेगही वाढवला आहे. त्यात आता भारत बायोटेकच्या लसीसंदर्भात मोठी बातमी आली आहे. भारत बायोटेकच्या लसीच्या क्लिनिकल ट्रायलमध्ये तिसरा डोसही देण्यात येणार आहे. त्यासाठी Central Drugs Standard Control Organization ने मान्यता दिली आहे.
कोरोना लसीच्या दुसऱ्या टप्प्याचे हे विस्तारीत रूप आहे. यामध्ये कोरोना लसीच्या दुसऱ्या डोसनंतर सहा महिन्यांनी हा तिसरा डोस देण्यात येणार आहे. त्यानंतर पुढचे सहा महिने त्याचा फॉलो अप घेण्यात येणार आहे. या तिसऱ्या ट्रायलमधील लसीचे प्रमाण हे सहा मायक्रोग्रॅम इतकं असेल असं भारत बायोटेकच्या वतीनं स्पष्ट करण्यात आलं आहे.
भारत बायोटेकच्या पहिल्या आणि दुसऱ्या लसीच्या डोसचा प्रभाव हा 81 टक्के इतका आहे असं समोर आलं आहे. अशावेळी जर लसीचा तिसरा डोस दिला तर त्याचा परिणाम वाढण्याची शक्यता आहे असं तज्ज्ञांचं मत आहे. त्यामुळे या तिसऱ्या ट्रायलला लवकरच सुरुवात होऊ शकते असं सांगण्यात येतंय. दुसऱ्या टप्प्यातील लसीची ट्रायल ज्या स्वयंसेवकावर करण्यात आली होती त्यांच्यावरच या तिसऱ्या टप्प्यातील लसीचा चाचणी करण्यात येणार आहे असंही कंपनीच्या वतीनं स्पष्ट करण्यात आलं आहे.
देशात गेल्या चोवीस तासात 81,466 नव्या कोरोना रुग्णांची भर पडली आहे तर 469 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तसेच गेल्या चोवीस तासात 50,356 रुग्ण बरे झाले आहेत.
देशभरात गुरुवारपासून 45 वर्षांवरील नागरिकांच्या कोरोना लसीकरणाला सुरुवात झाली आहे. देशात कोरोनाचे रुग्णांची रोज चिंताजनक वाढ होताना दिसत आहे. त्यामुळं केंद्र सरकारनं महत्वाचा निर्णय घेतला आहे. सार्वजनिक आणि खाजगी लसीकरण केंद्रांवर एप्रिल महिन्यामध्ये राजपत्रित सुट्टीसह सर्व सुट्ट्यांच्या दिवशीही लसीकरण केले जाणार असल्याचे केंद्र सरकारकडून सांगण्यात आलं आहे.
महत्वाच्या बातम्या :