Beer Price Hike: बिअर पिणाऱ्यांच्या खिशावर पडणार भार, सरकारने 15 टक्क्यांनी वाढवले दर
Beer Price Hike In Telangana: तेलंगणामध्ये सरकारने मद्यप्रेमींना दणका देत, बीअरच्या किमती 15 टक्क्यांनी वाढवल्या आहेत. आजपासूनच नवीन किमती लागू करण्यात आल्या आहेत.

Beer Price Hike: तेलंगणातील बीअरप्रेमींना सरकारने मोठा झटका दिला आहे. मद्यप्रेमींना आता बिअकसाठी आणखी पैसे खर्च करावे लागणार आहेत. राज्यात बिअरच्या दरात मोठी वाढ झाली आहे. यानंतर बिअरच्या किमती 15 टक्क्यांनी वाढल्या आहेत. राज्यात लागू केलेल्या सुधारित किमती सरकारच्या नवीन उत्पादन शुल्क धोरणांतर्गत येतात, ज्याचा उद्देश मद्यविक्रीतून महसूल वाढवण्याचा आहे.
आजपासून नवीन दर लागू
राज्य सरकारने उत्पादन शुल्कात सुधारणा केली असून, त्यामुळे बिअरच्या किमती 15 टक्क्यांनी वाढल्या आहेत. यानंतर तेलंगणा हे दक्षिण भारतातील बिअरच्या सेवनासाठी सर्वात महागडे राज्य बनले आहे. बिअरच्या किमतीत या वाढीमुळे, नियमित 650 मिली बिअरच्या बाटलीची किंमत ब्रँडनुसार सुमारे 170-180 रुपये असण्याची शक्यता आहे.
रात्री उशिरा दर वाढवण्याच्या सूचना
सोमवारी रात्री उशिरा जारी केलेल्या निर्देशात तेलंगणाचे प्रधान सचिव (महसूल) S.A.M. रिझवी यांनी तेलंगणा बेव्हरेजेस कॉर्पोरेशन लिमिटेडच्या व्यवस्थापकीय संचालकांना किंमत समितीच्या शिफारशी लागू करण्याचे निर्देश दिले. निवृत्त न्यायमूर्ती जयस्वाल यांच्या नेतृत्वाखालील समितीने बिअरच्या किमतीत 15 टक्के वाढ करण्याचा प्रस्ताव दिला होता आणि त्याला मंजुरी दिल्यानंतर सरकारने सुधारित बीअर एमआरपी मंगळवार, 11 फेब्रुवारी 2025 पासून लागू केली आहे.
2019 नंतर किमतीत वाढ
ब्रूअर्स असोसिएशन ऑफ इंडिया (BAI) ने देखील बिअर उत्पादनाच्या वाढत्या खर्चाबाबत सरकारकडे (तेलंगणा सरकार) चिंता व्यक्त केली होती. याशिवाय युनायटेड ब्रुअरीजने गेल्या महिन्यात थकबाकी न भरल्याने काही काळ पुरवठा बंद केला होता. या सगळ्यात आता सरकारने बिअरच्या दरात वाढ केली आहे. राज्यात 2019 मध्ये बिअरच्या दरात बदल करण्यात आला होता.
भारत हा जगातील मोठ्या दारूच्या बाजारपेठांपैकी एक
अहवालानुसार, भारत जगातील सर्वोच्च मद्य बाजारपेठ आहे आणि राज्ये वैयक्तिकरित्या दारू उत्पादनांची किंमत ठरवतात, ज्यामुळे त्यांच्या महसुलात मोठा वाटा असतो. युनायटेड ब्रुअरीज ही तेलंगणाच्या मद्य बाजारात 70 टक्के वाटा असलेली सर्वात मोठी कंपनी आहे.























