नाईट ड्युटीवरुन घरी जाताना भीषण अपघात, पोलीस कर्मचाऱ्याचा मृत्यू; 2 चिमुकल्यांसह कुटुंबांवर दु:खाचा डोंगर
धुळ्यातील साक्री पोलीस ठाण्यात कार्यरत असलेले कर्मचारी गुलाब शिंपी हे आपल्या दुचाकीवरून जात असताना महामार्गावर पुढे सळई घेऊन जाणाऱ्या कंटेनर चालकाने अचानक ब्रेक दाबल्याने भीषण अपघात झाला.
धुळे : शहरातील नागपूर-सुरत महामार्गावरील आनंद खेडा गाव शिवारात झालेल्या अपघातात साक्री पोलीस ठाण्याचे (Police) कर्मचारी गुलाब शिंपी यांचा जागीच मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली. याप्रकरणी दुपारी उशिरापर्यंत तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे. गुलाब शिंपी हे आपली ड्युटी करुन गावाकडे जात असताना त्यांच्या दुचाकीला अपघात (Accident) झाला. घटनेची माहिती मिळताच साक्री पोलिसांनीही तत्काळ घटनास्थळी धाव घेतली होती.
धुळ्याच्या साक्री पोलीस ठाण्यात कार्यरत असलेले कर्मचारी गुलाब शिंपी हे आपल्या दुचाकीवरून जात असताना महामार्गावर पुढे सळई घेऊन जाणाऱ्या कंटेनर चालकाने अचानक ब्रेक दाबल्याने भीषण अपघात झाला. कंटनेरचालकाने अचानक ब्रेक दाबल्यामुळे त्यावर दुचाकी धडकून गुलाब शिंपी यांच्या डोक्याला जबर मार बसल्याने ते गंभीर जखमी झाले होते. अपघाताची माहिती मिळताच ग्रामस्थांनी धाव घेत गुलाब शिंपी यांना हिरे वैद्यकीय महाविद्यालयात दाखल केले, तेथे डॉक्टरांनी तपासणी करीत त्यांना मृत घोषित केले. सन 2014 मध्ये गुलाब शिंपी हे पोलीस खात्यात भरती झाले होते, सध्या ते साक्री पोलीस ठाण्यात कार्यरत होते.
ड्युटी करुन गावाकडे जाताना अपघात
दरम्यान, गुलाब शिंपी यांच्या अकाल, अपघाती निधनामुळे कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर कोसळला असून या घटनेमुळे पोलीस खात्यात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. गुलाब शिंपी यांच्या पश्चात आई, वडिल, पत्नी, 5 वर्षांची मुलगी, 3 वर्षांचा मुलगा असा परिवार आहे. गुलाब शिंपी हे धुळे तालुक्यातील आनंदखेडे गावात वास्तव्यास होते. ते गावावरुन दुचाकीने दररोज नागपूरमधील साक्री पोलीस ठाण्यात कर्तव्यावर येत होते. काल रात्रीची नाईट शिफ्ट संपल्यानंतर आज सकाळी ते साक्रीहून घराकडे जात असताना त्यांच्या दुचाकीला भीषण अपघात झाला. त्यामध्ये, त्यांचा मृत्यू झाला आहे.