(Source: ECI/ABP News/ABP Majha)
डोनाल्ड ट्रम्प आणि जो बायडन यांच्यातील दुसरी अध्यक्षीय डिबेट रद्द
सध्या जगाचं लक्ष लागलं आहे ते अमेरिकेच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीकडे. या संदर्भात एक महत्वाची बातमी समोर आली आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रंम्प आणि डेमोक्रॅटिक पक्षाचे उमेदवार जो बायडन यांच्यात होणारी दुसरी अध्यक्षीय डिबेट रद्द झाली आहे.
वॉशिंग्टन: सध्या जगाचं लक्ष लागलं आहे ते अमेरिकेच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीकडे. या संदर्भात एक महत्वाची बातमी समोर आली आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि डेमोक्रॅटिक पक्षाचे उमेदवार जो बायडन यांच्यात होणारी दुसरी अध्यक्षीय डिबेट रद्द झाली आहे.
निवडणुकीच्या आधी ही डिबेट एका तटस्थ आयोगामार्फत आयोजित करण्यात येते. 15 ऑक्टोबर रोजी होऊ घातलेली ही डिबेट ही डोनाल्ड ट्रम्प यांना कोरोनाची लागण झाल्याने सुरक्षेच्या कारणास्तव व्हर्च्युअल पध्दतीने होणार होती. आयोगाच्या या निर्णयावर डोनाल्ड ट्रम्प यांनी नाराजी व्यक्त करुन आपण या डिबेटमध्ये सामील होणार नसल्याचं याआधीच स्पष्ट केलं होतं. तर जो बायडन यांनी ट्रम्प यांच्यावर टीका करून सुरक्षेच्या कारणास्तव या चर्चेत भाग घ्यायला नकार दिला होता. बायडन त्या दिवशी ABC News मधील कार्यक्रमात सहभागी होणार आहेत.
यावर आयोगाने सुरक्षेच्या कारणास्तव ही डिबेट रद्द करणार असल्याचे स्पष्ट करत 22 ऑक्टोबर रोजी होणाऱ्या तिसऱ्या आणि शेवटच्या डिबेट आयोजनावर लक्ष केंद्रित केल्याचे म्हटले आहे.
ट्रम्प यांच्या टीमने स्पष्ट केलं की डॉक्टरांनी त्यांना सार्वजनिक कार्यक्रमात भाग घेण्यास परवानगी दिली आहे. त्यानुसार ते शनिवारी होणाऱ्या एका सार्वजनिक कार्यक्रमात भाग घेणार आहेत. फॉक्स न्यूजला दिलेल्या एका मुलाखतीत डोनाल्ड ट्रम्प म्हणाले की त्यांची तब्बेत आता उत्तम आहे. त्यांनी दुसऱ्यांदा कोरोना टेस्ट करून घेतली आहे. पण त्याचा रिझल्ट सांगण्यास त्यांनी नकार दिला. त्यांनी हेही स्पष्ट केले की त्यांनी आता औषधे घेण्याचे बंद केले आहे.
निवडणूकीला काहीच दिवस राहिले असताना ट्रम्प यांना कोरोनाची लागण झाल्याने निवडणूक मोहीमेपासून लांब रहावे लागले. त्याचा त्यांच्या फंड गोळा करायच्या कार्यक्रमावर देखील परिणाम झाला होता. नुकत्याच एका सर्व्हेनुसार ट्रम्प हे त्यांचे स्पर्धक जो बायडेन यांच्या तुलनेत मागे पडले आहेत.
ट्रम्प शनिवारी व्हाईट हाऊस येथे 'कायदा आणि सुव्यवस्था' या विषयावर संबोधित करणार आहेत तर सोमवारी फ्लोरिडात निवडणूक मोहीमेत भाग घेणार आहेत. जो बायडन यांनी ट्रम्प यांच्या सार्वजनिक कार्यक्रमात भाग घेण्याच्या निर्णयावर जोरदार टीका केली. ते म्हणाले की ट्रम्प यांच्या प्रशासनाने कोरोना परिस्थिती अत्यंत असंवेदनशील पध्दतीने हाताळली. त्यांनी मास्कचा वापर आणि सोशल डिस्टन्सिंग बाबत निष्काळजीपणा दैखवला. त्यांच्या अशा धोरणांमुळेच सर्वत्र संदिग्धता पसरली आहे. या आधी ट्रम्प यांनी डेमोक्रॅटिक पक्षाच्या उपाध्यक्ष पदाच्या उमेदवार कमला हॅरिस यांच्यावर जोरदार टीका करून त्यांना कम्युनिस्ट म्हटले होते. तिसरी आणि अंतिम अध्यक्षीय डिबेट ही 22 ऑक्टोबरला टेनेसीच्या नॅशविल या ठिकाणी होणार आहे.