संपूर्ण मुंबईची 'बत्ती' काही काळासाठी 'गुल'
संपूर्ण मुंबईचा वीज पुरवठा एकाच वेळी खंडित होण्याचा हा पहिलाच प्रकारमुख्यमंत्र्यानी दिले चौकशीचे आदेश, अशी घटना पुन्हा न होऊ देण्याची खबरदारी घेण्याची सूचना
मुंबई: मुंबईची जीवनवाहिनी असलेली लोकल रेल्वे ठप्प झाली, घरे आणि कार्यालायातील वीज गायब झाली, दमट हवामानात लोक अक्षरश: घामाघूम झाले...काही काळ ही अवस्था होती मुंबईची. सोमवारी सकाळी अचानकपणे मुंबई आणि मुंबई महानगर परिसरातील वीज पुरवठा खंडित झाला.
अचानकपणे संपूर्ण मुबंईची एकाचवेळी वीज खंडित झाली हे इतिहासात पहिल्यांदाच घडत होते. तिन्ही मार्गाच्या लोकल सेवा ठप्प झाल्या. या लोकल सेवा अत्यावश्यक सेवांतील कर्मचाऱ्यांसाठी वापरण्यात येत आहेत. सर्व खासगी कार्यालयांसह शासकीय कार्यालयेही बंद झाली. न्यायालयाचेही कामकाज काही वेळेसाठी बंद झाले. रस्त्यावरचे सिग्नल व्यवस्थाही थांबली.
पश्चिम रेल्वे आणि मध्य रेल्वेची सेवाही सकाळी दहा वाजून दहा मिनीटांपासून थांबली. त्यावर त्यांच्या अधिकाऱ्यानी टाटा कंपनीकडून त्यांची वीज सेवा खंडित झाल्याने या दोन्ही रेल्वेना टाटा पॉवर कडून वीज पुरवठा केला जातो.
राज्याचे उर्जामंत्री नितीन राऊत यांनी सांगितले की वीज कर्मचारी हे युध्द पातळीवर कार्य करत आहेत. त्यामुळे संपूर्ण शहरात वीज पुरवठा लवकरच सुरळीत होईल. दुपार पर्यंत बांद्रा कुर्ला कॉम्पलेक्स, लोअर परेळ, दक्षिण मुंबई या भागांसह अनेक भागात वीज पुरवठा पुर्ववत झाला.
कोरोनाच्या काळात अनेक कंपन्यांनी त्यांच्या कर्मचाऱ्यांनी वर्क फ्रॉम होम करण्याची मुभा दिली होती. घरातील वीजच गायब झाल्याने आता अशा कर्मचाऱ्यांना काम करायला अवघड झाले.
काही ठिकाणी ऑफिसचे कर्मचारी हे लिफ्टमध्ये अडकले होते. त्यावेळी त्यांना सोशल डिस्टंसिंगचे पालन करणे शक्य झाले नाही. काही काळानंतर या कर्मचाऱ्यांना तिथुन बाहेर काढायला यश मिळाले.
मुंबईच्या अनेक कोविड सेंटरमध्ये कोरोनाचे रुग्ण उपचार घेत आहेत. अशा वेळी त्या ठिकाणी ऑक्सिजनची कमतरता भासण्याची शक्यता होती. कोविडस सेंटरमध्ये पॉवर बॅकअपची सोय असल्याने कोणत्याही काळजीचे कारण नसल्याचे राज्याचे आरोग्य मंत्र्य़ानी आणि मुंबईच्या आयुक्तानीही स्पष्ट केले.
महापारेषणच्या 400 KV कळवा पडघा GIS केंद्रात सर्किट 1 देखभाल-दुरुस्ती सुरु होती. यावेळी सर्व भार सर्किट 2 वर होता. अचानक त्यात तांत्रिक बिघाड झाल्याने मुंबई आणि ठाणे शहर काही काळासाठी अंधारात गेले.
मुंबई सोबतच ठाणे, पनवेल, कल्याण आणि डोंबिवली या भागांनाही वीज खंडित झाल्याचा फटका बसला.
मुंबईतील BSE आणि NSE च्या कार्यालयांनाही या तांत्रिक बिघाडीचा फटका बसला. पण काही काळानंतर या ठिकाणचे व्यवहार पुर्ववत झाले. शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावरही सर्व व्यवहार सुरळीत झाल्याचे सांगण्यात आले.
मुंबई आणि एमएमआर रिजनमधील वीज पुरवठा खंडित झाल्याचा सर्वात मोठा फटका लोकल सेवा, रुग्णालयांना बसला. अनेक प्रवासी ट्रेनमध्येच अडकले. तर रुग्णालयात कोविड रुग्ण असल्याने वीज पुरवठा लवकरात लवकर पूर्ववत करण्याचं आव्हान होतं. परंतु हा तांत्रिक बिघाड मोठा असल्याने तो दुरुस्त करण्यासाठी सुमारे दोन तास लागले.
वीज पुरवठा सुरळीत झाल्यानंतर ज्या कारणामुळे तांत्रिक बिघाड झाला त्याची चौकशी करणार असल्याचे ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी सांगितले आहे.
मुंबई महानगर क्षेत्रातील वीज खंडित झाल्याच्या घटनेबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी गंभीर दखल घेतली असून तातडीने या घटनेची चौकशी करण्याचे निर्देश दिले आहेत. याबाबत मुख्यमंत्र्यांनी नितीन राऊत आणि मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त इक्बाल सिंह चहल आणि इतर अधिकाऱ्यांशी चर्चा केली.
मुंबईचा वीज पुरवठा खंडित होण्याचे नेमके कारण समजू शकले नाही पण पश्चिम रेल्वे आणि बृहन्मुंबईला वीज पुरवठा करणाऱ्या बेस्ट या कंपनीने टाटा पॉवरकडे याचे बोट दाखवले आहे.
संध्याकाळपर्यंतही मुंबईच्या काही भागात वीज पुरवठा पुर्ववत झाला नव्हता.