Buldhana Hair Loss: बुलढाणा केस गळती प्रकरणाचे कनेक्शन थेट पंजाब, हरयाणापर्यंत! ज्येष्ठ संशोधकाच दावा, सांगितलं नेमकं कारण
Buldhana Hair Loss : बुलढाणा जिल्ह्यातील जवळपास 18 गावांमध्ये गेल्या काही महिनाभरापासून नागरिकांना केस गळती आणि त्यानंतर टक्कल पडण्याचा प्रकार समोर आला होता. या प्रकरणी आता नवी माहिती पुढे आली आहे.

Buldhana : बुलढाणा जिल्ह्यातील जवळपास 18 गावांमध्ये गेल्या काही महिनाभरापासून नागरिकांना केस गळती (Buldhana Hair Loss) आणि त्यानंतर टक्कल पडण्याचा प्रकार समोर आला होता. यामुळे संपूर्ण देशात एकच खळबळ उडाली होती. त्यानंतर या प्रकरणाच्या तपासासाठी स्थानिक आरोग्य प्रशासनापासून ते देशाच्या सर्वोच्च वैद्यकीय संशोधन पथक अर्थात ICMR ने या परिसरात येऊन रुग्ण तपासणी करून रुग्णांचे व परिसरातील अनेक नमुने तपासण्यासाठी दिल्ली, भोपाळ व चेन्नई येथे नेले होते. मात्र अनेक दिवस होऊनही केस गळतीच्या कारणांचा शोध लागत नव्हता. तर या सर्व प्रकरणाचा अभ्यास करून या रुग्णांच्या रक्तात व केसात 'सेलेनियम' या जड धातूचे प्रमाण मोठ्या प्रमाणात आढळून आलं होतं.
ज्येष्ठ संशोधकाच दावा, गळती प्रकरणाचे सांगितलं नेमकं कारण
अशातच जिल्ह्यातील केस गळती प्रकरणाचा तपास पुढे सरकत असताना या प्रकारचे मूळ आता थेट पंजाब, हरयाणा राज्यापर्यंत जाऊन पोहचले आहे. असा दावा पंजाब, हरयाणातील शिवालिक पर्वतरांगांच्या पायथ्याशी असलेल्या ज्येष्ठ संशोधक, अभ्यासक, डॉ. हिम्मतराव बावस्कर यांनी केला असून त्यांनी स्वत: या बाबत अभ्यास करून निष्कर्ष काढला आहे. यासाठी त्यांनी स्वखर्चाने शेवटच्या टोकापर्यंत या प्रकरणाचा शोध घेतला आहे. तर ते एवढ्यावरच न थांबता त्यासाठीचे उपायही त्यांनी शोधले असल्याची माहिती दिली आहे.
बुलढाणा जिल्ह्यातील अनेक गावातील बहुतांश गावकरी हे रेशनच्या दुकानावर अवलंबून आहेत. त्यामुळे रेशनमध्ये मिळणारा गहूचे टक्कल पडण्याचा प्रकरणाचे कारण ठरले आहे. या प्रकरणाचा अभ्यास करताना ज्येष्ठ संशोधक आणि अभ्यासक डॉ. हिम्मतराव बावस्कर यांनी बोंदगावचे सरपंच रामेश्वर धारकर यांच्याकडून तिथे येणाऱ्या गव्हाच्या पोत्यांचे फोटो, गव्हांचे सॅम्पल मागवून घेतले होते. यातील तपासात हे गहू पंजाब, हरयाणामधील शिवालिक पर्वतरांगांच्या पायथ्याशी असणाऱ्या भागातील असल्याचे पुढे आले. दरम्यान, शिवालिक पर्वतरांगांतून पावसाळ्यात मोठे झरे येतात. तिथल्या दगडांमध्ये सेलेनियमचे प्रमाण जास्त आहे. झऱ्यांच्या पाण्यासोबत ते शेतीत पसरते. त्या भागात तिथल्या शेतकऱ्यांनी तशा जमिनीला कुंपण घातले आहे. इथे पीक घेऊ नका, असेही सांगितले आहे. दरम्यान, गव्हामध्ये सेलेनियम शोषून घेण्याची क्षमता इतर पिकांपेक्षा जास्त असते. त्या भागात पिकलेले गहू रेशन दुकानांच्या माध्यमातून बुलढाणा भागात आले. हे त्या पोत्यांवर छापलेल्या माहितीवरून सिद्ध झाल्याची माहती डॉ. बावस्कर यांनी दिली आहे.
रुग्णांच्या रक्तात व केसात 'सेलेनियम' या जड धातूचे प्रमाण
अशातच, या पूर्वीदेखील देशाच्या सर्वोच्च वैद्यकीय संशोधन पथक अर्थात ICMR ने केलेल्या तपासात हेच कारण पुढे आले होते. ICMR ने या सर्व प्रकरणाचा अभ्यास करून या रुग्णांच्या रक्तात व केसात 'सेलेनियम' या जड धातूचे प्रमाण मोठ्या प्रमाणात आढळून आल आहे. त्याचप्रमाणे या परिसरातील नागरिक खाद्य म्हणून जो गहू वापरतात त्या गव्हामध्येही सेलेनियमचे प्रमाण मोठ्या प्रमाणात आढळून आल्याची माहिती आहे. आणि या सेलेनियम मुळेच ही केस गळती होत असल्याचा अहवाल समोर आल्याचे बोलले जात आहे. आता डॉ. बावस्कर यांनी केलेल्या दाव्यामुळे हे प्रकरणाचे धागेदोरे थेट पंजाब, हरयाणा राज्यापर्यंत जाऊन पोहचले असल्याचेही पुढे आले आहे.
हे ही वाचा
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज

